Seo Services
Seo Services

पुणे महानगर परिवहन मंडळकडून प्रवाशांच्या तक्रारीची दखल


Related image

चिंचवड : पुणे महानगर परिवहन मंडळ (पीएमपी) सेवेचा वापर करणारे प्रवासी अनेकदा या व्यवस्थेबाबत तक्रारी करीत असतात. बस थांब्यावर बस न थांबविणे, खिडकीच्या काचा तुटलेल्या असणे, आसन व्यवस्थेची मोडतोड, गळके छप्पर, मार्ग फलक नसणे, प्रथमोपचार व अग्निशामक साहित्य नसणे अशा अनेक तक्रारी प्रवासी वारंवार प्रशासनाकडे करित असतात.

या तक्रारीची त्वरित दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्याला अथवा ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली जाते. याचा प्रत्यय शहरातील प्रवाशांना आला. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी यासाठी पीएमपी प्रशासन विविध प्रकारे जनजागृती करून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचे प्रयत्न करतात. मात्र तरीही रस्त्यावर वाहतूक करणारे वाहक व चालक मनमानी व अरेरावी करीत प्रवाशांना वेठीस धरत असल्याच्या तक्रारी नियमितपणे प्रवासी करीत असतात.

चिंचवड गावातून निगडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर इंदिरानगर बस थांब्यावर काही प्रवासी बसची वाट पाहत थांबले होते. यामध्ये तीन दृष्टिहीन महिलांचा सहभाग होता. सहा वाजल्यापासून साडेसहा वाजेपर्यंत या मार्गावर तीन बस आल्या. या बसगाड्यांना हात दाखवूनही चालकांनी बस थांबविली नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी याबाबत पीएमपी प्रशासनाकडे तक्रारी केल्या. बस क्रमांक व मार्ग सांगितला. या तक्रारीची दखल घेत अधिकाऱ्यांनी या मार्गावरील संबंधित बसचालकांवर दंडात्मक कारवाई करत प्रत्येकी शंभर रुपये दंड वसूल केला. पीएमपी प्रशासनाने प्रवाशांच्या तक्रारीची त्वरित दखल घेत तक्रार नंबर व केलेल्या दंडाची माहिती प्रवाशांना मेसेजद्वारे पाठविली आहे.

टोल फ्री क्रमांक असावा

पीएमपी प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक टोल फ्री करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. प्रवाशांना तक्रारी करण्यासाठी असणारे क्रमांक टोल फ्री नसल्याने पैसे मोजावे लागतात. कित्येकदा फोन प्रतीक्षेत असल्यास वेळ व पैसे वाया जातात. मात्र या यंत्रणेसाठी खर्च जास्त असल्याचे सांगत हे क्रमांक टोल फ्री केले जात नाहीत.


सुनीता पिसाळ, दृष्टिहीन प्रवासी
मी व माझ्या दोन मैत्रिणी आम्ही पूर्णत: दृष्टिहीन आहोत. आम्ही कामानिमित्त रोज निगडी ते इंदिरानगर असा प्रवास करतो. कित्येकदा बस थांब्यावर बस थांबत नाहीत. यामुळे रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागते. नागरिक आम्हाला मदत करतात. मात्र काही बसचालक व वाहक आम्हाला सहकार्य करीत नाहीत. यामुळे अनेकदा अडचणी येतात. स्टॉप आल्यावर सांगितले जात नाही. चुकीच्या स्टॉप वर उतरविले जाते. वाहक व चालकांनी आम्हाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. 

सविता घाणेकर, दृष्टिहीन प्रवासी
कामानिमित्त आम्हाला रोज प्रवास करावा लागतो. मी दृष्टिहीन असल्याने प्रवासात नागरिकांचे सहकार्य लागते. अनेक नागरिक आम्हाला सहकार्य करतात. काही बसचालक आम्हाला जाणीवपूर्वक चुकीची वागणूक देतात. अशा वेळी आम्ही नागरिकांच्या मदतीने संबंधित बसच्या चालकाची तक्रार पीएमपी प्रशासनाकडे करतो. याची दखल घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते हे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारामुळे वाहक व चालक या पुढे दृष्टिहीन व्यक्तींबाबत योग्य दक्षता घेतील, अशी अपेक्षा आहे.

पुणे महानगर परिवहन मंडळकडून प्रवाशांच्या तक्रारीची दखल पुणे महानगर परिवहन मंडळकडून प्रवाशांच्या तक्रारीची दखल Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 18, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.