भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनवणार :
भारताला जगातील तिसरी व १० लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचा सरकारचा इरादा असून देशात असंख्य स्टार्ट अप, विद्युत वाहनांचा जास्त वापर असलेला देश बनवण्याचे आपले स्वप्न आहे. पूर्वीच्या सरकारच्या काळात मंत्रालयांमध्ये भ्रष्टाचारासाठी स्पर्धा होती; आता कार्यक्षमतेसाठी आहे , असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
ग्लोबल बिझिनेस शिखर बैठकीत त्यांनी सांगितले, की आम्हाला लकवा असलेली अर्थव्यवस्था मागील सरकारकडून वारशाने मिळाली. त्यात चलनवाढ होती, तसेच चालू खात्यावरील तूट वाढलेली होती. गेल्या चार वर्षांत आम्ही चित्र बदलून टाकले असून बदल आता समोर दिसत आहेत.
ते म्हणाले की, भाजपप्रणीत एनडीए सरकारने ७.४ टक्के विकास दर संपादन केला असून चलनवाढही ४.५ टक्कय़ांपेक्षा कमी आहे. वस्तू व सेवा कर सुधारणेमुळे एकूण राष्ट्रीय उत्पन्नात भर पडली आहे. देशातील १३० कोटी लोकांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार नवभारताची निर्मिती करीत असून आगामी काळातील आव्हाने पेलण्यास सज्ज आहोत. काँग्रेसच्या काळात आपण काहीच करू शकत नाही अशी भावना लोकांमध्ये होती. आता आपण सर्व काही करू शकतो अशी भावना देशात आहे.
भारत आता मंगळावर माणूस पाठवण्याचा विचार करीत आहे. प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर छप्पर असावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतात १०० स्मार्ट शहरे उभी राहात आहेत. १०० महत्त्वाकांक्षी जिल्ह्यंची प्रगती वेगान होते आहे. देशात वेगवान रेल्वेगाडी तयार करण्यात आली आहे, देशातील कोटय़वधी लोकांना वीज मिळाली असून आपला देश विजेचा निर्यातदार झाला आहे. देशातील लोकांमुळेच अशक्य ते शक्य झाले आहे.
'पंतप्रधान किसान सन्मान निधी'चं आज उद्घाटन, तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पेन्शन जमा होणार :
लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे 75 हजार कोटी रुपयांच्या 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने'चा शुभारंभ होणार आहे. जवळपास एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा केला जाणार आहे, अशी माहिती कृषी मंत्रालयातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
1 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने 2019-20 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने'ची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या 12 कोटी छोटय़ा शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तीन हप्त्यांमध्ये वर्षांला सहा हजार रुपये जमा करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी पहिला हप्ता आज/उद्या जमा केला जाणार आहे.
किसान सन्मान निधी योजना चालू आर्थिक वर्षापासून अंमलात आणण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना पहिला हप्ता मार्चपूर्वीच मिळणार आहे. उत्तर प्रदेश आणि कर्नाटकसह 14 राज्यांमधील शेतकऱ्यांना रविवारी पहिला हप्ता मिळणार आहे.
भारत मोठ्या कारवाईच्या तयारीत - डोनाल्ड ट्रम्प :
वॉशिंग्टन डी सी : पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, "पुलवामा हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. या हल्ल्यामुळे आगामी काळात मोठ्या घडामोडी घडतील. भारत पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईच्या तयारीत आहे."
ट्रम्प म्हणाले की, "पुलवामा हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये संबंध बिघडले आहेत. या हल्ल्यात भारताने 40 जवान गमावले आहेत. त्यामुळे भारतही मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे. दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती आहे. आम्ही हे सर्व थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत.
ट्रम्प यांनी सांगितले की, आम्ही पाकिस्तानला 1.3 बिलियन डॉलर्स (9 हजार 234 कोटी रुपये)मदत करत होतो. परंतु पाकिस्तानकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याने आम्ही ही मदत थांबवली आहे. यासंबंधी आम्ही पाकिस्तानसोबत बैठक घेणार आहेत.
पी. व्ही. सिंधूची ‘तेजस’ विमानातून भरारी :
भारताची आघाडीची बँडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने बंगळुरुत सुरु असलेल्या ‘एरो इंडिया, एअर शो’ मध्ये सहभाग घेतला. यावेळी सिंधूने भारतीय हवाईदलाच्या खात्यात नुकत्याच दाखल झालेल्या ‘तेजस’ विमानातून उड्डाणही केलं. यावेळी अनेक मान्यवर येथे उपस्थित होते. हवाई दलात महिला सैनिकांनी केलेल्या उत्तम कामगिरीचा गौरव करण्यासाठी सिंधूची तेजस विमानातून उड्डाण करण्यासाठी निवड करण्यात आली.
हिंदुस्थान एरोनॉटीकल लिमीटेड कंपनीद्वारे बनवण्यात आलेलं तेजस विमान नुकतच सर्व सोपस्कार पार पाडून हवाई दलाच्या खात्यात सहभागी झालं आहे. या विमानामुळे हवाई दलाच्या ताकदीत अजुन भर पडणार असल्याचं मत अनेक संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं. काही दिवसांपूर्वी भारताचे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनीही तेजस विमानातून उड्डाण केलं होतं.
दिनविशेष :
महत्वाच्या घटना
१६७०: राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म.
१८२२: जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्घाटन झाले.
१९१८: इस्टोनिया देशाला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९३८: ड्यु पाँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.
१९४२: व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.
१९५२: कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.
१९६१: मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.
२०१०: एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.
जन्म
१६७०: मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम, शिवाजी महाराजांचे चिरंजीव यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १७००)
१९४२: भारतीय तत्त्वज्ञानी गायत्री चक्रवर्ती यांचा जन्म.
१९४८: राजकारणी आणि दक्षिणेतील अभिनेत्री जे. जयललिता यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर २०१६)
१९५५: अॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर २०११)
मृत्यू
१६७४: कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात हे काव्य लिहिले आहे.
१८१०: हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ हेन्री कॅव्हँडिश यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर१७३१)
१८१५: अमेरिकन अभियंते व संशोधक रॉबर्ट फुल्टन यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १७६५ – लिटिल ब्रिटन, पेनसिल्व्हानिया, यू. एस. ए.)
१९३६: मराठी साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक यांचे निधन.
१९७५: सोविएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन यांचे निधन. (जन्म: ३० मार्च १८९५)
१९८६ भरतनाट्यम नर्तिका रुक्मिणीदेवी अरुंडेल यांचे निधन. (जन्म: २९ फेब्रुवारी १९०४)
२०११: अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९२९)
चालू घडामोडी २४ फेब्रुवारी २०१९
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
February 24, 2019
Rating:
No comments: