मुंबई : उत्तर प्रदेशात यंदा गेल्यावेळी एवढय़ा यशाची अपेक्षा नसल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रित केले आहे.
आतापर्यंत पाच जाहीर सभांमध्ये त्यांची भाषणे झाली असून, आणखी तीन-चार सभा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसमधील दरी वाढविण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न केला आहे.
प्रचाराच्या काळात मोदी यांची राज्यातील पाचवी सभा अहमदनगरमध्ये झाली. आतापर्यंत वर्धा, गोंदिया, नांदेड, औसा या ठिकाणी मोदी यांच्या जाहीर सभा झाल्या आहेत. १७ एप्रिलला अकलूजमध्ये सभा होणार आहे. मुंबईत २६ एप्रिलला सभा होणार असून, पुणे किंवा बारामतीमध्ये सभा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आणखी काही मतदारसंघांमध्ये सभा आयोजित करण्याची मागणी होत आहे. उत्तर प्रदेशच्या बरोबरीने महाराष्ट्रात मोदी यांच्या जाहीर सभा आयोजित केल्या जात असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी मोदी यांची सोलापूरमध्ये सभा झाली होती.
प्रचाराच्या सभांमध्ये मोदी काँग्रेसवर प्रहार करतात. राहुल गांधी यांच्यावर यथेच्छ टीका करतात. महाराष्ट्रात काँग्रेसबरोबरच शरद पवार यांनाही लक्ष्य केले जात आहे. वर्धा आणि गोंदियातील सभांमध्ये मोदी यांनी पवार यांना लक्ष्य केले होते. वध्र्यातील पहिल्याच सभेत राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षांचा उल्लेख केला होता. तर गोंदियातील सभेत तिहारमधील एका कैद्याचा आधार घेत राष्ट्रवादीला इशारा दिला होता. औसा आणि अहमदनगरमध्ये पवार आणि काँग्रेसमध्ये दरी वाढविण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला.
महाराष्ट्राकडे नरेंद्र मोदींचे अधिक लक्ष
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 13, 2019
Rating:
No comments: