Seo Services
Seo Services

जुन्नर परिसराच्या विकासासाठी दाऱ्या घाटाचा आराखडा तयार करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२८० कोटी अष्टविनायक रस्त्याच्या विकास कामांचा शुभारंभ
पुणे, दि. १९: जुन्नर तालुक्यातील दाऱ्या  घाटाचे सर्वेक्षण करून बोगद्याच्या माध्यमातून जुन्नर हे मुंबईच्या जवळ आणण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्नर तालुक्यातील ओझर येथे केले.  
हायब्रीड अँन्युईटी अंतर्गत २८० कोटी रुपयांच्या अष्टविनायक रस्त्यांच्या विकास कामांचा शुभारंभ आज ओझर  येथे करण्यात आला,त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
     
कार्यक्रमास  पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद बनसोडे, पत्रकार उदय निरगुडकर, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस पुढे म्हणाले ,जुन्नर तालुक्यात  मोठी अर्थव्यवस्था निर्माण होऊन वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ होईल, त्यासाठी आंबेगव्हाण येथे बिबट सफारीसाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.  जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित करण्यात आला आहे.  यासाठी आराखडा तयार करण्यात येईल. 
      
तालुक्यातील बुडीत  बंधाऱ्याला मान्यता देण्यास प्राधान्य देण्यात येईल.  अष्टविनायक हे आपले वैभव आहे. अष्टविनायकाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार परिसरातील रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळतील,असे सांगितले.
    
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते शिवनेरी भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ओझर गणपती मंदिर ट्रस्टतर्फे एक लाख रुपये मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी  मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच पुरस्कार्थी राहुल बनकर यांच्यातर्फे दहा हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आला.

   

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार शरद बनसोडे यांनी तालुक्याच्या विकासास सहाय्य्यभूत ठरणाऱ्या विकास कामांना मान्यता द्यावी, अशी विनंती केली. पत्रकार उदय निरगुडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरवात श्री गणेश पूजन व शिवप्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.    कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

ठळक वैशिष्ट्ये:

प्रकल्पातील अष्टविनायक परिक्रमा मार्ग हा पुणे जिल्ह्यातील मोरगाव, सिध्दटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री व थेऊर या सहा अष्टविनायक तीर्थक्षेत्र जोडणा-या राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग आहे.
दरवर्षी या रस्त्यांवरून १० लक्ष भाविक यात्रा करतात. हे रस्ते ग्रामीण तसेच शहरी भागातून जाणारे महत्त्वाचे रस्ते आहेत. 
या रस्त्यांवर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी हे खंडोबाचे देवस्थान, बारामती तालुक्यातील मोरगाव, दौंड तालुक्यातील पाटस दौंड मार्गे सिध्दटेक, शिरूर तालुक्यातील रांजणगाव, जुन्नर तालुक्यातील ओझर व लेण्याद्री व हवेली तालुक्यातील थेऊर ही महत्त्वाची तीर्थस्थाने व बाजारपेठेची गावे आहेत. 
या रस्त्यांवर वाहतूक वर्दळ बऱ्याच प्रमाणात असते व त्यामानाने डांबरी पृष्ठभागाची रुंदी अपुरी पडते. त्यामुळे या रस्त्यांची सुधारणा करण्यात येत आहे.  या भागातील पर्यटन व शेतीमालाच्या वाहतुक वाढीस चालना मिळणार आहे.
            
या प्रकल्पामुळे जेजुरी, मोरगाव, सुपे, पाटस, दौंड, सिध्दटेक, पारगाव, न्हावरा, रांजणगाव, मलठण, पारगाव शिंगवे, नारायणगाव, ओझर, ओतूर, लेण्याद्री, जुन्नर, लोणीकंद, केसनंद, थेऊर ही गावे व तालुक्याची ठिकाणे एकमेकांशी ७.०० मीटर व १.०० मीटर रुंदीच्या दुपदरी डांबरी रस्त्याने जोडली जाणार आहेत.
    
या प्रकल्पामधील सितवाडी, बनकर फाटा, ओतूर ही गावे रा.म.मा. २२२वरील असून ओझर व लेण्याद्री येथे जाण्यासाठी तसेच मुंबईहून कल्याण मार्गे येणारी औद्योगिक अवजड वाहतुकीत नारायणगाव ते रांजणगाव मधील एम.आय.डी.सी. क्षेत्रांना जोडणारा जवळचा थेट मार्ग आहे. 
     
या प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेले रस्ते रा.म.मा. २२२ (नगर -कल्याण), रा.म.मा. ७५३ (पुणे औरंगाबाद) रा.म.मा. ६५(पुणे- सोलापूर) व रा.म.मा. ५०(पुणे- नाशिक) तसेच नव्याने घोषित झालेले तळेगाव चाकण- शिक्रापूर- न्हावरा -ईनामगाव रा.म.मा. ५४८ डी (तळेगाव जामखेड -नांदेड) मनमाड -शिर्डी- अहमदनगर- दौंड- बारामती या रा.म.मा. १६० या सहा राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा रस्ता आहे. 
    
या पर्यायी रस्त्यांमुळे पुणे शहरातील वाहतुकीचा भार कमी होऊन हे मार्ग अष्टविनायक परिक्रमा मार्ग म्हणून वापरात आहे.

हा रस्ता भविष्यातील वाहतूक वर्दळ लक्षात घेता सन २०३३ पर्यंत (१५ वर्षे) पुरेसा पडेल, असे गृहीत धरून रस्ता संकल्पित करण्यात आला आहे.

जुन्नर परिसराच्या विकासासाठी दाऱ्या घाटाचा आराखडा तयार करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जुन्नर परिसराच्या विकासासाठी दाऱ्या घाटाचा आराखडा तयार करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 19, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.