Seo Services
Seo Services

चालू घडामोडी व दिनविशेष - २६ फेब्रुवारी २०१९

विश्वास नांगरे-पाटील नाशिकचे नवे पोलीस आयुक्त :

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची नाशिकलाबदली झाली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर, नाशिकचे आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांची औरंगाबादला बदली करण्यात आली आहे.

नाशिकचे नवनियुक्त पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील हे आजच आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. तर सिंघल यांची औरंगाबाद पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडूनही आजच पदभार स्वीकारला जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील एकूण 18 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकार्‍यांना मंत्रालयातून बदलीचा आदेशही जारी करण्यात आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बदली करण्यात आल्याचे समजते.

विश्वास नांगरे-पाटील हे एक बेधडक पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यात त्यांनी विशेष कामगिरी बजावली होती. आतापर्यंत मुंबई, ठाणे ग्रामीण, लातूर, अहमदनगर, पुणे ग्रामीण व कोल्हापूर अशा विविध विभागांत महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. महाराष्ट्रातील तरुणांचे प्रेरणास्थान असलेले पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांचा आयपीएसपर्यंत प्रवास अत्यंत कष्टप्रद आहे. पाटील हे मूळचे सांगलीचे आहेत. सांगलीतल्या शिराळा तालुक्यातील कोकरूड हे त्यांचे मूळ गाव. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन ते पोलिस सेवेत रुजू झाले.

अभिजित गुप्ताला विजेतेपद :

कान : ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता याने नवव्या आणि अखेरच्या फेरीत इटलीच्या लुईगी बास्सो याच्याविरुद्धचा डाव सहजपणे बरोबरीत सोडवत कान आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

अभिजितने ७.५ गुण पटकावून बेलारूसचा निकिता मायोरोव्ह, पोलंडचा नासूता ग्रेगोर्झ आणि युक्रेनचा युरी सोलोडोनिचेको या अव्वल प्रतिस्पध्र्याना मागे टाकून विजेतेपदाला गवसणी घातली. अभिजितने पहिले चार डाव जिंकून या स्पर्धेत धडाक्यात सुरुवात केली होती. त्यानंतर तीन बरोबरी आणि दोन विजय मिळवत अभिजितने विजेतेपदावर नाव कोरले. या विजेतेपदामुळे रेटिंग गुणांची कमाई करत अभिजितने २६०० रेटिंग गुण असलेल्या खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवले.

या वर्षी अभिजितने दिल्ली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. तो म्हणाला, ‘‘स्पर्धेच्या नऊ दिवसआधी माझा विवाहसोहळा पार पडल्याने लग्नाच्या धामधूमीत मी व्यग्र होतो. त्यामुळे मला या स्पर्धेची तयारी करता आली नाही. मात्र सुरुवातच चांगली झाल्याने माझ्यासाठी पुढील गोष्टी सोप्या होत गेल्या.’’

देशातील पहिलं ‘पॉड’ हॉटेल मुंबई सेंट्रल स्थानकावर :

मुंबई लोकलच्या पश्चिम मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकावर देशातील पहिल्या ‘पॉड’ हॉटेलची निर्मीती केली जाणार आहे. रेल्वे स्थानकावरील हे पहिले ‘पॉड’ हॉटेल मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर बनविण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून प्रवास करून आलेल्या किंवा उपनगरीय रेल्वे प्रवास करण्याऱ्या प्रवाशांना तात्पुरत्या निवासासाठी ‘पॉड’ हॉटेलची निर्मिती करण्यात येणार आहे. अत्याधुनिक, आरामदायी, आलिशान अशा लहान आकाराच्या पॉड खोल्यांची उभारणी करण्यात येणार आहे. आयआरसीटीसीकडून अशा ३० पॉड (खोल्या)ची उभारणी करण्यात येईल. या पॉड हॉटेलमध्ये तात्पुरत्या राहण्याची व्यवस्था प्रवासांसाठी उपलब्ध होईल. आयआरसीटीसीकडून या संदर्भात पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला पश्चिम रेल्व प्रशासनाकडून मंजुरी मिळाल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कमी खर्चात आणि कमी जागेत आधुनिक डिझाइनच्या पॉड हॉटेल उभारण्यात येईल. प्रवाशांना येथे राहण्याची उत्तम सोय होणार आहे. पॉड हॉटेलची संकल्पना सर्वप्रथम जपान देशात मांडण्यात आली. जपानने येथील प्रवाशांना, कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी, विश्रांतीसाठी जागा मिळावी, यासाठी पॉडची निर्मिती केली.

यामध्ये वाय-फाय, यूएसबी पोर्ट, टीव्ही, वातानुकूलित रूम, विश्रांतीसाठी आरामदायी व्यवस्था विद्युत दिवे (याचा प्रकाश कमी-जास्त करण्याची व्यवस्था) असतील. हवेशीर जागा, सरकते दरवाजे, स्मोक डिटेक्टर अशा विशेष सुविधांचा लाभ प्रवाशांना घेता येईल.

शहिदांच्या स्मृती जपणारं राष्ट्रीय युद्ध स्मारक आतून कसं दिसतं :

नवी दिल्ली: देशासाठी शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी नवी दिल्लीत उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं उद्धाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. यावेळी पंतप्रधानांनी देशावर आलेल्या संकटांचा निधड्या छातीनं सामना करणाऱ्या जवानांचं कौतुक केलं. देशावरील संकटांवेळी जवानांनी कायम स्वत:च्या छातीचा कोट केला आणि शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलं, असंदेखील यावेळी मोदी म्हणाले. 

इंडिया गेटजवळ राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारण्यात आलं आहे. जवळपास 40 एकर परिसरात हे स्मारक उभारण्यात आलं आहे. देशासाठी लढलेल्या जवानांची शौर्य गाथा या ठिकाणी ऐकता येईल. यासाठी 176 कोटी रुपये खर्च आला आहे.

1947 पासून देशासाठी शहीद झालेल्या 25 हजारांहून अधिक जवानांची नावं या ठिकाणी आहेत. या वास्तूच्या मध्यभागी 15 मीटर उंचीचा स्तंभ आहे. या ठिकाणी परमवीर चक्रानं गौरव करण्यात आलेल्या 21 जवानांच्या मूर्ती आहेत. 

भारतीय महिला क्रिकेट संघाकडून इंग्लंडचा सात विकेट्सनी धुव्वा, मालिकेत विजयी आघाडी :

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यावर भारतीय महिलांनी पुन्हा एकदा आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे.  दुसऱ्या वन डे सामन्यात भारताने इंग्लंडचा सात विकेट्सनी धुव्वा उडवत तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यात भारतीय महिलांनी इंग्लंडचा अवघ्या 161 धावांत खुर्दा उडवला. इंग्लंडकडून स्कायव्हरने 85 धावांची एकहाती झुंज दिली. भारताकडून झुलान गोस्वामी आणि शिखा पांडे या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी चार-चार विकेट्स घेतल्या. लेग स्पिनर पूनम यादवनं दोन विकेट्स काढून त्यांना साथ दिली.

इंग्लंडच्या अवघ्या 161 धावांचा पठलाग करताना सलामीच्या स्मृती मानधनाने पूनम राऊतच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची रचली. नंतर मिताली राजच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी रचली. स्मृतीने 63 धावांची, पूनमनं 32 आणि मितालीनं 47 धावांची खेळी उभारली.

भारताचा पाकवर एअर स्ट्राइक, ‘जैश’च्या तळावर फेकला हजार किलोचा बॉम्ब :

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब फेकल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. पाकिस्तान हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते.

१२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगितले जाते. तत्पूर्वी, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय वायूसेनेच्या विमानांनी एलओसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. या हल्ल्यात किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मात्र, या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानी लष्कराने भारतीय विमाने पीओके घुसल्याचे मान्य केले आहे. मात्र, त्यांनी मोठ्या नुकसानीचे वृत्त फेटाळले आहे.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार सुमारे १२ मिराज २००० लढाऊ विमानांनी सीमा पार करून दहशतवादी तळांवर हल्ला केला. यात दहशतवादी तळ पूर्णपणे उद्धवस्त झाले आहेत. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोटी येथील जैश ए मोहम्मदचे तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. उरी हल्ल्यानंतरही भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले होते.

दिनविशेष :
महत्वाच्या घटना 

१९२८: बाटून ख्रिश्चन बनलेल्या पिढीजात ख्रिश्चनांना परत हिंदु धर्मात घेण्याची सुरुवात झाली.

१९७६: वि. स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.

१९८४: इन्सॅट-१-ई हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित केला.

१९९८: परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.

१९९९: आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणार्‍या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड.

जन्म 

१८७४: प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ कलापि यांचा जन्म.

१९०८: भारतीय लेखिका लीला मुजुमदार यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल २००७)

मृत्यू 

१८७७: कोशकार व शिक्षणतज्ञ मेजर थॉमस कॅन्डी यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८०४)

१८८६: गुजराथी लेखक व समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १८३३)

१९०३: गटलिंग गन चे निर्माते रिचर्ड जॉर्डन गटलिंग यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १८१८)

१९३७: मानववंशशास्त्रज्ञ एल. के. अनंतकृष्ण अय्यर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १८६२)

१९६६: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन. (जन्म: २८ मे १८८३)

२००३: व्यंगचित्रकार राम वाईरकर  यांचे निधन.

२००४: केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे निधन. (जन्म: १४ जुलै १९२०)

२०१०: समाजसुधारक व संघप्रचारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६ – कडोळी, परभणी, महाराष्ट्र)
चालू घडामोडी व दिनविशेष - २६ फेब्रुवारी २०१९ चालू घडामोडी व दिनविशेष - २६ फेब्रुवारी २०१९ Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 26, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.