Seo Services
Seo Services

एमसीएमसी समितीने जाहिरात प्रमाणिकरणाबरोबरच पेडन्यूज वरही बारकाईने लक्ष ठेवावे - जिल्हाधिकारी


लातूर : जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीने राजकीय पक्ष व उमेदवारांच्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करण्याबरोबरच मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमात उमेदवार व राजकीय पक्षाबाबत आलेल्या वृत्त, विशेष वृत्त व लेखा आदी मजकूराची तपासणी करुन त्यातील पेडन्यूज वर बारकाईने लक्ष ठेवावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जी.श्रीकांत यांनी सूचित केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी बी.एस. दौलताबाद, समिती सदस्य माजी प्राचार्य नागोराव कुंभार, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, महापालिकेचे पीआरओ तथा माध्यम कक्षाचे सदस्य समीर मुलानी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, एमसीएमसी समितीने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक व समाजमाध्यमावर प्रसिध्द करण्यासाठी राजकीय पक्ष व उमेदवारांच्या जाहिरातीचे प्रमाणिकरण करुन द्यावे. त्याप्रमाणेच मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातीच्या स्वरुपातील व मोबदला देऊन प्रसिध्द केलेल्या बातम्यांची तपासणी करुन संशयित पेड न्यूज वर बारकाईने लक्ष ठेवावे. व त्या पेडन्यूज असल्याचे आयोगाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे सिध्द होत असेल तर संबंधित उमेदवारांना नोटीस देण्याबरोबरच पेड न्यूज वरील तो खर्च संबंधित उमेदवारांच्या निवडणूक खर्चात नोंद करण्याबाबत निवडणूक खर्च समितीला कळविले पाहिजे, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. 

नोंदणीकृत राष्ट्रीय अथवा राज्यस्तरावरील पक्ष आणि निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारांनी जाहिरात प्रसारित करण्याच्या पूर्वी किमान ३ दिवस आधी जाहिरात प्रमाणिकरणासाठी अर्ज करावा. तसेच बिगर नोंदणीकृत राजकीय पक्ष अथवा अन्य व्यक्तींनी जाहिरात प्रसारित करण्यापूर्वी किमान ७ दिवस आधी अर्ज करणे आवश्यक आहे. सदरील विहित वेळेत प्रमाणिकरणासाठी आलेल्या जाहिराती ४८ तासांच्या आत प्रमाणित करुन देण्याची जबाबदारी एमसीएमसी समितीची असल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.

प्रत्येक राजकीय पक्ष व उमेदवारांनी प्रसारमाध्यमांतून प्रचार, प्रसिध्दी करण्यासाठी जाहिरातीचे पूर्व प्रमाणिकरण घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच प्रसारमाध्यमांनीही राजकीय, पक्ष व उमेदवारांच्या प्रसिध्दीसाठी आलेल्या जाहिराती एमसीएमसी समितीकडून प्रसारणाचे प्रमाणपत्र मिळाल्याची खात्री करावी व त्यानंतरच जाहिराती प्रसिध्द कराव्यात व निवडणूक विभागाला निर्भिड, मुक्त व नि:पक्ष वातावरणात निवडणुका घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मोतीयेळे, समिती सदस्य श्री. कुंभार यांनी ही माध्यम प्रमाणिकरण समितीच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी श्री.कुंभार यांनी पूर्व प्रमाणिकरण व पेड न्यूज बाबत प्रत्येक राजकीय पक्षाचे स्थानिक प्रमुख, मीडिया सेल प्रमुख यांच्यासह सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांना ही एमसीएमसी समितीबाबत व पेडन्यूजबाबत आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती लेखी स्वरुपात द्यावी, असे सांगितले.
एमसीएमसी समितीने जाहिरात प्रमाणिकरणाबरोबरच पेडन्यूज वरही बारकाईने लक्ष ठेवावे - जिल्हाधिकारी एमसीएमसी समितीने जाहिरात प्रमाणिकरणाबरोबरच पेडन्यूज वरही बारकाईने लक्ष ठेवावे - जिल्हाधिकारी Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 26, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.