पणजी : आधुनिक गोव्याचे शिल्पकार असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे फक्त गोव्यातीलच नव्हे तर भारतीय राजकारणातील एक आश्वासक चेहरा हरपला आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पणजी येथे दिवंगत मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पणजी, गोवा येथील कला अकादमीमध्ये ठेवण्यात आले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन,केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मनोहर पर्रिकर यांचे अंत्यदर्शन घेतले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनीही पुष्पचक्र अर्पण करुन अंत्यदर्शन घेतले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की, अत्यंत साधी राहणी असलेल्या श्री. पर्रिकर यांची निर्णय क्षमता उच्च दर्जाची होती. ही निर्णय क्षमता आणि पारदर्शी कारभार या गोष्टींमुळे त्यांचे राजकारणातील वेगळेपण अधोरेखित होते. गोव्याच्या राजकारणात त्यांनी पारदर्शकता आणली. सर्वांनाच मोठ्या व्यक्तीसारखे आणि मोठ्या मित्रासारखे असे ते होते. आज देशाने एक सच्चा सुपुत्र गमावला आहे. त्यांची कमतरता आम्हाला कायमच जाणवेल.
पणजी येथील मिरामार किनाऱ्यावर सायंकाळी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी कला अकादमी ते मिरामार किनारा अशी अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेमध्ये गोवा राज्यातील सर्व मंत्री महोदय, आमदार, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जलसंपदामंत्री गिरीष महाजन, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते. हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडून नौदलाने त्यांना मानवंदना दिली. मान्यवरांच्या उपस्थितीत मिरामार किनाऱ्यावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने आश्वासक चेहरा हरपला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 19, 2019
Rating:
No comments: