Seo Services
Seo Services

अनोळखी व्यक्तीला घर भाडय़ाने देताना खातरजमा करा!

Image result for घर भाडय़ाने


पुणे : शहरात घरांची खरेदी-विक्री करताना तसेच घर, जागा भाडय़ाने देताना अनोळखी व्यक्तीची खातरजमा केल्यानंतरच व्यवहार करा, असे आवाहन असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट्स (एरिआ) या संघटनेकडून शहरातील घर, जागा मालकांना तसेच दलालांना करण्यात आले आहे. देशद्रोही कारवायांच्या पाश्र्वभूमीवर हे आवाहन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

एरिआ संघटनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 'एरिआ'चे अध्यक्ष सचिन शिंगवी म्हणाले, जागा, घर, दुकान, कार्यालये यांची खरेदी-विक्री करताना तसेच जागा, दुकाने भाडय़ाने देताना दलाल (इस्टेट एजंट) मध्यस्थी करतात. अशा वेळी शहरातील सर्व एजंट आणि जागा मालकांनी व्यवहार करताना पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे. वृत्तपत्रातील जाहिराती आणि ऑनलाइन संकेतस्थळावरून व्यवहार करताना संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती घ्यावी. त्याचा आधार क्रमांक, ओळखपत्राचे पुरावे, छायाचित्र घेण्यात यावे. ही कागदपत्रे मिळाल्यानंतर व्यक्तिगत पातळीवर पडताळणी करण्यात यावी, असे संघटनेच्या सदस्यांना सांगण्यात आले आहे.

देशात सध्या तणावाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत संभाव्य देशद्रोही कारवाया विचारात घेऊन प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे. त्यासाठी आवाहन केल्याचे शिंगवी यांनी सांगितले.

कागदपत्रांशिवाय कोणताही व्यवहार करू नये. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पोलिसांचे ऑनलाइन टेनंट व्हेरिफिकेशन करून घ्यावे, असेही आवाहन संघटनेने केले आहे. संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र चौकसे, सचिव राजेंद्र दोशी आदी पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते.

संशयिताला ओळखण्याचे प्रशिक्षण

घातपाती कारवायांमध्ये गुंतलेले दहशतवादी भाडेतत्त्वावर घरे घेतात. यापूर्वी शहरात झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयित पुण्यात वास्तव्यास होते. एक ते दोन महिने कालावधीसाठी त्यांनी शहरात वास्तव्य केल्याचे तपासात समजले होते. त्यांना भाडेतत्त्वावर जागा देणाऱ्या घरमालकांनी तेव्हा शहानिशा केली नसल्याचे उघडकीस आले होते. या पाश्र्वभूमीवर 'एरिआ'कडून लवकरच जागा खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या दलालांसाठी संशयित कसा ओळखावा, यासाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार असल्याचे शिंगवी यांनी सांगितले.

अनेकांकडून काणाडोळा

शहरात मोठय़ा संख्येने बाहेरगावचे तसेच परप्रांतातील नागरिक वास्तव्यास आहेत. घर भाडय़ाने देताना अनेक घरमालक तसेच एजंट्स व्यवहाराची माहिती पोलिसांना देत नाहीत. ही माहिती पोलिसांना न देणे हा गुन्हा आहे. अशांवर पोलिसांकडून खटले दाखल करण्यात येतात. चोरटे तसेच घातपाती कारवायांमध्ये गुंतलेल्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी घर भाडय़ाने देताना नोंदणी सक्ती बंधनकारक केली आहे. मात्र, पोलिसांच्या आवाहनाकडे अनेक जण काणाडोळा करतात. पोलिसांकडून याबाबत सातत्याने आवाहन करण्यात येत असल्याने एजंट्स आणि घरमालकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे.
अनोळखी व्यक्तीला घर भाडय़ाने देताना खातरजमा करा! अनोळखी व्यक्तीला घर भाडय़ाने देताना खातरजमा करा! Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 04, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.