
आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी नागरिक सजग
मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ‘सी-व्हिजिल’ ॲपच्या माध्यमातून नागरिकांकडून आचारसंहिता भंगाबाबत 3 हजार 211 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. आचारसंहितेच्या अंमलबजावणीमध्ये या ॲपच्या माध्यमातून नागरिकही सजगतेने भाग घेत आहेत,अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस, आयकर विभाग, अबकारी कर विभाग आदी विभागांकडून कार्यवाही सुरू आहे. या विभागांनी आतापर्यंत 118कोटी 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 44 कोटी 22लाख रुपये रोकड, 22 कोटी 5 लाख रुपये किमतीची 28 कोटी 47 लाख लिटर दारु, 6.30 कोटी रुपयांचे मादक पदार्थ, 45.47 कोटी रुपयांचे सोने, चांदी व इतर मौल्यवान जवाहिर यांचा समावेश आहे.
राज्यात आचारसंहिता भंग व निवडणूक प्रक्रियेशी निगडीत इतर स्वरुपाचे 15हजार 95 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत 337 गुन्हे, लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत 48 गुन्हे,अनधिकृतरित्या दारू बाळगणे, विक्री, वाटपासाठी दारूची वाहतूक अशा स्वरुपाचे 13 हजार 702 गुन्हे, बेकायदेशीररित्या शस्त्र, जिलेटीन व इतर स्वरूपाचे स्फोटक पदार्थ बाळगणे आदींबाबत 601 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नशेचे पदार्थ (नारकोटिक्स ड्रग्ज) बाळगल्याबाबतचे 111, स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत 12 गुन्हे, अन्न व औषध अधिनियमांतर्गत 52, इतर 9 गुन्हे आदींचा समावेश आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत शस्त्र परवानाधारकाकडून 40 हजार 97 शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. सूचना देऊनही जमा न केलेली 30 शस्त्रे जप्त करण्यात आली असून 135 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय शस्त्र अधिनियमांतर्गत 1350 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
‘सी-व्हिजिल’ ॲपवर आतापर्यंत दाखल 3 हजार 211 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 1 हजार 866 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून त्यामध्ये जिल्हा स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. या ॲपवर अनधिकृत दारू,मतदारांना आमिष म्हणून दारुचे वाटप, पैशाचा वापर, विनापरवानगी पोस्टर लावणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आदी स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
‘सी-व्हिजिल’ ॲपवर सव्वातीन हजार तक्रारी
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 18, 2019
Rating:

No comments: