देशातील शैक्षणिक संस्थांची रँकिंग जाहीर
नवी दिल्ली : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज देशातील शैक्षणिक संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग जाहीर करण्यात आली. देशातील सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये महाराष्ट्रातील ३ शैक्षणिक संस्थांचा 5 श्रेणींमध्ये समावेश आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात आज उच्च शैक्षणिक संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग-२०१९ जाहीर झाली. शिक्षण, शैक्षणिक साधने, संशोधन तसेच व्यावसायिक पद्धती या मापदंडांवर एकूण 8 श्रेणींमध्ये पहिल्या १० सर्वोत्कृष्ट संस्थांची यादी जाहीर करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील ३ संस्थाचा ५ श्रेणींमध्ये समावेश आहे.
शैक्षणिक क्षेत्रात समग्र रँकिंगमध्ये देशातील एकूण १० सर्वोत्कृष्ट संस्थांची निवड झाली असून भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी बॉम्बे) ने यात ४ था क्रमांक पटकावला आहे. यासह सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी संस्थाच्या श्रेणीमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी बॉम्बे) ने तिसरे स्थान तर सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांच्या श्रेणीमध्ये याच संस्थेने १० वा क्रमांक पटकाविला आहे. औषधीय संस्थांच्या श्रेणीमध्ये मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेने (आयसीटी मुंबई) चौथा क्रमांक पटकाविला आहे तर सर्वोत्कृष्ट १० विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे १० व्या क्रमांकावर आहे.
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट ८ शैक्षणिक संस्थांना विविध श्रेणींमध्ये यावेळी सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग-२०१९ मध्ये देशभरातील ४ हजार शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या.
राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील ३ शैक्षणिक संस्था
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 09, 2019
Rating:
No comments: