पिंपरी : नागरिकांच्या प्रश्नांवर वारंवार तक्रारी करूनही पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत प्रशासनाला जागे करण्यासाठी नगरसेविका माया बारणे यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशव्दारावर ‘जागरण गोंधळ’ घालत, अनोखे आंदोलन केले.
नगरसेविका माया बारणे यांनी यावेळी सांगितले की, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी थेरगाव मधील प्रभाग क्रमांक २४ चा काही दिवसांपूर्वी पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यात सर्व्हे नंबर १४ सोलाना हाऊसिंग सोसायटी व सर्व्हे नंबर २७ मध्ये सुखवानी चावला या बांधकाम व्यावसायिकांना सदर ठिकाणी १२ मीटर रुंदीचा रस्ता अस्तित्वात नसताना या बांधकाम व्यावसायिकांना कोणत्या आधारे बांधकाम परवानगी विभागाने मंजुरी दिली, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आपण त्यावेळी आयुक्तांकडे केली होती. परंतु, एक महिना उलटूनही अद्याप त्या प्रकरणाची चौकशी झालेली नाही.
राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्वसामान्य नागरिकांनी अनधिकृत बांधकामे केली म्हणून त्यांना शास्तीकर लावला. परंतु ज्या बांधकाम व्यावसायिकांनी अधिकृत परवानगी घेऊन अनाधिकृत बांधकामे केली अशा बांधकामावरती महापालिकेकडून कोणतीही कारवाई होत नाही. महापालिकेच्या नियमानुसार पूर्णत्वाचा दाखला न घेता बांधकाम व्यावसायिकांनी निवासी किंवा अनिवासी वापर केला, तर महापालिकेच्या धोरणानुसार दंड होणे अपेक्षित आहे. परंतु, बऱ्याच बांधकाम व्यवसायिकांनी बांधकाम पूर्ण होऊन सुद्धा पूर्णत्वाचा दाखला घेतलेला नाही. अशा बांधकाम व्यावसायिकांना दंड होणे अपेक्षित आहे. परंतु त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही.
तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कँनबेरी या संस्थेला नागरिकांच्या पाणी मीटरचे मीटर रिडींग घेणे व पाणीपट्टी बिल देणे हे काम दिले आहे. परंतु या संस्थेविरुद्ध नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी आहेत. सदर संस्थेवर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. असा आरोप करीत या कामचुकार प्रशासनाला जागे करण्यासाठी आपण जागरण गोंधळ आंदोलन केल्याचे नगरसेविका माया बारणे यांनी सांगितले.
नगरसेविका माया बारणेंनी महापालिकेच्या प्रवेशव्दारावर घातला ‘जागरण गोंधळ’,केला प्रशासनाचा निषेध
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 04, 2019
Rating:
No comments: