आता दीड लाखांऐवजी ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून, यात नागरिकांना आरोग्य संरक्षण ५ लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत दीड लाखांपर्यंत उपचाराची खर्च मर्यादा आहे. सुमारे २ कोटी कार्डसचे वाटप करण्यात येणार असून, रुग्णालयांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे.
या जन आरोग्य योजनेत सध्या मुत्रपिंड शस्त्रकियेसाठी असलेली अडीच लाख रुपयांची उपचार खर्चाची मर्यादा वाढवून ती साडे चार लाख रुपये एवढी करण्यात आली आहे. महात्मा फुले योजनेत ९९६ तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत १२०९ उपचार आहेत. यापैकी मागणी नसलेले १८१ उपचार वगळण्यात येतील. तर ३२८ नवीन उपचारांचा समावेश करण्यात येईल. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत देखील एकूण उपचार संख्येत १४७ वाढ होऊन, ती आता १३५६ एवढी होईल. हे जादाचे उपचार महात्मा जोतिराव फुले योजनेत देखील समाविष्ट होतील. त्यामुळे या योजनेत उपचार संख्या ३६० ने वाढेल.
या दोन्हीही आरोग्य योजनांमधील रुग्णालयांची संख्या एक हजार इतकी आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना याआधीच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात लागू करण्यात आली असून, महाराष्ट्रातील १४० व कर्नाटकातील सीमेलगतच्या चार जिल्ह्यातील १० अतिरिक्त रुग्णालये अंगीकृत करण्याचा निर्णय झाला आहे. याशिवाय आणखी दोनशे रुग्णालये देखील अंगीकृत करण्यात येतील.
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा समावेश देखील महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात येईल. त्याचप्रमाणे यासाठी असलेली ३० हजार रुपयांच्या उपचारांची खर्चाची मर्यादा वाढवून प्रतिरुग्ण प्रति अपघात एक लाख रुपये अशी करण्यात येईल. या योजनेत महाराष्ट्र सीमा भागातील रस्ते अपघातात जखमी झालेले महाराष्ट्र राज्या बाहेरील किंवा देशा बाहेरील रुग्णांचा देखील समावेश करण्यात येईल.
महात्मा ज्योतिराव फुले, आयुष्मान भारत आरोग्य योजनेचे एकत्रिकरण
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
June 28, 2023
Rating:
No comments: