Seo Services
Seo Services

भाडिपा ‘लोकमंच’ च्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांशी संवाद


नागपूर : तरुणाईच्या मनोरंजनाची हमखास हमी म्हणजे ‘भाडिपा’ अर्थात भारतीय डिजिटल पार्टी. ‘कॅज्युअल ए’ असं म्हणत मनोरंजनाला खुमासदार विनोदाचा तडका देणाऱ्या भाडिपा ने आता ‘शांतीत क्रांती’ करायचे ठरवले आहे. त्यासाठी भाडिपाने ‘विषय खोल’ या नव्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ‘लोकमंच’ हा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून तरुण मतदार आणि राजकारणी यांच्यातला संवादाचा दुवा साधण्याचं काम भाडिपाची टीम करणार आहे. या उपक्रमातंर्गत मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच नागपूर येथे जनतेशी संवाद साधला. ‘लोकमंच’च्या व्यासपीठावरून घेतली गेलेली ही पहिलीच मुलाखत होती.
  
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच औपचारिकता कमी करण्यासाठी ‘मला सतत ‘सर’ म्हणण्याची आवश्यकता नाही हे ‘कॅज्युअल ए’ असे मुलाखतकार निपुण धर्माधिकारीला सांगत मुख्यमंत्र्यांनी हशा आणि टाळ्या मिळवल्या. सोबतच रोजगार, कृषीमालाला हमीभाव, महिलांसाठी सार्वजनिक शौचालये, शासनाची बंद पडलेली संकेतस्थळे या सगळ्या मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला. पुण्यात सुरु असलेल्या अभियंत्यांच्या आंदोलनाबाबत ‘लोकमंचच्या’ व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका पहिल्यांदाच उघडपणे जाहीर केली. एका विद्यार्थिनीने महिलांसाठी सार्वजनिक शौचालयाच्या सोयी संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महिलांकरता शौचालये उभारण्यात आपण बरेच मागे आहोत याची कबुली देत सरकार त्यावर कार्यवाही करत असून येत्या काळात सरकार त्यावर काय ठोस पाऊलं उचलणार आहे याबाबत उपस्थितांना माहिती दिली.
शिवसेनेसोबतच्या राजकीय संबंधांवर निपुण ने गमतीशीर प्रश्न विचारल्यावर लगेचच ‘इट्स कॉम्प्लिकेटेड’ असे उत्तर देत त्यांनी टाळ्या मिळवल्या. त्याचसोबत गुन्हेगार पार्श्वभूमीचा मतदार निवडून न आणण्याची जबाबदारी पूर्णतः मतदारांची असते असं सांगत नोटा चा पर्याय न वापरता भरघोस मतदान करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना केले.
‘तुम्ही बोला आम्ही ऐकतोय! आम्ही शोध घेतोय तुमच्या शहरातल्या तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्यांचा, आता भांडण नको चर्चा करूया’ भाडिपा ‘लोकमंच’च्या या हाकेला आता जोरदार प्रतिसाद मिळतोय. पुढच्या काही दिवसात ते तुमच्याही शहरात दाखल होतील. ते तयार आहेत, तुम्हीही आहात ना?      
भाडिपा ‘लोकमंच’ च्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांशी संवाद  भाडिपा ‘लोकमंच’ च्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांशी संवाद Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 06, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.