Seo Services
Seo Services

पुणे 'म्हाडा' मंडळाच्या सदनिका सोडतीसाठी; ऑनलाईन अर्ज नोंदणीला प्रारंभ

Image result for म्हाडा

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या विविध गृहनिर्माण योजनेतील ४७५६ सदनिकांच्या विक्री सोडतीसाठी अर्जदारांची नोंदणी, ऑनलाईन अर्ज भरणे या प्रक्रियेचा शुभारंभ 'म्हाडा' चे माननीय अध्यक्ष श्री. उदय सामंत यांच्या  हस्ते आज करण्यात आला. येथील मंडळाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला पुणे मंडळाचे सभापती समरजितसिंह घाटगे, मुख्य अधिकारी अशोक पाटील आदी उपस्थित होते.    
  
मंडळातर्फे सोडतीकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत दि. ०३ मे, २०१९  रोजी सकाळी दहा वाजता अल्प बचत भवन, ७ क्वीन्स गार्डन, कौन्सिल हॉल मागे, कॅम्प, पुणे येथे काढण्यात येणार आहे. मंडळांतर्गत उभारण्यात आलेल्या सदनिकांच्या संगणकीय सोडतींकरिता माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या सोडतीकरिता अर्जदारांची नोंदणी दि. ०२ मार्च, २०१९ सकाळी १२ वाजेपासून दि. १२ एप्रिल, २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत केली जाणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांना दि. ०३ मार्च, २०१९ सकाळी १० वाजेपासून दि. १२ एप्रिल, २०१९ रोजी रात्री ११. वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. याच कालावधीत नोंदणीकृत अर्जदारांना अनामत रक्कम भरता येणार आहे.

या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तळेगाव दाभाडे (पुणे), सांगली, म्हाळुंगे (पुणे), करमाळा (जि. सोलापूर) येथील अत्यल्प गटातील १६६२ सदनिकांचा समावेश आहे.  म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत म्हाळुंगे (पुणे), बालाजी पार्क (कोल्हापूर) येथे ३०५ सदनिका अत्यल्प गटासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अल्प उत्पन्न गटाकरिता म्हाळुंगे इंगळे (पुणे), शिवाजीनगर सोलापूर, बालाजी पार्क (कोल्हापूर), दिवे (ता. पुरंदर), सांगली येथील ६१२ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता म्हाळुंगे इंगळे (पुणे), शिवाजी नगर सोलापूर, जुळे सोलापूर, दिवे (ता. पुरंदर) सासवड (ता. पुरंदर), सांगली, पिंपरी वाघिरे येथील  ९७३ सदनिकांचा समावेश आहे. उच्च उत्पन्न गटाकरिता जुळे सोलापूर, पिंपरी वाघिरे (पुणे) येथील ३४६ सदनिकांचा समावेश आहे.

२० टक्के अंतर्गत सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगर पालिका हद्दीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी २०६ सदनिका आहेत. पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीत ६३९ सदनिकांचा समावेश आहे. सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जदारांनीं कागदपत्रे सादर करण्यासाठी दि. ४ मे, २०१९ रोजी सकाळी १० वाजेपासून दि. ३१ मे, २०१९ रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत मुदत देण्यात आली आहे. 
अत्यल्प उत्पन्न गटाकरिता कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा रू. २५,००० पर्यंत आवश्यक आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता रू. २५,००१ ते रू. ५०,०००, मध्यम उत्पन्न गटाकरिता रू. ५०,००१ ते रू. ७५,००० पर्यंत आहे.  उच्च उत्पन्न गटाकरिता रू. ७५,००१ व त्यापेक्षा जास्त कौटुंबिक मासिक उत्पन्न असणे गरजेचे आहे.     

सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजन्ट नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास नाशिक व औरंगाबाद मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन 'म्हाडा'तर्फे करण्यात आले आहे.


पुणे 'म्हाडा' मंडळाच्या सदनिका सोडतीसाठी; ऑनलाईन अर्ज नोंदणीला प्रारंभ पुणे 'म्हाडा' मंडळाच्या सदनिका सोडतीसाठी; ऑनलाईन अर्ज नोंदणीला प्रारंभ Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 03, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.