Seo Services
Seo Services

 पं. उल्हास कशाळकर यांना यावर्षीचा ‘स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव’ पुरस्कार

तबलावादक मंदार प्रभुणे यांचा होणार पं. पद्माकर कुलकर्णी स्मृती गौरव पुरस्काराने गौरव

पिंपरी : संगीत सेवेसाठी दरवर्षी देण्यात येणारा ‘स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव पुरस्कार यावर्षी ग्वाल्हेर, जयपूर-आग्रा घराण्याचे जेष्ठ शास्त्रीय गायक पं. उल्हास कशाळकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड सोशल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणा-या स्वरसागर संगीत महोत्सवादरम्यान गुरुवार २८ फेब्रुवारी, २०१९ रोजी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पं. कशाळकर यांना हा प्रदान करण्यात येईल. रोख रुपये ५१ हजार, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
याबरोबरच ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा पं. पद्माकर कुलकर्णी स्मृती गौरव पुरस्कार यावर्षी तबलावादक मंदार प्रभुणे यांना प्रदान करण्यात येणार आहे. रोख रु. ११ हजार, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून स्वरसागर महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी याही पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड सोशल ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गालिंदे यांनी कळविली आहे.          
पं. उल्हास कशाळकर हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील मान्यवर गायक असून ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर अशा तीन घराण्यांच्या गायकीवर त्यांचे प्रभुत्व आहे. संगीताचे सुरुवातीचे धडे त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचा वारसा लाभलेले आपले वडील नागेश दत्तात्रय कशाळकर यांच्या हाताखाली गिरवले. गजाननबुवा जोशी आणि राम मराठे यांच्याकडे कशाळकर यांनी दीर्घकाळ संगीत शिक्षण घेतले. त्यानंतर राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांच्याकडेही त्यांनी संगीत शिक्षण घेतले.  निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रय विष्णू पलुसकर तथा बापुराव पलुसकर, मास्टर कृष्णराव, कुमार गंधर्व यांचा कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे. नागपूर विद्यापीठातून त्यांनी संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदकही मिळवले आहे.तर मंदार प्रभुणे हे एक आश्वासक तबलावादक असून त्यांनी वयाच्या ८ व्या वर्षापासून तबला शिकायला सुरुवात केली. कल्याणला स्वप्नील भाटे यांच्याकडे त्यांनी आपले तबला वादनाचे प्राथमिक शिक्षण घेतले, त्यानंतर त्यांनी निगडी येथे नारायण जगताप यांच्याकडे तबलावादनाचे धडे गिरविले व आता पं. अमेश मोघे यांच्याकडे त्यांचे शिक्षण सुरु आहे. याशिवाय मधुवंती देव यांच्याकडे यांच्याकडे त्यांचे गायनाचे शिक्षण सुरु आहे.

पुणे शहरालगतच असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील रसिक प्रेक्षक देखील सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध व्हावे, त्यांनाही शास्त्रीय संगीताबरोबर सांस्कृतिक मैफली अनुभवता याव्यात या उद्देशाने पिंपरी चिंचवड सोशल ट्रस्टच्या माध्यमातून स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून येत्या गुरुवार दि. २८ फेब्रुवारी ते शनिवार दि. २ मार्च, २०१९ दरम्यान सायंकाळी ६.३० ते १० या वेळेत निगडी प्राधिकरण सेक्टर क्रमांक २७ अ येथील सिटीप्राईड शाळेलगत भेळ चौकाजवळ असलेल्या मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश दिला जाईल. शरयू नगर प्रतिष्ठानच्या विशेष सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे हे या महोत्सवाचे मुख्य सल्लागार आहेत. याबरोबरच पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर हे महोत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक, महापौर राहुल जाधव हे स्वागताध्यक्ष तर पिंपरी चिंचवडचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे हे महोत्सवाचे सांस्कृतिक सल्लागार आहेत. या सांस्कृतिक महोत्सवात शास्त्रीय संगीताबरोबरच काव्य, नृत्य, साहित्य, लोकसंगीत, फ्युजन अनुभविण्याची संधी रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे.    
 पं. उल्हास कशाळकर यांना यावर्षीचा ‘स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव’ पुरस्कार  पं. उल्हास कशाळकर यांना यावर्षीचा ‘स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव’ पुरस्कार Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 27, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.