पुणे - महिला दिनाचे औचित्य साधून शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील महिला प्रवाशांना पीएमपीच्या 'तेजस्विनी' बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत असल्याची घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी बुधवारी केली. पहिल्या टप्प्यात महिलांना ही सुविधा दर महिन्याच्या आठ तारखेला वर्षभर मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महापौर टिळक यांनी मोफत बस प्रवासाची घोषणा केली. स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे या प्रसंगी उपस्थित होते. महिलांसाठी राज्य सरकारने ३३ बस गेल्या वर्षी ८ मार्च रोजी दिल्या आहेत. आता आणखी ३३ बस यंदा मिळाल्या आहेत. त्यातील सहा बस दाखल झाल्या असून, उर्वरित २७ बस अल्पावधीत दाखल होणार आहेत. या बसला प्रवासी महिलांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. त्यात आणखी वाढ व्हावी म्हणून दर महिन्याला ८ तारखेला 'तेजस्विनी' बसमधून प्रवासी महिलांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे, अशी माहिती शिरोळे यांनी दिली. या प्रवासासाठी होणारा खर्च दोन्ही महापालिका पीएमपीला देणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. नव्या २७ बस दाखल झाल्यावर आणखी सुमारे २० मार्गांवर महिला स्पेशल बस सोडण्यात येणार असल्याचे नियोजन आहे, असे पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी स्पष्ट केले.
महापौर टिळक म्हणाल्या, ''गेल्या वर्षात २८ लाख महिलांनी बसमधून प्रवास केला आहे. दरमहा दोन लाख ३३ हजार महिला या विशेष बसमधून प्रवास करतात. त्या माध्यमातून दरमहा ३४ लाख ३७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. वर्षभरात ४ कोटी १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.'' पीएमपीच्या १४ मार्गांवर ३८ बसद्वारे ४६४ फेऱ्या रोज होतात, अशी माहिती शिरोळे यांनी दिली. पीएमपीच्या प्रवाशांसाठी दरमहा महिन्यातून एकदा मोफत प्रवास करण्याची संधी देऊन 'बस डे' साजरा करावा, असा ठराव आबा बागूल यांनी या पूर्वी दिला होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने तो मंजूर केला होता. परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नव्हती.
दर महिन्याच्या ८ तारखेला महिला प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येत्या शुक्रवारपासून (८ मार्च) या सेवेला प्रारंभ होणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. कात्रज ते शिवाजीनगर, अप्पर डेपो ते शिवाजीनगर, कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, हडपसर ते वारजे-माळवाडी, कोथरूड ते कात्रज, भेकराईनगर ते महापालिका भवन, स्वारगेट ते धायरी, मनपा भवन ते लोहगांव, मनपा ते वडगांवशेरी, मार्केटयार्ड ते पिंपळे गुरव, अप्पा बळवंत चौक ते सांगवी, मनपा ते आळंदी, मनपा ते आकुर्डी रेल्वे स्थानक, निगडी ते हिंजवडी-माण फेज-३ या चौदा मार्गावर सध्या तेजस्विनीची सेवा देण्यात येत आहे.

महिन्यातून एकदा 'तेजस्विनी'तून मोफत प्रवास
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 07, 2019
Rating:
No comments: