नवी दिल्ली : लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशात ३० पेक्षा जास्त जाहीर सभा, दुसऱ्या क्रमांकावरील महाराष्ट्रात नऊ सभा, महाराष्ट्रापेक्षा सहा जागा कमी असलेल्या पश्चिम बंगालमध्ये मात्र १७ सभा. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालला अधिक प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होते.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बसप यांची आघाडी झाल्याने २०१४ च्या तुलनेत कमी जागा मिळतील, असे भाजपचे गणित आहे. ही नुकसानभरपाई कुठून भरून काढता येईल याची चाचपणी भाजपने केली होती. पश्चिम बंगाल आणि ओदिशा या दोन पूर्वेकडील राज्यांमध्ये चांगली संधी असल्याचे लक्षात घेऊन भाजपने या दोन प्रांतवर लक्ष केंद्रित केले होते.
मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशला प्राधान्य दिले आहे. उत्तर प्रदेशात मोदी यांच्या आतापर्यंत ३१ सभा झाल्या. दुसऱ्या क्रमांकाच्या जागा असलेल्या महाराष्ट्रात मोदी यांच्या नऊ सभा झाल्या. या तुलनेत ४२ जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये मोदी यांच्या १७ सभा झाल्या. याचाच अर्थ उत्तर प्रदेशनंतर मोदी यांनी सर्वाधिक जास्त वेळ पश्चिम बंगालला दिला आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपला विधानसभा निवडणुकीत सत्ता गमवावी लागली या राज्यांमध्ये ६५ जागा आहेत. या राज्यांमध्ये मोदी यांच्या २० सभा झाल्या. ४० जागा असलेल्या बिहारमध्ये मोदी यांच्या १० सभा झाल्या. २५ जागा असलेल्या ईशान्येत मोदी यांनी आठ सभांमध्ये भाषणे केली.
पश्चिम बंगालला नरेंद्र मोदी यांचे प्राधान्य
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 18, 2019
Rating:
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 18, 2019
Rating:

No comments: