जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा-दत्ता साने
पिंपरी : महामेट्रोद्वारे नाशिक फाटा येथे मेट्रोसाठी काम सुरू असताना पायलिंग रिंग मशीन कोसळल्याची घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मेट्रोकडून बेजबाबदारपणे काम केले जात आहे. सुरक्षितेची कोणतीही दक्षता घेतली जात नाही. या दुर्घटनेप्रकरणी महामेट्रो, महापालिकेचे जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.
महामेट्रोद्वारे नाशिक फाटा येथे मेट्रोचे काम सुरू असताना दुपारी अडीचच्या सुमारास पायलिंग रिंग मशिन अचानक कोसळले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी घटनास्थळी जाऊन दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी नगरसेवक शाम लांडे, विलास मडीगिरी, राजू बनसोडे हेही उपस्थित होते.
यानंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते साने म्हणाले, 'पुणे महामेट्रोकडून बेजबाबदारपणे पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे काम केले जात आहे. सुरक्षितेची काळजी घेतली जात नाही. महा मेट्रोची माहिती मागायला पत्रव्यवहार केला असता मेट्रोकडून कामाची माहिती देखील दिली जात नाही. सत्ताधा-यांचे त्याकडे दुर्लक्ष आहे. यापुढे महामेट्रोने सुरक्षिततेची काळजी घेऊन काम करावे. दोन्ही बाजूंनी सेफ्टी गार्ड असावेत. दिवसा वाहतूक जास्त असते त्यामुळे दिवसा काम करू नये. रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत काम करावे. दिवसा काम केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस काम बंद पाडेल, असा इशाराही साने यांनी दिला.
या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी. महामेट्रो, महापालिकेच्या जबाबदार अधिका-यांवर कडक कारवाई करावी. ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी अथवा काळ्या यादीत टाकावे. अशी मागणी त्यांनी केली. एवढी मोठी दुर्घटना घडली असताना सत्ताधारी पक्षातील एकही पदाधिकारी तिकडे फिरकला नाही. त्यांना जनतेचे काही देणे-घेणे राहिले नाही, असा आरोपही साने यांनी केला.
गरज असल्यास चौकशी करू : महापौर
महापौर राहुल जाधव म्हणाले, ''महामेट्रोची घडलेली घटना दुर्देवी आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिका-यांकडून मी माहिती घेतली होती. घटनास्थळी जावून पाहणी करणार आहे. चौकशीची आवश्यकता असल्यास चौकशी देखील केली जाईल. यापुढे महामेट्रोने जबाबदारी सांभाळून काम करावे. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मुदतीत काम पुर्ण करावे.
नाशिक फाटा येथे मेट्रोचं काम सुरू असताना अपघात, कोणतीही जीवित हानी नाही.
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
January 05, 2019
Rating:
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
January 05, 2019
Rating:

No comments: