७५ देशांना भूमिका समजाविण्यात मिळाले यश :
नवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायात वेगळे पाडण्यात भारताला मुत्सद्देगिरीमुळे मोठे यश मिळाले आहे. जगातील जवळपास ७५ देशांना पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा आश्रयदाता बनल्याचे समजावून सांगण्यात भारत यशस्वी ठरला. त्यामुळे जगातील सर्व देशांनी भारताने केलेल्या हवाई कारवार्ईचे समर्थन केले आहे, तर पाकिस्तानने बुधवारी भारतीय हद्दीत घुसून केलेल्या हल्ल्याला कोणाही देशाने समर्थन दिले नाही. काही देशांनी मात्र दोन्ही देशांनी संयम पाळावा, असे आवाहन केले आहे.
आॅस्ट्रेलियाने आपल्या निवेदनात भारतीय कारवाईचे समर्थन करून जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तानच्या नावाचा उल्लेख करून अतिरेकी कारवायांना पाकने आवरावे, असा सल्ला दिला.
नियंत्रण रेषेपलीकडे भारताने केलेल्या कारवाईनंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री व इतर देशांच्या प्रतिनिधींशी थेट बोलून त्यांना भारताने कोणतीही लष्करी कारवाई केलेली नाही, तर फक्त दहशतवादाला नष्ट करण्यासाठी मोजक्या ठिकाणांना उद्ध्वस्त करण्याचे काम केले हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
चीनने दोन्ही देशांनी संयम बाळगण्यास सांगितले, तरी चीनचा कल पाहता त्याचे वर्तन व भाषा यांच्यात अंतर असते. आतापर्यंत चीनचा व्यापक पाठिंबा पाकिस्तानला मिळालेला आहे व त्याच बळावर तो भारताविरुद्ध आवाज चढवून बोलत असतो. चीन पाकिस्तानला शस्त्रास्त्रांपासून इतर सगळ्या प्रकारची मदत देत आला आहे.
एवढेच काय, मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांत चीनने संयुक्त राष्ट्रांत नकाराधिकाराचा वापर करून अडथळे आणले, पण चीनला भारताशी संबंध बिघडू द्यायचे नाहीत. संबंध चांगले राखण्यामागे मोठी भारतीय बाजारपेठेचे कारण आहे. या बाजारात तो आपली उत्पादने विकत असतो. चीन केवळ आपल्या आर्थिक आणि लष्करी स्वार्थासाठी आणि भारताला दुबळे करण्यासाठी पाकिस्तानसोबत आहे.
अभिनंदनचे वडील आहेत माजी एअर मार्शल, जाणून घ्या त्यांचे कारगिल आणि मिराज कनेक्शन :
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग २१ विमान कोसळले. या विमानातील वैमानिक बेपत्ता असल्याचं परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे. तर पाकिस्ताननं हा वैमानिक आपल्या ताब्यात असल्याचं म्हटलं आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान असं या वैमानिकाचं नाव आहे.
आता अभिनंदनला सुखरूप परत आणा असं त्याच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. याशिवाय सोशल मिडियावरही अनेक सेलिब्रिटीजने #BringBackAbhinandan तसेच #GivebackAbhinandhan हे हॅशटॅग वापरून अभिनंदला सुखरुप परत भारतात आणण्याची विनंती दोन्ही देशाच्या राज्यकर्त्यांकडे केली आहे. दरम्यान अभिनंदनचे वडीलही हवाई दलामध्ये कार्यरत होते अशी माहिती आता समोर येत आहे. अभिनंदनचे वडील सिमहाकुट्टी वर्थमान हे एअर मार्शल पदावर कार्यरत होते. त्यांनी ईस्टर्न एअर कमांड चीफ म्हणून हवाई दलात काम केले आहे. कारगिल युद्धाच्या काळतही महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या वैमानिकांपैकी ते एक होते. ते सध्या आपल्या सेवेतून निवृत्त झाले असून त्यांचा मुलगा अभिनंदन हा २००४ पासून हवाई दलामध्ये कार्यरत आहे.
सिमहाकुट्टी वर्थमान १९७३ साली भारतीय हवाई दलामध्ये वैमानिक म्हणून रुजू झाले. त्यांना एकूण चार हजार हून अधिक तास विमान उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांना ४० वेगवेगळ्या प्रकारच्या विमान उड्डाणाचा अनुभव आहे. २०११ साली भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, ‘सी. वर्थमान हे कारगिल युद्धाच्या वेळी ग्वालेयर येथील हवाई तुकडीचे प्रमुख होते. त्यांनी विमान उड्डाणाचा आपला अनुभव वापरत मिराज २००० च्या यशस्वी उड्डाणात महत्वपूर्ण कामगिरी केली. त्यांच्या या योगदानामुळे त्यावेळी भारतीय हवाई दलाला मोठे यश मिळाले.
’ योगायोग म्हणजे सी. वर्थमान यांनी कारगिलच्या वेळी ज्या मिराज २००० संदर्भातील महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली तीच विमाने २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यासाठी भारतीय हवाई दलाने वापरली. हाच हवाई हल्ल्याला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने एफ १६ विमाने भारतीय हवाई हद्दीत घुसवली.
पुलवामा हल्ल्याबाबत सुषमा यांची चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा :
पुलवामा आत्मघाती दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्या समवेत झालेल्या द्विपक्षीय चर्चेत उपस्थित केला. पुलवामा हल्ल्यानंतर मंगळवारी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून दहशतवादी छावण्यांवर हल्ले केले होते.
स्वराज यांनी सांगितले, की आमच्या देशात दु:ख व संतापाचे वातावरण असताना चीनला भेट देत असून, पाकिस्तानने केलेला दहशतवादी हल्ला हा भयानक होता. पाकिस्तानच्या जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणला होता, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान या हल्ल्यात शहीद झाले होते. पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी हा हल्ला करण्यात आला होता.
जैश ए महंमद ही संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित केलेली संघटना असून, पाकिस्तानने त्यांच्या बाजूने दहशतवाद्यांना पाठीशी घातले, त्यामुळे त्यांना हा हल्ला करणे शक्य झाले. पाकिस्तान दहशतवादी संघटनांना आश्रय देत आहे असे सुषमा स्वराज यांनी वँग यांना सांगितले. पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांनी एकमुखी निषेध केला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
आज सकाळी येथे आलेल्या स्वराज यांनी वँग यांना सांगितले, की या वर्षांत आपली ही पहिली द्विपक्षीय बैठक आहे. त्यात दोन्ही देश द्विपक्षीय संबंधात सहकार्य करण्याचा प्रयत्न करतील. भारत व चीन यांच्यातील संबंध दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे आहे. वुहान येथे पंतप्रधान मोदी व चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यातील बैठकीनंतर दोन्ही देशांतील संबंधात प्रगती झाली आहे. दोन्ही नेत्यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शनानुसार मार्गक्रमण करणे आवश्यक आहे.
‘जोपर्यंत पायलटला सोडत नाही तोपर्यंत पाकशी कोणतीच चर्चा नको’ :
जोपर्यंत ताब्यात घेतलेल्या वैमानिकाला पाकिस्तान सोडत नाही तोपर्यंत त्यांच्याशी भारताने कोणत्याही प्रकारची चर्चा किंवा बोलणी करु नयेत’, अशी मागणी निवृत्त ग्रुप कॅप्टन दिलीप पारुळकर यांनी केली आहे. 1965 आणि 1971 मध्ये झालेल्या युद्धामध्ये पारुळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर 1972 मध्ये युद्धकैदी असताना ते चकमा देऊन पाकिस्तानातून सुखरुप पळून आले होते.
10 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने भारताचं सुखोई-7 फायटर जेट पाडलं, त्यानंतर पारुळकर यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं होतं. पाकिस्तानच्या रावळपिंडीमधील युद्धबंदीच्या शिबीरात त्यांना ठेवलं असाताना 1972 मध्ये पारुळकर, विंग कमांडर एम.एस.ग्रेवाल (Wing Commander M S Grewal), ग्रुप कॅप्टन हरिष सिंझी(Group Captain Harish Sinhji) आणि अन्य काही भारतीय वैमानिकांनी त्या शिबीरातून पाकिस्तान सैन्याला चकमा देत पळ काढला.
‘जर तुम्ही पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागलात किंवा त्यांनी तुम्हाला ताब्यात घेतलं आणि युद्धकैदी बनवलं तर तुम्हाला तेथून पळून यायचं’ असं आमच्या वरिष्ठांनी सांगितलं होतं, आणि मी त्यांचं म्हणणं गांभीर्याने घेतलं, असं सांगत पारुळकर यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्या आठवणी ताज्या केल्या.
‘जेव्हा मला पाकिस्तानने पकडलं होतं, तो माझ्या कुटुंबियांसाठी अत्यंत कठिण काळ होता. पण भारतीय सैनिकांच्या पराक्रमामागे सातत्याने त्यांच्या कणखर कुटुंबियांचा पाठिंबा असतो हे कुणीही विसरु नये…आणि अशा परिस्थितीत देशाने कठोर भूमिका घेणं गरजेचं असतं. पूर्वीच्या अशाच काही घटनांमध्ये इस्त्राइलने कशाप्रकारे उत्तर दिलं होतं याचं मी नेहमी उदाहरण देतो. त्यांच्याप्रमाणेच भारतानेही कठोर भूमिका घ्यायला हवी आणि जोपर्यंत ताब्यात घेतलेल्या भारतीय वैमानिकाला पाकिस्तान सुखरुपरित्या सोडत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची बोलणी करु नयेत’, अशी मागणी पारुळकर यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना केली.
मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा, अधिवेशन रद्द करण्याचा विचार :
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या सुरक्षा आढावा बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्याचा विचार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला मुंबई पोलिस आयुक्त सुबोध कुमार जैस्वाल आणि डीजी दत्ता पडसलगीकर उपस्थित होते.
मुंबई आणि महाराष्ट्रातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा बैठकीत घेण्यात आला. सध्या सगळीकडे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सध्या राज्याच्या अधिवेशनाच्या बंदोबस्तात पाच हजार पोलिस तैनात आहेत. याशिवाय अधिवेशनावर येणाऱ्या मोर्चांसाठी 1500 पोलिसांचा बंदोबस्त आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर हा पोलिस बंदोबस्त इतरत्र वापरता यावा यासाठी अधिवेशन रद्द करण्याचा विचार सुरु आहे.
अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि राज्यातील आमदार विधानभवनात परिसरात असल्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर अधिक ताण येतो. सर्व व्हीआयपी एकाच ठिकाणी जमत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर जास्त संवेदनशील होत असल्याचंही म्हटलं जात आहे.
भारतीयांचा ‘क्लीन स्वीप’चा निर्धार :
मुंबई : आधीच मालिका खिशात घातलेला भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध गुरुवारी होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात बाजी मारुन ३-० असा ‘क्लीन स्वीप’करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.
भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला ६६ धावांनी धूळ चारल्यानंतर दुसºया एकदिवसीय सामन्यात ७ बळींनी पराभूत केले होते. या जोरावर भारताने आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये ४ गुणांची कमाई केली. भारताला याचा लाभ २०२१ च्या विश्वचषकाची थेट पात्रता मिळविण्यासाठी होऊ शकतो.
प्रशिक्षक डब्ल्यू.व्ही. रमण यांच्या मार्गदर्शनात भारत विजयी मार्गावर परतला असून सलामीवीर स्मृती मानधना उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अनुभवी मितालीने दोन सामन्यात अनुक्रमे ४४ व ४७ धावा केल्या. पूनम राऊतनेही मधल्या फळीत योगदान दिले असून जेमिमा रॉड्रिग्जचे मोलाचे योगदान राहिले. दीप्ती शर्मा, मोना मेश्राम व यष्टिरक्षक तानिया भाटिया यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
गोलंदाजीत अनुभवी झुलन गोस्वामी, शिखा पांडे, दीप्ती शर्मा, पूनम यादव व एकता बिश्त यांनी जबाबदारी चोखपणे बजावली आहे.
अष्टपैलू सोफी एकलेस्टोन दुखापतीमुळे दौºयाबाहेर गेली आहे. यामुळे संघात योग्य ताळमेळ साधण्याचे आव्हान इंग्लंडपुढे आहे.
दिनविशेष :
राष्ट्रीय विज्ञान दिन
महत्वाच्या घटना
१८४९: अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनार्यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले.
१९२८: डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.
१९४०: बास्केटबॉल खेळ प्रथमच टेलेव्हिजन वर प्रक्षेपित झाला.
जन्म
१८७३: सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९५४)
१८९७: मराठी ग्रंथकार डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७४)
१९०१: रसायनशास्त्रज्ञ लिनस कार्ल पॉलिंग यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९९४)
१९२७: भारताचे १० वे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै २००२)
१९२९: भारतीय-अमेरिकन संशोधन रंगास्वामी श्रीनिवासन यांचा जन्म.
१९४२: द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक ब्रायन जोन्स यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १९६९)
१९४८: ग्वाल्हेर-किराणा-जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका विदुषी पद्मा तळवलकर यांचा जन्म.
मृत्यू
१९२६: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १८७४ – नाशिक)
१९३६: पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १८९९)
१९६३: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १८८४)
१९६६: आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १८९८)
१९६७: टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक हेन्री लूस यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १८९८)
१९८६: स्वीडनचे २६ वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांची हत्या. (जन्म: ३० जानेवारी १९२७)
१९९५: कथा, संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १९१४)
चालू घडामोडी व दिनविशेष - २८ फेब्रुवारी २०१९
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
February 28, 2019
Rating:
No comments: