वय १२ वर्षे; किताब आंतरराष्ट्रीय मास्टरचा - गोव्याच्या बुद्धिबळ क्षेत्रात मानाचा तुरा :
पणजी : एखाद्या खेळाची ओळख करून घेण्याच्या वयातच जर त्या खेळात प्रावीण्य मिळवले तर आर्श्चयच. अशीच आश्चर्यचकित करणारी कामगिरी गोव्याच्या अवघ्या १२ वर्षीय चिमुरड्याने केलीय. या चिमुरड्याच्या कामगिरीचे कौतुक आता संपूर्ण देशातून होत आहे. लेयॉन मेंडोन्सा हे नाव आता बुद्धिबळ क्षेत्राला परिचयाचे झाले आहे.
अवघ्या १२ वर्षीय या खेळाडूने १७ दिवसांत आंतरराष्ट्रीय मास्टरचा नॉर्म मिळवला. सर्बियातील स्पर्धांत जबरदस्त कामगिरी करीत त्याने तीन नॉर्म मिळवले. तीन स्पर्धांत २७ फेºयांत लेयॉनने १८.५ गुण मिळवले. आता तो २४४६ या मानांकन गुणांवर पोहचला आहे. त्याचा हा प्रवास लवकरच ग्रॅण्डमास्टरकडे जाणारा आहे. असे झाल्यास लेयॉन गोव्यातील सर्वात कमी वयाचा ‘ग्रण्डमास्टर’ म्हणूनही पुढे येईल. त्यामुळे त्याच्या पुढील कामगिरीकडे गोमंतकीय बुद्धिबळ क्षेत्राचे लक्ष असेल.
लेयॉन हा दोन वर्षांत अधिक प्रकाशात आला आहे. त्याचे कारण म्हणजे त्याचे चेन्नईतील प्रशिक्षक रमेश हे लेयॉन याला मार्गदर्शन करीत आहेत. बुद्धिबळासाठी संपूर्ण वेळ मिळावा यासाठी लेयॉनला चेन्नईच्या शाळेत दाखल करण्यात आले. या शाळेकडून त्याला स्पर्धांसाठी तसेच बुद्धिबळ खेळण्यासाठी पूर्ण सवलत दिली जात आहे.
हजेरीच्या टक्केवारीची कुठलीही अट नाही. त्यामुळे त्याला बिनधास्तपणे स्पर्धांत भाग घेता येते. आश्चर्य म्हणजे लेयॉनच्या वडिलांनी आपल्या मुलासाठी नोकरीवरही पाणी सोडले. लेयॉनसोबत सर्वाधिक वेळ देता यावा आणि त्याच्या प्रत्येक अडचणी समजून घेता याव्यात यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. लेयॉनची आई संध्या ही गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीला आहे. लेयॉनची मोठी बहीण ही सुद्धा चांगली कलाकार आहे. लेयॉनला बालपणापासून बुद्धिबळचे आकर्षण होते. त्याच्यातील बुद्धिबळचे कौशल्य विकसित झाले ते गेल्या दोन-तीन वर्षांत. लेयॉनची खेळाबद्दलची जिज्ञासा हेच त्याच्या यशाचे गमक असल्याचे त्याचे प्रशिक्षक सांगतात.
शांततेची एक संधी द्या, इम्रान खान यांचे पंतप्रधान मोदींना आवाहन :
पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई होऊ शकते त्यामुळे पाकिस्तान पार बिथरुन गेला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले आहे. आपण आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करु असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजस्थानमधील सभेनंतर इम्रान खान यांनी शांततेची संधी देण्याचे आवाहन केले आहे. दहशतवादाविरुद्ध संपूर्ण जगात एकमत आहे. पुलवामा कटाच्या सूत्रधारांना सोडणार नाही. यावेळी सर्वांचा हिशोब चुकता केला जाईल. सैन्य, सरकारवर विश्वास आहे. हा बदलेला भारत असून दहशतवादामुळे ज्या वेदना होत आहे त्या अजिबात सहन करणार नाही. दहशतवादाला कसे चिरडायचे ते आम्हाला चांगले कळते असे मोदी म्हणाले होते.
इम्रान खान यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. तेव्हा मी पठाणचा मुलगा असून शब्द पाळणार असे म्हणाले होते. बघू आता काय करतात असे मोदी सभेत म्हणाले होते. त्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. पंतप्रधान इम्रान खान आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्याचे ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करु. पंतप्रधान मोदींनी शांततेची एक संधी द्यावी असे त्यामध्ये म्हटले आहे.
निवडणुकीनंतर ‘मन की बात’मधून पुन्हा जनतेशी संवाद साधणार – नरेंद्र मोदी :
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु व्हायला आता काही काळच बाकी राहीला आहे. लवकरच प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन शेवटच्या ‘मन की बात’ द्वारे जनतेशी संवाद साधला. मात्र, निवडणुकीनंतरही आपण पुढील मन की बातमधून संवाद साधू असे म्हणत ही निवडणूक जिंकून पुन्हा पंतप्रधानपदी असू असा विश्वास यावेळी मोदींनी व्यक्त केला.
मोदी म्हणाले, पुढील दोन महिन्यांसाठी आम्ही सर्वजण निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त राहणार आहोत. मी स्वतः या निवडणुकीत उमेदवार आहे. निरोगी लोकशाही परंपरेचा सन्मान करताना पुढची ‘मन की बात’ मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी होईल. मार्च, एप्रिल आणि संपूर्ण मे महिना या तीन महिन्यांच्या काळात आमच्या सर्व भावना मी निवडणुकीनंतर नव्या विश्वासाने आपल्यासमोर पुन्हा एकदा ‘मन की बात’च्या माध्यमांतून मांडेन त्यानंतर अनेक वर्षे आपल्याशी संवाद साधत राहिन, अशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण पुन्हा पुढील सरकार स्थापन करु असा विश्वास व्यक्त केला.
तत्पूर्वी मोदी म्हणाले, आजची ‘मन की बात’ सुरु करताना आज मन भरुन आले आहे. दहा दिवसांपूर्वी भारतमातेने आपल्या वीर पुत्रांना गमावले. या पराक्रमी वीरांनी आपल्या सव्वाशे कोटी भारतीयांच्या संरक्षणासाठी स्वतःचे बलिदान दिले. देशवासीयांनी निश्चिंत रहावे यासाठी यासाठी आपल्या या शूर-विरांनी दिवसरात्र एक केले होते.
मोदी म्हणाले, आपल्या सैन्य दलांनी नेहमीच अतुलनिय शौर्य दाखवून दिले आहे. एकाबाजूला त्यांच्याकडे अशांत भागात शांतता प्रस्थापित करण्याचे कौशल्य आहे. दुसरीकडे ते दहशतवादाला त्यांच्या भाषेत कसे उत्तर द्यायचे याची त्यांना चांगली माहिती आहे.
नवीन घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जीएसटी ८ टक्क्यांवरुन १ टक्क्यावर :
नवी दिल्ली : नवीन घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. निर्माणाधीन घरांवरचा जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणला आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत सामान्यांना हा मोठा दिलासा देण्यात आला आहे. शिवाय सवलतींच्या घरांवरचा जीएसटीही 8 ऐवजी 1 टक्क्यांच्या कक्षेत आणण्यात आला आहे.
जीएसटी परिषदेच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला आहे. हे नवे दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. विशेष म्हणजे ज्यांची घरखरेदी आधीच झाली आहे, त्यांच्या हफ्त्यांवरही हे नवे दर लागू होणार आहेत. मात्र कररचनेतील या नव्या बदलानंतर बिल्डरांना इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी दावा दाखल करता येणार नाही.
चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये सवलतीच्या घराची मर्यादा 60 चौरस मीटर ठेवण्यात आली आहे. तसेच लहान शहरांमध्ये 90 चौरस मीटरचे घर सवलतीच्या श्रेणीमध्ये असणार आहे. ज्याची कमाल किंमत 45 लाख रुपये असेल. ही नवीन दरं एक एप्रिलपासून लागू होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत माहिती दिली आहे. रियल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी हे बदल केले असून यामुळे अधिकाधिक लोकांना याचा लाभ घेता येईल आणि बांधकाम क्षेत्राला या कपातीचा मोठा फायदा मिळेल',असं जेटली म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुंभमेळ्यात स्वच्छता करणाऱ्या कामगारांचे पाय धुतले :
प्रयागराज : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात स्नान केलं. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच गंगेत स्नान केलं. यावेळी संगममध्ये डुबकी मारल्यानंतर मोदींनी पूजाही केली. यावेळी त्यांच्यासोबत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयागराज दौऱ्याची खास गोष्ट म्हणजे त्यांना सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले. गंगा कुंभमेळ्यात सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा नरेंद्र मोदींनी अनोख्या पद्धतीने स्वच्छता सेवकांचा सन्मान केला. सफाई कर्मचाऱ्यांना यावेळी शॉलही देण्यात आली.
याआधी नरेंद्र मोदी 16 डिसेंबरला कुंभमेळ्यात आले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही संगममध्ये डुबकी मारली. संगममध्ये स्नान केल्यानंतर त्यांनी साधू-संतांसोबत आरतीही केली.
कुंभमेळ्यातील तीन स्नान झाले आहेत. आता 4 मार्चला शिवरात्रीचं स्नान होणार आहे. त्यावेळी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी येथे येणार असल्याचं बोललं जात आहे. 15 जानेवारीला सुरु झालेल्या कुंभमेळ्याची 4 मार्च सांगता होणार आहे.
विविध मागण्यांसाठी राज्यातील साडेचार हजार इंग्रजी शाळा आज बंद :
मुंबई : आपल्या विविध मागण्यासाठी आज राज्यातील 4 हजार 500 खाजगी विनाअनुदानित इंग्रजी शाळा बंद राहणार आहेत. या बंदला मुंबई स्कूल बस असोशिएननेसुद्धा पाठिंबा दिला आहे. राज्यातील सर्व खाजगी विनाअनुदानित शाळांसाठी स्कूल सेक्युरिटी अॅक्ट लागू करावा या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची तातडीने प्रतिपूर्ती करावी, राज्यातील सर्व खाजगी विनाअनुदानित शाळांसाठी स्कुल सेक्युरिटी अॅक्ट लागू करावा, अशा मागण्यांसाठी इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनने राज्यभरातील इंग्रजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळा बंदमध्ये राज्यातील 29 जिल्ह्यातील साडे चार हजार शाळा सहभागी होणार आहेत. ज्या इंग्रजी शाळांमध्ये प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा आहेत अशा शाळांना यामध्ये वगळण्यात आल्याचा ईसा संघटनेने सांगितले आहे.
1 नोव्हेंबर 2018 चा शासन निर्णय रद्द करावा, 18 नोव्हेंबर 2013 च्या शासन निर्णयात सुधारणा करावी, मोफत गणवेश, पुस्तके, पिशवी आणि अन्य साहित्य उपलब्ध करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी. याशिवाय स्वयं अर्थसाहाय्यित शाळांचा दर्जा वाढ होण्यासाठी तातडीने ऑनलाईन प्रक्रिया सुरू करावी, अशा काही महत्वाच्या मागण्याही करण्यात आल्या आहेत.
या शाळा बंदला मुंबई स्कुल बस असोशिएनने सुद्धा पाठिंबा दिला असून जवळपास मुंबईतील 140 इंग्रजी खाजगी विनाअनुदानित शाळाच्या बस आज बंद असणार आहेत.
दिनविशेष :
महत्वाच्या घटना
१८१८: ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.
१९३५: फॉक्स मॉथ विमानाद्वारे मुंबई – नागपूर – जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.
१९६८: मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९८६: जनआंदोलनाच्या रेट्यामुळे २० वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.
१९९६: स्वर्गदारा तील तार्याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले.
जन्म
१८९४: आध्यात्मिक गुरू अवतार मेहेरबाबा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी १९६९ – मेहराझाद, पिंपळगाव, अहमदनगर, महाराष्ट्र)
१९४३: बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक जॉर्ज हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: २९ नोव्हेंबर २००१)
१९७४: हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९९३)
मृत्यू
१५९९: संत एकनाथ यांचे निधन.
१९७८: प्राच्यविद्यासंशोधक डॉ. प. ल. वैद्य यांचे निधन. (जन्म: २९ जून १८९१)
१९८०: लेखिका व नाटककार गिरजाबाई महादेव केळकर यांचे निधन.
१९९९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सीबोर्ग यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १९१२)
२००१: ऑस्ट्रेलियन फलंदाज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)
चालू घडामोडी व दिनविशेष - २५ फेब्रुवारी २०१९
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
February 25, 2019
Rating:
No comments: