Seo Services
Seo Services

दहशतवाद मुळापासून उखडून काढण्यासाठी पुलवामा हल्ल्यातील जवानांचे हौतात्म्य देशवासियांना अथक प्रेरणा देत राहील - पंतप्रधान

नवी दिल्ली : दहशतवाद मुळापासून उखडून काढण्यासाठी पुलवामा हल्ल्यातील जवानांचे हौतात्म्य देशवासियांना अथक प्रेरणा देत राहील आणि लोकांचा निर्धार अधिक दृढ करत राहील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.

आकाशवणीवरून 53 व्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पण सर्वांनी जातीवाद, संप्रदायवाद, क्षेत्रवाद आणि इतर सर्व मतभेदांना विसरून आज देशापुढे उभे ठाकलेल्या या आव्हानाला तोंड दिलं पाहिजे यावर त्यांनी भर दिला. देशातील लोकांचं जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी या शूर सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिल्याचं पंतप्रधानांनी सांगितले.

शांती प्रस्थापित करण्यासाठीही या शूर वीरांनी अद्भूत क्षमता दाखवली आहे. हल्लेखोरांना त्यांच्याच भाषेत सडेतोड प्रत्युत्तर देण्याचं काम त्यांनी केलं आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. 

पुलवामा हल्ला आणि शूर जवानांच्या हौतात्म्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट आहे असे सांगून दहशतवादी आणि त्यांना थारा देणाऱ्यांचा संपूर्ण उच्चाटन करण्याचा निर्धार लष्कराने केल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी वीर जवानांच्या कुटुंबियांच्या तसेच आपला दुसरा मुलगाही राष्ट्र सेवेसाठी अर्पण करणाऱ्यांच्या भावनांनाही सलाम केला. या कुटुंबियांनी मोठं धैर्य दाखवून ही देशप्रेमाची भावना व्यक्त केली आहे, ती आजच्या युवापिढीनं समजून- जाणून घ्यावी , असं आवाहन त्यांनी केलं.

राष्ट्राला उद्या समर्पित होणाऱ्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की देशाच्या सशस्त्र दलांचे मोठं ऋण चुकतं करण्याच्या दिशेने टाकलेले हे छोटे पाऊल आहे.

इंडिया गेट आणि अमर जवान ज्योतीच्या परिसरात असलेले हे स्मारक म्हणजे स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च बलिदान देणाऱ्यांप्रती देशाने व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचे प्रतिक आहे असे ते म्हणाले. या स्मारकाला देशवासियांनी दिलेली भेट पवित्र स्थानाला दिलेल्या भेटींप्रमाणेच असेल अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. हुतात्म्यांविषयी माहिती मिळवण्यासाठी तसेच आपली कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी लोक या स्मारकाला भेट देतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

ब्रिटिशांनी 3 मार्च 1900 रोजी बिरसा मुंडा यांना पकडल्याचा उल्लेख करणाऱ्या एका श्रोत्याने पाठवलेल्या पत्राविषयी बोलताना पंतप्रधान म्हणले की भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरुद्ध केवळ राजकीय स्वातंत्रयासाठीच लढा दिला नाही तर आदिवासींच्या आर्थिक आणि सामाजिक हक्कांसाठी लढा दिला.
पुढील महिन्यात 3 तारखेला ज्यांची जयंती साजरी होणार आहे त्या जमशेदजी टाटा यांचं स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की टाटा एक माहीम द्रष्टे होते ज्यांनी केवळ भारताचे उज्वल भविष्यच पाहिले नाही त्यासाठी मजबूत पायाही रचला. पंतप्रधानांनी 29 फेब्रुवारी जन्मलेले माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या योगदानाचेही स्मरण केले.

देशात लोकशाही धोक्यात असताना मोरारजी देसाई यांनी या कठीण काळात देशाला मार्ग दाखवला. तसेच आणीबाणी लागू करण्याविरुद्धच्या लढ्यात स्वतःला झोकूनही दिले. पद्म पुरस्कार विजेत्यांची कामगिरी अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा न धरता समाजातील तळागाळातील लोकांसाठी कार्य करणाऱ्यांचा देश सन्मान करत आहे असे ते म्हणाले. यावेळो पंतप्रधानांनी ओदिशातील दैतारी नायक, गुजरातमधील अब्दुल गफूर खत्री यांच्या कार्याचा उल्लेख केला.

यंदा प्रथमच 12 शेतकऱ्यांना पद्म।पुरस्काराने गौरविण्यात आल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची यशस्वीताही त्यांनी अधोरेखित केली.

पुढील काही आठवड्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.
मन की बात कार्यक्रम एक आगळा वेगळा अनुभव असल्याचे ते म्हणाले.

आगामी दोन महिन्यामध्ये आपण सर्वजण निवडणुकीच्या धामधुमीमध्ये व्यस्त असणार आहोत आणि सुदृढ लोकशाही परंपरांना मान देत मन की बातचा पुढील भाग मे महिन्याच्या अखेरच्या रविवारी प्रसारित होईल असे त्यांनी सांगितले.
दहशतवाद मुळापासून उखडून काढण्यासाठी पुलवामा हल्ल्यातील जवानांचे हौतात्म्य देशवासियांना अथक प्रेरणा देत राहील - पंतप्रधान दहशतवाद मुळापासून उखडून काढण्यासाठी पुलवामा हल्ल्यातील जवानांचे हौतात्म्य देशवासियांना अथक प्रेरणा देत राहील - पंतप्रधान Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 24, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.