Seo Services
Seo Services

चालू घडामोडी व दिनविशेष - १९ मार्च २०१९



महाराष्ट्रात पावणे नऊ कोटी मतदार, सर्वात जास्त मतदार ठाण्यात तर रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक महिला मतदार :

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची सर्वाधिक आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरूषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक असून 14 लाख 40 हजार एकूण मतदारांमध्ये सात लाख 35 हजार 597 एवढ्या महिला मतदारांची संख्या आहे. ठाणे मतदार संघात राज्यात सर्वाधिक सुमारे 23 लाखांहून अधिक मतदारांची संख्या असून 12 लाख 60 हजारांहून अधिक पुरूष मतदारांची संख्या आहे.

राज्यात  11, 18, 23 आणि 29 एप्रिल या चार टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा तयारीला लागली आहे. सुमारे सहा लाख कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. राज्यात चार कोटी 57 लाखांहून अधिक पुरूष मतदार असून चार कोटी सोळा लाखाहून अधिक महिला मतदार आहेत.

राज्यातील ४६ लाख मतदारांना मिळणार रंगीत ओळखपत्र :

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिताभारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्र (व्होटर आयडी कार्ड) वाटप करण्यास सुरुवात केली आहे. नव्याने ओळखपत्राची मागणी केलेल्या राज्यातील सुमारे 46 लाख मतदारांना हे नवीन ओळखपत्र मिळणार असून अर्ध्याहून अधिक मतदारांना ओळखपत्राचे घरपोच वाटप झाले आहे. ऊर्वरित ओळखपत्रे  मतदानापूर्वीमतदारांना देण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वैध मतदार छायाचित्र (Electoral Photo ID Card आयडी) असणे आवश्यक आहे.

यासाठी भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारास ओळखपत्र दिले आहे. यापूर्वी संगणकावर मुद्रित केलेले कृष्णधवल ओळखपत्र देण्यात येत होते. परंतु आता आकर्षक असे, रंगीत पॉलिमेरायझिंग विनाइल क्लोराईड (पीव्हीसी) ओळखपत्र देण्यात येते.

ज्या नागरिकांकडे असे ओळखपत्र नसेल त्यांनी अर्ज केल्यानंतर नवीन ओळखपत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) मतदारांच्या घरी जाऊन देण्यात येते अथवा संबंधित कार्यालयात हे ओळखपत्र देण्यात येते. मतदाराच्या नावात, पत्त्त्यात, लग्नानंतरच्या नावात बदल आदी कारणांमुळे नवीन ओळखपत्रासाठी अर्ज करता येतो. अर्ज केलेल्या नागरिकांना नवीन ओळखपत्र देण्यात येत आहे.

ऋषी कपूर यांची अमेरिकेत भेट घेतली या खास व्यक्तींनी : 

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर लवकरच मुंबईत परतणार असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत होत्या पण ते या महिन्यात तरी मुंबईत परतणार नसल्याचे नुकतेच सांगण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेत आहेत.

त्यांना कर्करोग झाला असल्याचे बोलले जात होते. मात्र या वृत्ताचे त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी खंडन केले होते. अद्याप त्यांच्या आजाराबद्दल काहीच समजू शकलेले नाही. आजवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी तसेच ऋषी कपूर यांच्या कुटुंबियांनी अमेरिकेला जाऊन ऋषी कपूर यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

ऋषी कपूर एक स्ट्राँग व्यक्ती असून ते आजाराशी खंबीरपणे सामना करत आहेत. ऋषी कपूर यांचे भाऊ अभिनेते रणधीर कपूर आणि त्यांची मुलगी अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या ऋषी आणि नीतू कपूर यांच्यासोबत अमेरिकेला आहेत.

नीतू कपूर यांनीच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर रणधीर, करिश्मा, ऋषी आणि त्यांचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्यावर सगळ्यात चांगली भावंडं... त्यांचे कधीही संभाषण हे केवळ खाण्याच्या बाबतीत असते असे कॅप्शन लिहिले आहे. नीतू कपूर यांनी पोस्ट केलेल्या या फोटोवर ऋषी सर तुमची तब्येत लवकर बरी होवो अशा शुभेच्छा त्यांच्या फॅन्सनी दिल्या आहेत. 

‘आत्महत्या करण्याची परवानगी द्या’, शेतकऱ्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र : 

आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर असताना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअतंर्गत फक्त दोन हजार रुपये मिळाल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने ही रक्कम पुन्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाठवली आहे. यासोबतच टोमॅटोची शेती करणाऱ्या या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. मदत करु शकत नाही तर किमान आत्महत्या करण्याची तरी परवानगी द्या अशी विनंतीच शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

39 वर्षीय प्रदीप शर्मा यांनी सांगितलं आहे की, मला मिळालेले दोन हजार रुपये मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना परत पाठवले आहेत. पण किमान ते मला आत्महत्या करण्याची परवानगी तरी देऊ शकतात. प्रदीप शर्मा यांनी आपल्या डोक्यावर 35 लाखांचं कर्ज असल्याचं सांगितलं आहे.

प्रदीप शर्मा आपल्या कुटुंबासोबत भाड्याच्या घरात राहतात. दोन वेळचं अन्न मिळवण्यासाठीही त्यांना झगडावं लागत आहे. 2016 मध्ये आपल्या पिकांचं नुकसान झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारला पत्र लिहिलं होतं, पण काहीच उत्तर आलं नाही अशी माहिती प्रदीप शर्मा यांनी दिली आहे.

कर्जाने बुडलेल्या आपल्या काकांचं 2015 मध्ये निधन झाल्यानंतर जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना माहिती कळवली होती असं प्रदीप शर्मा यांचं म्हणणं आहे. ‘गतवर्षी डिसेंबर महिन्यात केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग यांना भेटण्यासाठी मी दिल्लीत गेलो होतो. पण तिथूनही मोकळ्या हाती परतावं लागलं’, असं प्रदीप शर्मा यांनी सांगितलं आहे.

भावा वाचवलंस! तुरुंगवास टळताच अनिल अंबानी यांनी मानले मुकेश यांचे आभार : 

एरिक्सन इंडियाला द्यावयाचे ४५८. ७७ कोटी रुपये भरण्यात अखेर अनिल अंबानी यांना यश आले आहे. ही रक्कम भरल्याने अनिल अंबानी यांची अटकही टळली आहे. यानंतर अनिल अंबानी यांनी मोठा भाऊ मुकेश अंबानी आणि नीता यांचे आभार मानले आहेत. कठीण प्रसंगात मला साथ दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे अनिल अंबानी यांनी म्हटले आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन्स विरोधात एरिक्सन इंडियाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ध्वनिलहरीपोटी रिलायन्स कम्युनिकेशन्स स्विडनच्या एरिक्सनला ५५० कोटी रुपये देणे होती. या पैकी काही रक्कम यापूर्वी जमा करण्यात आली आहे. उर्वरित रकमेकरिता सर्वोच्च न्यायालयाने अंबानी व त्यांच्या कंपनीला १९ मार्चपर्यंतची मुदत दिली होती.

मंगळवारी मुदत संपण्यापूर्वी रिलायन्स कम्युनिकेशन्सने एरिक्सनला ४५८.७७ कोटी रुपये दिले. रक्कम मुदतीत न भरल्यास तुरुंगात टाकण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने अंबानी यांना बजाविले होते. कंपनीने ही रक्कम न भरल्यास अंबानी यांना किमान तीन महिन्यांच्या शिक्षेला सामोरे जावे लागले असते.  मंगळवारी कोर्टात पैसे जमा केल्यानंतर अनिल अंबानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अंबानी कुटुंबात दोन्ही भावांमध्ये वाद झाला होता. मात्र, संकटसमयी मुकेश अंबानी यांनी अनिल अंबानी यांना मदत केल्याचे समोर आले आहे. मंगळवारी कोर्टात पैसे जमा केल्यानंतर अनिल अंबानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल अंबानी म्हणतात, मी आणि माझे कुटुंब भूतकाळातून बाहेर पडलोय.

माझा मोठा भाऊ मुकेश आणि वहिनी नीता हे दोघे कठीण काळात माझ्या पाठिशी उभे राहिले. या मदतीसाठी मी आभारी आहे. अशा प्रसंगात मदत करुन त्यांनी कुटुंबाचे महत्त्व आणि कुटुंबातील मूल्य हे अधोरेखित केले. आम्ही जुन्या गोष्टी विसरुन आता पुढे जात आहोत. त्यांच्या या वागणुकीमुळे मी खरंच प्रभावित झालो आहे, असे अनिल अंबानी यांनी म्हटले आहे.

प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री : 

गोवा विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. प्रमोद सावंत यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तसेच मनोहर आजगावकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, मिलिंद नाईक यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांची निवड झाली आहे. रविवारचा संपूर्ण दिवस गोव्यात वेगवान राजकीय घडामोडींचा ठरला. भाजपाचे सहयोगी पक्ष महाराष्ट्र गोमंतक, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांबरोबर दिवसभर मुख्यमंत्रिपदासाठी काथ्याकूट सुरु होता. अखेर अपेक्षेप्रमाणे सावंत यांच्या नावावर एकमत झाले.

प्रमोद सावंत हे सध्या गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते, असेही सांगितले जाते. प्रमोद सावंत हे गोव्यातील सांखळी मतदार संघाचे भाजपाचे आमदार आहेत. डॉ. प्रमोद सावंत यांचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला. डॉ. प्रमोद सावंत हे व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

तत्पूर्वी काँग्रेसच्या आमदारांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन सरकार स्थापण्याचा दावा केला. विरोधी पक्षनेता चंद्रकांत कावळेलकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व १४ आमदार राजभवनात गेले आणि सिन्हा यांना निवेदन देत त्यांचा पक्ष विधानसभेत सर्वांत मोठा पक्ष असून आम्हाला सरकार बनवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली.

दिनविशेष :
महत्वाच्या घटना 

१६७४: शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्‍नी काशीबाई यांचे निधन.

१८४८: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.

१९३१: अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.

२००१: वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.

२००३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले.

जन्म 

१८२१: ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १८९०)

१९००: मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट १९५८)

१९३८: बालनाटय लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांचा जन्म.

१९८२: फेसबुक चे सहसंस्थापक एड्वार्डो सावेरीन यांचा जन्म.

मृत्यू 

१८८४: आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचे निधन. (जन्म: १६ मे १८२५)

१९७८: भारतीय वकील आणि राजकारणी एम. ए. अय्यंगार यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १८९१)

१९८२: स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा आचार्य कॄपलानी यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)

१९९८: केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते ए. म. स. नंबूदिरिपाद यांचे निधन. (जन्म: १३ जून १९०९)

२००२: यष्टीरक्षक आणि फलंदाज नरेन ताम्हाणे यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १९३१)

२००५: डेलोरेअन मोटर कंपनी चे सहसंस्थापक जॉन डेलोरेअन यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १९२५)

२००८: विज्ञान कथालेखक व संशोधक सर आर्थर सी. क्लार्क यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १९१७)
चालू घडामोडी व दिनविशेष - १९ मार्च २०१९ चालू घडामोडी व दिनविशेष - १९ मार्च २०१९ Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 19, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.