केंद्र सरकारचं मोठं गिफ्ट, महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला :
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारनं मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. हा भत्ता आधी नऊ टक्के होता, त्यामध्ये तीन टक्क्यांची भरत घालत 12 टक्के करण्यात आला आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यासंदर्भात माहिती दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करुन मोदी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. वाढ केलेल्या महागाई भत्त्याचा 1 जानेवारी 2019 पासून याचा लाभ मिळणार आहे. 48.41 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62.03 लाख निवृत्ती वेतनधारक मिळून तब्बल 1 कोटी 10 लाख 44 हजार लोकांना याचा फायदा होणार आहे.
आजच्या कॅबिनेट बैठकीत माध्यान्ह भोजन योजनेच्या नियमांमध्येदेखील सुधारणा करण्यात आली आहे. नव्या नियमांना कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. त्यामुळे वर्ष 2019-20 मध्ये या योजनेवर 12 हजार 54 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. अतिरिक्त रक्कम खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभाग देणार आहे.
‘अत्यंत भयानक’, पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया :
पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही अत्यंत भयानक परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण यासंबंधीचे सर्व रिपोर्ट्स तपासत असून याप्रकरणी लवकरच एक स्टेटमेंट जारी करणार असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले.याव्यतिरिक्त अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ता रॉबर्ट पालाडिने यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताला पूर्ण समर्थन दिलं असून या हल्ल्यासाठी जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यास पाकिस्तानला सांगितलं आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये संबंध ताणले गेले असून डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना दक्षिण आशियातील दोन्ही शेजारी देश एकत्र आले तर फार चांगलं होईल असं म्हटलं आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंबंधी एका प्रश्नाला उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, ‘मी पाहिलं आहे. मला अनेक रिपोर्ट्सही मिळाले आहेत. योग्य वेळी मी यावर प्रतिक्रिया देईन. जर पाकिस्तान आणि भारत एकत्र आले तर ही फार चांगली गोष्ट असेल’. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘पुलवामा दहशतवादी हल्ला अत्यंत भयानक परिस्थिती होती. आम्हाला रिपोर्ट्स मिळत आहेत. आम्ही यासंबंधी स्टेटमेंट जारी करु’.
प्रसिद्ध हिंदी लेखक नामवर सिंह यांचे निधन :
प्रसिद्ध हिंदी लेखक नामवर सिंह यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले आहे. ते ९३ वर्षाचे होते. मंगलवारी रात्री ११:५० वाजता एम्स रुग्णालयात नामवार सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार नामवर सिंह यांच्यावर बुधवारी दिल्लीतील लोधी रोडवर असलेल्या समशान घाटात दुपारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) मध्ये गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत होते. जानेवारी महिन्यात नामवर सिंह यांना चक्कर आल्यामुळे ते पडले होते. त्यावेळी त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. नामवार सिंह यांना गेल्या काही दिवसांपासून ब्रेन हॅमरेजचा आजार होता. त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाली होती.
नामवर सिंह यांचा जन्म २८ जुलै १९२७ रोजी वाराणसीमधील एका छोट्या गावात झाला होता. हिंदी साहित्यमध्ये त्यांनी एमए आणि पीएचडीचे शिक्षण घेतले आहे. त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. १९५९ मध्ये चकिया-चंदौलीमधून कम्युनिस्ट पार्टीकडून त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली आहे. पण त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.
छायावाद(1955), इतिहास आणि आलोचना(1957), कहानी : नयी कहानी (1964), कविताचे नविन प्रतिमान(1968), दूसरी परंपरा की खोज(1982), वाद विवाद आणि संवाद(1989) यासारख्या कादंबऱ्या त्यांनी लिहल्या आहेत.
तेलंगण मंत्रिमडळाचा विस्तार; दहा मंत्र्यांचा समावेश :
हैदराबाद : तेलंगणाचे सरकार दोन मंत्र्यांवरच चालवले जाणार की काय अशी चर्चा असतानाच अखेर मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार करण्यात आला असून त्यात दहा मंत्र्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळात एन. निरंजन रेड्डी, कोपुल्ला ईश्वर, इराबेली दिवाकर राव, व्ही. श्रीनिवास गौड, पेमुला प्रशांत रेड्डी, चे. मल्ला रेड्डी हे नवीन चेहरे आहेत. इंद्रकरण रेड्डी, तलासनी श्रीनिवास यादव, जी.जगदीश रेड्डी व एटला राजेंदर या जुन्या मंत्र्यांचे पुनरागमन झाले आहे.
आंध्र व तेलंगणचे राज्यपाल इ. एस. एल. नरसिंहन यांनी मंत्र्यांना राजभवनातील कार्यक्रमात अधिकारपदाची व गोपनीयतेची शपथ दिली त्यामुळे मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आता १२ झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे पुतणे व वरिष्ठ तेलंगण राष्ट्रीय समिती नेते टी. हरीश राव हे आधी पाटबंधारेमंत्री होते पण त्यांचे नाव मंत्र्यांच्या यादीत नव्हते. तेलंगण राष्ट्रीय समितीचे प्रमुख के. सी. राव यांचे पुत्र के. टी. रामाराव यांनाही मंत्री करण्यात आले नाही.
राव यांच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान मिळालेले नाही. रामाराव यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले होते. १३ डिसेंबरला महंमद महमूद अली यांच्यासह दोघांचा शपथ विधी झाला होता.
ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतील सोळा राज्यांचा न्यायालयात दावा :
वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठीच्या निधीसाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यामुळे त्यांच्यावर अमेरिकेतील सोळा राज्यांनी त्यांच्यावर न्यायालयात दावा दाखल केला आहे. स्वत:च्याच कृत्यांनी देशाला घटनात्मक संकटात टाकल्याचा आरोप त्यांच्यावर या राज्यांनी केला आहे.
ट्रम्प यांनी शुक्रवारी मेक्सिको सीमेवरही भिंत बांधण्यासाठी कोटय़वधी डॉलर्स खर्च करण्याचे जाहीर करून आणीबाणी घोषित केली. काँग्रेसने त्यांच्या या प्रस्तावासाठी काही रक्कम मंजूर केली असली तरी त्यांना जास्त रक्कम अपेक्षित होती. त्याच मुद्दय़ावर अमेरिकेत वर्षांच्या सुरुवातीला टाळेबंदीही झाली होती.
राष्ट्रीय आणीबाणी कायद्यानुसार अध्यक्षांना आणीबाणी जाहीर करून काही वैधानिक अधिकारान्वये निधी खुला करण्याचा अधिकार आहे. त्यावर सोळा राज्यांनी दाखल केलेल्या दाव्यात म्हटले आहे, की ट्रम्प यांनी आणीबाणी जाहीर करून निधी मिळवणे हे घटनाबाह्य़ व बेकायदेशीर आहे.
या राज्यांनी ट्रम्प यांच्यावर दावा दाखल केला आहे. सॅनफ्रान्सिस्को संघराज्याने जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात म्हटले आहे, की मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी निधी वळवण्याचा अध्यक्षांना अधिकार नाही, कारण खर्चावर काँग्रेसचे नियंत्रण असते. अध्यक्ष ट्रम्प यांनी देशाला घटनात्मक पेचप्रसंगात ढकलले असून, गेली काही वर्षे ते मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याचा प्रस्ताव मांडत आले आहेत.
इस्त्रायलची भारताला खंबीर साथ! बिनशर्त लागेल ती मदत करायला तयार :
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्त्रायलने भारताला बिनशर्त मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. महत्वाचं म्हणजे या मदतीमध्ये कुठलीही मर्यादा नसेल. भारताला लागेल तितकी मदत आणि सहकार्य करायला आम्ही तयार आहोत असे इस्त्रायलचे नवनियुक्त राजदूत डॉ. रॉन मल्का यांनी म्हटले आहे. इस्त्रायलने मोक्याच्या क्षणी भारताला साथ देण्याचा शब्द दिला आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे देशात युद्धज्वराचे वातावरण आहे. भारताने पाकिस्तानवर इस्त्रायलसारखी कारवाई करावी असा जनसामान्यांमध्ये मतप्रवाह आहे. जेरुसलेम भारताला कितपत मदत करु शकतो या प्रश्नावर डॉ. रॉन मल्का यांनी हे उत्तर दिले. मागच्या आठवडयात पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने काश्मीरमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. त्यामुळे देशात पाकिस्तानबद्दल प्रचंड रोष आहे.
भारताने सुद्धा इस्त्रायल सारखे धोरण अवलंबून कारवाई करावी अशी मागणी सर्व थरातून होत आहे. इस्त्रायल दहशतवादाविरुद्ध कठोर आणि वेगवान कारवाईसाठी ओळखला जातो. भारताला आपल्या संरक्षणासाठी जी काही गरज लागेल ती मदत करायला आम्ही तयार आहोत. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही आमच्या जवळच्या मित्राला लागेल ती मदत करु. दहशतवाद ही फक्त भारत आणि इस्त्रायलची नव्हे तर संपूर्ण जगाची समस्या आहे असे मल्का यांनी सांगितले.
जोकोव्हिचला चौथ्यांदा लॉरेओ पुरस्कार :
मोनाको : गतवर्षांत प्रतिष्ठित चार ग्रँडस्लॅमपैकी दोन स्पर्धाचे विजेतेपद मिळवणारा सर्बियाचा नामांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच याने सोमवारी मध्यरात्री चौथ्यांदा लॉरेओ जागतिक क्रीडा पुरस्कारावर नाव कोरले. वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. याव्यतिरिक्त जिम्नॅस्टिक खेळाडू सिमोन बाइल्स, गोल्फपटू टायगर वूड्स व फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या फ्रान्स संघानेसुद्धा मानाचे पुरस्कार पटकावले.
२०१८मध्ये जोकोव्हिचने विम्बल्डन व अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. त्याशिवाय या वर्षी जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेतही त्याने विजयश्री खेचून आणली. जोकोव्हिचला फ्रान्सचा फुटबॉलपटू किलियान एम्बाप्पे, एलिउड किपचोज आणि ली ब्रॉन जेम्स यांच्याकडून कडवी लढत मिळाली. मात्र अखेरीस जोकोव्हिचनेच बाजी मारली. जोकोव्हिचने विश्वातील वेगवान धावपटू उसेन बोल्टच्या चार पुरस्कारांशी बरोबरी केली असून पाच पुरस्कारांसह अव्वल स्थानावर असलेल्या रॉजर फेडररपेक्षा तो फक्त एका पुरस्काराने मागे आहे.
या पुरस्कारासाठी २०१८ या वर्षांतील कामगिरीचा आढावा घेण्यात आला होता. त्याशिवाय ६८ खेळाडूंना या पुरस्कारांसाठी नामांकन लाभले होते. महिलांमध्ये सिमोनने वर्षांतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवला. २०१७मध्येसुद्धा सिमोनने या पुरस्कारावर नाव कोरले होते. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षीच सिमोनने १४ जेतेपदे मिळवली आहेत.
मंगळ ग्रहावर जाण्यासाठी NASA ला हवाय 'जोकर', पण का :
अंतराळ वीर हे सामान्यपणे फार गंभीर किंवा शांत असतात. खरंतर त्यांच्यासाठी गंभीर असणं गरजेचंही आहे. जेणेकरून ते त्यांच्या कामावर पूर्ण लक्ष देऊ शकतील. पण NASA ची टीम काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात आहे. अंतराळ वीरांचा एक टीम २०३० मध्ये मंगळ ग्रहावरजाणार आहे. आता अशी माहिती समोर येत आहे की, नासाला या टीममध्ये 'जोकर' ची भरती करायची आहे.
हे आहे कारण - मीडिया रिपोर्टनुसार, नासाचं मिशन मार्स साधारण २ वर्षांसाठी असेल. या मिशनसाठी अशा लोकांचा शोध सुरू आहे जे टीमचा आत्मविश्वास कायम ठेवू शकेल. त्यांना टेन्शन येऊ नये म्हणून गमती जमती करेल. या जोकरचं नेमकं काय काम असेल यावर नासा मिशन ग्रुपकडून विचार सुरू आहे.
कठीण काळात फायदेशीर ठरतील हे लोक - यूनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडामध्ये एंथ्रोपॉलॉजीचे प्राध्यापक जेफरी जॉनसन यांनी सांगितले की, 'हे लोक कठीण आणि अडचणीच्या काळात पूर्ण टीमला एकत्र ठेवू शकतात. आम्ही अशा व्यक्तीचा शोध घेत आहोत, जो त्याचं काम चांगलं करेल आणि लोकांना हसवत ठेवेल. कारण इतक्या जास्त काळाचं मिशन असल्याने टीममधील लोकांना तणाव येणे सामान्य बाब आहे'.
केवळ हसवणेच नाही तर - प्राध्यापक जेफरी म्हणाले की, त्या व्यक्तीला केवळ हसवण्याची कला अवगत असावी असे नाही. हा व्यक्ती एक चांगला वैज्ञानिक आणि इंजिनिअर असायला हवा. त्याला एका ट्रेनिंग प्रोसेसमधूनही जायचं असेल.
याआधीही अशा अनुभव - प्राध्यापकांनी साऊथ पोलपर्यंत पोहोचणाऱ्या रोआल्ड एमंडसनचा उल्लेख करत सांगितले की, 'कॅप्टन स्कॉट ज्या कामात अयशस्वी झाले होते, ते काम रोआल्डने यशस्वीपणे केलं. असं झालं कारण त्यांच्या टीममध्ये एक आचारी होता. त्याचं नाव होतं अडॉल्फ लिंडस्ट्रॉम. तो फारच गमती स्वभावाचा होता. तो स्वत:ही आनंदी रहायचा आणि दुसऱ्यांनाही हसवायचा. याने टीमचा आत्मविश्वास नेहमी कायम राहत होता'.
दोन आठवड्यांचं वेळापत्रक जाहीर, लोकसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर पुढील सामने ठरणार :
मुंबई : आयपीएलच्या बाराव्या पर्वाचं अंशतः वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केलं आहे. 23 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीतील सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर पुढील टाईमटेबल ठरवण्यात येणार आहे.
आयपीएल 2019 चा सलामीचा सामना गतविजेते चेन्नई सुपरकिंग्ज हे बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सविरोधात खेळणार आहेत. चेन्नईत शनिवार 23 मार्चला हा सामना खेळवण्यात येईल.
'आयपीएल 12' च्या पहिल्या दोन आठवड्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातील लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार आयपीएलच्या आगामी पर्वाचं पुढील वेळापत्रक जाहीर होईल.
23 मार्च ते 5 एप्रिल या 14 दिवसांच्या कालावधीत 17 सामने खेळवले जाणार आहेत. 24, 30 आणि 31 मार्च या वीकेंडला प्रत्येकी दोन सामने होतील.
दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या कालावधीत प्रत्येकी पाच सामने खेळणार आहेत. तर उर्वरित सहा संघ प्रत्येकी चार सामने खेळतील.
तारीख दिवस वेळ संघ ठिकाण
23 मार्च शनिवार संध्याकाळ चेन्नई सुपरकिंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु चेन्नई
24 मार्च रविवार दुपार कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद कोलकाता
24 मार्च रविवार संध्याकाळ मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स मुंबई
25 मार्च सोमवार संध्याकाळ राजस्थान रॉयल्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब जयपूर
26 मार्च मंगळवार संध्याकाळ दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपरकिंग्ज दिल्ली
27 मार्च बुधवार संध्याकाळ कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब कोलकाता
28 मार्च गुरुवार संध्याकाळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. मुंबई इंडियन्स बंगळुरु
29 मार्च शुक्रवार संध्याकाळ सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स हैदराबाद
30 मार्च शनिवार दुपार किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स मोहाली
30 मार्च शनिवार संध्याकाळ दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली
31 मार्च रविवार दुपार सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हैदराबाद
31 मार्च रविवार संध्याकाळ चेन्नई सुपरकिंग्ज वि. राजस्थान रॉयल्स चेन्नई
1 एप्रिल सोमवार संध्याकाळ किंग्ज इलेव्हन पंजाब वि. दिल्ली कॅपिटल्स मोहाली
2 एप्रिल मंगळवार संध्याकाळ राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु जयपूर
3 एप्रिल बुधवार संध्याकाळ मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपरकिंग्ज मुंबई
4 एप्रिल गुरुवार संध्याकाळ दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद दिल्ली
5 एप्रिल शुक्रवार संध्याकाळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. कोलकाता नाईट रायडर्स बंगळुरु
दिनविशेष :
महत्वाच्या घटना
१७९२: अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.
१९७८: शेवटचा ऑर्डर ऑफ व्हिक्टरी सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.
१९८७: मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले.
२०१४: तेलंगण हे भारताचे २९ वे राज्य बनले.
जन्म
१९०४: रशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोसिजीन यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १९८०)
१९२५: जपानी सुमो ४४ वे योकोझुना तोचीनिशिकी कियोटाका यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९९०)
१९५१: इंग्लंडचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांचा जन्म.
मृत्यू
१९०५: भारतातील सर्कस उद्योगाचे जनक विष्णुपंत छत्रे यांचे निधन.
१९५०: स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर१८८९)
१९९३: प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स लॅम्बोर्गिनी कारचे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचे निधन.
१९९४: घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू त्र्यं. कृ. टोपे यांचे निधन.
२००१: केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९१९)
महत्वाची बातमी
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
February 20, 2019
Rating:
No comments: