Seo Services
Seo Services

विनाहेल्मेट, ट्रिपल सीट वाहनचालकांना मिळणार स्वयंचलित ई-चलन


Image result for विनाहेल्मेट

वसुधा महेश लोंढे

पुणे: शहरातील वाहतुकीचे प्रश्नांवर मात करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची उपकंपनी पुणे आइडिया फॅक्टरी फाउंडेशनने (पिफ) पुणे वाहतूक पोलिसांसोबत संयुक्त विद्यमाने पुढाकार घेतला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तथा आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर आधारित उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ आधारित विश्लेषणाच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्याचा हा पहिलाच प्रयोग ठरेल.

पुण्यातील एक अग्रगण्य स्टार्ट-अपच्या सहकार्याने  हा पथदर्शी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या संयुक्त उपक्रमात सुरुवातीला शहरातील सध्याच्या सीसीटीव्ही नेटवर्कमधील निवडक दहा कॅमेऱ्यांमधील फीडचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे चुकीच्या लेनमधून गाडी चालविणारे, दुचाकींवर ट्रिपल सीट जाणारे आणि हेल्मेट न वापरणारे वाहनचालक ओळखून त्यांना स्वयंचलित ई-चलनद्वारे दंड ठोठावणे शक्य होणार आहे.

वर उल्लेख केलेल्या बाबींपैकी काही समस्या पुण्यातील वाहतूक पोलिसांपुढे सातत्याने आव्हान निर्माण करत आहेत. या नव्या प्रकल्पामुळे हे नियम उल्लंघनाच्या घटना तंत्रज्ञानाच्या आधारे टिपणे व त्याला आळा घालणे शक्य होणार आहे. पुणे स्मार्ट सिटीच्या वतीनने तंत्रज्ञानाचा आणि डेटाचा वापर करून अशा विविध नवकल्पना राबविण्यासाठी अनेक उपक्रम प्रक्रियेमध्ये आहेत.

या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित व्हिडिओ अँनालिटिक्सच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरा फीडचे महत्त्वपूर्ण सखोल विश्लेषण करण्यात येईल. त्याच्या आधारे रस्ता सुरक्षेचे नियमन व सक्षमीकरण करता येणार आहे. हे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरूद्ध स्वयंचलित ई-चलन तयार करेल. प्रत्यक्ष उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे मर्यादित चौकांमध्येच देखरेख करणे शक्य होते. या मर्यादेवर आता स्मार्ट तंत्रज्ञानाद्वारे मात करता येईल.

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, पुणे पोलिसांकडे सध्या असलेल्या पायाभूत सुविधांमधून जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी हा पुढाकार आम्ही घेतला आहे. यामधून प्राप्त होणाऱ्या निष्कर्षांच्या अनुषंगाने जागतिक ट्रेंड लक्षात घेऊन पुणेकर नागरिकांच्या व्यापक हितासाठी हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरण्याचा विचार करण्यात येईल.

पीएससीडीसीएलचे मुख्य ज्ञान अधिकारी मनोजित बोस म्हणाले की, "पुणे स्मार्ट सिटीने नीती आयोग, पुणे विद्यापीठ आणि ऑस्टिन शहरासोबत हॅकेथॉनचे आयोजन केले होते. त्यामध्ये विजेता ठरलेल्या एका स्टार्टअप संघाला सोबत घेऊन पुणे स्मार्ट सिटीने हा उपक्रम हाती घेतला आहे. या स्टार्टअपला अंमलबजावणीची संधी प्रदान करण्याबरोबरच वाहतुकीच्या समस्यांवरील उपाययोजना राबविण्यात अद्यापपर्यंत उपलब्ध होत नसलेली क्रियाशील माहिती पुणे पोलिसांना याद्वारे उपलब्ध होणार आहे."

काय आहे हे तंत्रज्ञान?

आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. यामध्ये कृत्रिम पद्धतीने बौद्धिक व्यवहार करण्याचा अंतर्भाव या तंत्रज्ञानात होतो. तसेच, एम.एल. तथा मशीन लर्निंग हा आर्टिफिशल इंटेलिजन्सचा एक उपप्रकार आहे. ते डेटामधून माहिती प्रक्रिया करणाऱ्या अल्गोरिदमशी संबंधित तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा वापर या प्रकल्पामध्ये करण्यात येत आहे.
विनाहेल्मेट, ट्रिपल सीट वाहनचालकांना मिळणार स्वयंचलित ई-चलन विनाहेल्मेट, ट्रिपल सीट वाहनचालकांना मिळणार स्वयंचलित ई-चलन Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on January 31, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.