Seo Services
Seo Services

चालू घडामोडी व दिनविशेष - २३ मार्च २०१९


नरेंद्र मोदींच्या 'पाकिस्तान नॅशनल डे'निमित्त शुभेच्छा, इम्रान खानचा दावा :

इस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला राष्ट्रीय पाकिस्तान दिनाच्या (नॅशनल पाकिस्तान डे)शुभेच्छा दिल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. इम्रान खान यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान असे देखील बोलले जात आहे की, भारताच्या पंतप्रधानांनी इतर देशांच्या राष्ट्रीय दिवसनिमित्त किंवा राष्ट्रीय सणानिमित्त शुभेच्छा देणे हा औपचारिकतेचा भाग आहे,

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे पाकिस्तान नॅशनल डेनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांवर भारताने बहिष्कार घातला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला 'नॅशनल पाकिस्तान डे'च्या शुभेच्छा दिल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.

इम्रान खान यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये सांगितले आहे की, नरेंद्र मोदी शुभेच्छा संदेशात म्हणतात, मी नरेंद्र मोदी 'पाकिस्तान नॅशनल डे'निमित्त पाकिस्तानी जनतेला शुभेच्छा देतो. उपखंडातील जनतेने दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त वातावरणात लोकशाही, शांतता आणि प्रगतीशील क्षेत्राच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याची ही योग्य वेळ आहे."

दुसऱ्या एका ट्वीटमध्ये इम्नान खान यांनी नरेंद्र मोदींच्या शुभेच्छांचा स्वीकार केला आहे. दोन्ही देशांमधील प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करण्याची वेळ आली असल्याचे मत इम्रान यांनी मांडले आहे.

१४२ वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये बदल, खेळाडूंच्या पोशाखावर नाव आणि नंबर :

कसोटी क्रिकेट हा अजुनही अनेक चाहत्यांसाठी आस्थेचा विषय आहे. वन-डे आणि टी-२० क्रिकेटच्या जमान्यात कसोटी क्रिकेट तग धरेल का असा सवाल आपण अनेक वर्ष ऐकत आहोत. मात्र आता कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल १४२ वर्षांनी एक बदल होण्याची शक्यता आहे. लवकरच कसोटी क्रिकेटच्या पांढऱ्या पोशाखावर आता खेळाडूंचे क्रमांक आणि नावं येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१८७७ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात खेळाडूंच्या पोशाखावर नाव आणि क्रमांक टाकले होते. मात्र यानंतर आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये एकच पद्धत चालत आलेली आहे. २०१९ साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या Ashes कसोटी मालिकेने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होते आहे. कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षकांचा ओढा वाढावा यासाठी या बदलाची शिफारस आयसीसीकडे करण्यात आलेली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या पोशाखावर त्याचं नाव लिहीलेलं नसल्यामुळे अनेकदा सामन्यादरम्यान, त्यांना ओळखण कठीण होऊन बसतं. त्यातच कसोटी क्रिकेटला प्रेक्षकांची रोडावलेली संख्या हा मुद्दा चर्चेत असताना, प्रेक्षकांना पुन्हा एकदा मैदानात खेचून आणण्यासाठी आयसीसी या प्रस्तावाला मान्यता देण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. मात्र या शिफारसीवर आयसीसीसीने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नाहीये.

गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरकारच्या मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर :

पणजी : गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळातील खातेवाटप करण्यात आले आहे. राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या मान्यतेनुसार मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडे असलेली खाती समान ठेवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे अर्थ, गृह, पर्सनल, उद्योग, खाण, वन, शिक्षण, पर्यावरण खाती आहेत.

उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, वाहतूक, नदी परिवहन आणि संग्रहालय खाती देण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे नगर नियोजन, कृषी, पुरातत्त्व, कारखाने व बाष्पक खाते देण्यात आले आहे. मनोहर (बाबू) आजगावकर यांच्याकडे पर्यटन, क्रीडा, छापखाना खाते सोपवण्यात आले आहे.

इतर मंत्र्यांची खाती :

रोहन खंवटे : महसूल, आयटी, रोजगार आणि मजूर खाते
विश्वजीत राणे : आरोग्य, अन्न आणि औषध प्रशासन, हस्तकला प्रशिक्षण खाते
गोविंद गावडे : अनुसूचित जमाती कल्याण, कला आणि संस्कृती, नागरी पुरवठा खाते
माविन गुदिन्हो : पंचायत, शिष्टाचार, पशूसंवर्धन खाते
जयेश साळगावकर : गृहनिर्माण, बंदर कप्तान, ग्रामीण विकास खाते
विनोद पालयेकर : जलसंसाधन, मच्छिमार, वजन आणि माप खाते
निलेश काब्राल : वीज, सौर ऊर्जा, कायदा आणि न्याय खाते
मिलिंद नाईक : समाज कल्याण आणि नगर विकास खाते

ब्रेक्झिटसाठी आता ब्रिटनपुढे दोन पर्याय, विलंबाची शक्यता :

ब्रसेल्स : ब्रिटनला युरोपीय समुदायातून काडीमोड घेण्यासाठीच्या माघारी करारावर युरोपीय नेत्यांनी दोन पर्याय दिले आहेत. त्यात योग्य पद्धतीने ब्रेक्झिटसाठी ब्रिटनला काहीसा उशीर झाला तरी चालेल यावर पंतप्रधान थेरेसा मे व युरोपीय नेत्यांच्या चर्चेत मतैक्य झाले आहे.

ब्रिटनसमोर आता युरोपीय समुदायातून बाहेर पडण्यासाठी २९ मार्चची कालमर्यादा आहे, पण युरोपीय समुदायातील सहकाऱ्यांनी सांगितले की, ब्रिटीश खासदार जर माघारी कराराला पुढील आठवडय़ात मान्यता देण्यास तयार असतील तर २२ मे पर्यंत मुदत वाढवून देण्याची युरोपीय समुदायाची तयारी आहे, पण जर हाऊस ऑफ कॉमन्सने माघारीबाबतचा समझोता करार फेटाळला तर १२ एप्रिलला ब्रेक्झिट करावे लागेल पण त्यासाठी युरोपीय समुदायाच्या संसदीय निवडणुकात सहभागी व्हायचे का नाही याचा निर्णय ब्रिटनला घ्यावा लागणार आहे.

युरोपीय समुदाय मंडळाचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी सांगितले की, १२ एप्रिल ही ब्रिटनसाठी महत्त्वाची कालमर्यादा आहे. त्यात त्यांनी निवडणुकीत सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय घ्यायचा आहे.

२३ ते २६ मे दरम्यान या निवडणुका होणार असून त्यात सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय घेण्यास ब्रिटनला काही काळ लागणार आहे. युरोपीय समुदायातून बाहेर पडण्यासाठी मतदान केल्यानंतर तीन वर्षांनी लोकांना युरोपीय संसदेच्या निवडणुकीसाठी मतदान करायला लावणे मला योग्य वाटत नाही असे मत पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्यक्त केले आहे.

आयपीएलचा ‘महासंग्राम’ आजपासून, सलामीला धोनीच्या ‘सुपरकिंग्ज’चे कोहलीच्या बेंगळुरुपुढे तगडे ‘चॅलेंज’ :

चेन्नई - आयपीएलच्या बाराव्या हंगामाला आज, शनिवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज संघ विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाशी खेळणार आहे. चेन्नईच्या मैदानावर हा सामना रंगणार असल्यामुळे या सामन्याला चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतील, अशी आशा आहे. दरम्यान, या सामन्यासाठी विराट कोहली आणि धोनी यांनीही कसून सराव केला.

कोहली अ‍ॅन्ड कंपनीने धोनीच्या धुरंधरांना त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारली तर बेंगळुरुसाठी हा सर्वांत मोठा श्रीगणेशा ठरणार आहे. चेन्नई संघात ३० वर्षांवरील खेळाडू आहेत. धोनी आणि शेन वॉटसन हे दोघे ३७, तर ड्वेन ब्राव्हो ३५, फाफ डुप्लेसिस ३४ तसेच अंबाती रायुडू आणि केदार जाधव ३३, सुरेश रैना ३२, फिरकीपटू इम्रान ताहिर ३९ आणि हरभजनसिंग ३८ वर्षांचा आहे. राष्टीय संघाबाहेर असलेला कर्ण शर्मा ३१ आणि वेगवान गोलंदाज मोहित शर्मा ३० वर्षांचा आहे.

या संघाने वयावर मात करीत आयपीएलचे सामने गाजविले हे विशेष. नेहमी अव्वल चार संघात राहून चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधीही दिली. चेन्नई संघ तीनवेळेचा विजेता असला तरी बेंगळुरू संघात अनेक दिग्गज आहेत पण एकदाही त्यांना जेतेपद पटकविता आले नाही. पहिल्या सामन्याचा निकाल गोलंदाजांच्या कामगिरीवर तसेच दडपण झेलण्याच्या खेळाडूंच्या क्षमतेवर विसंबून असेल.

चेन्नईकडून अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजा हे तसेच बेंगळुरु संघातून वेगवान उमेश यादव चांगल्या कामगिरीच्या बळावर विश्वचषकासाठी राष्टीय संघात स्थान मिळविण्यास इच्छुक आहेत.

फुटिरतावादी नेत्यांना निमंत्रण; पाकिस्तान दिनाच्या कार्यक्रमावर भारताकडून बहिष्कार :

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पाककडून जम्मू-काश्मीरधील फुटिरतावादी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पाकच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या दुतावासामध्ये साजऱ्या होणाऱ्या या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त नवी दिल्लीत २३ मार्च रोजी संध्याकाळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमाला भारताचा एकही प्रतिनिधी न पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी दिली.



रविशकुमार म्हणाले, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांदरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे. मात्र, तरीही पाकिस्तानने काश्मीर खोऱ्यातील फुटिरतावादी आणि हुर्रियत नेत्यांना निमंत्रण दिले आहे. याचा भारताने तीव्र विरोध केला असून त्यासाठी भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला आपला प्रतिनिधी हजेरी लावणार नाही.

काश्मीर खोऱ्यातील फुटिरतावादी नेत्यांनी नेहमीच पाकिस्तानची बाजू घेतली आहे. तसेच इथल्या जनतेला धर्माच्या आणि स्वातंत्र्याच्या नावाने भारताविरोधात भडकावण्याचे काम करीत असतात. भारतातील दहशतवादी कारवायांसाठी या फुटिरतावाद्यांकडून पैसाही पुरवण्यात येतो. त्यामुळे अशा लोकांना पाकिस्तानकडून देण्यात आलेल्या निमंत्रणाचा भारताने विरोध केला आहे.

दिनविशेष :
जागतिक हवामान दिन

जागतिक क्षयरोग दिन

महत्वाच्या घटना 

१९९९ लता मंगेशकर व पंडीत भीमसेन जोशी ’पद्म भूषण’ पुरस्कार व सचिन तेंडुलकर, सुलोचना यांना ’पद्मश्री’ पुरस्कार मिळाला.

१९९९ : पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना ‘पद्मविभूषण’ सन्मानाने गौरविेण्यात आले.

१९९९ : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना ‘पद्मश्री’ सन्मान प्रदान करण्यात आला.

१९८० : प्रकाश पदुकोण याने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय आहे.

१९५६ : पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.

१९४० : संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत

१९३१ : सॉन्डर्सचा वध करणार्‍या भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी देण्यात आले.

जन्म 

१९१० : डॉ. राम मनोहर लोहिया.

१९२६ : रविंद्र पिंगे.

१९५३ : किरण मुजूमदार शॉ – भारतीय महिला उद्योजक

१९३१ : व्हिक्टर कॉर्चनॉय – रशियन बुद्धीबळपटू १९२३ : हेमू कलाणी – क्रांतिकारक (मृत्यू: २१ जानेवारी १९४३)

१९१६ : हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)

१९१० : डॉ. राम मनोहर लोहिया – समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक. १९३२ मधे ’मिठाचा सत्याग्रह’ या विषयावरील प्रबंधाकरता त्यांना बर्लिन विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिली. इंग्रजीचे ते उत्तम जाणकार होते . मात्र त्यांना इंग्रजीची गुलामी मान्य नव्हती. इंग्रजी येत असुनही ‘अंग्रेजी हटाओ‘ ही चळवळ त्यांनी चालविली होती. (मृत्यू: १२ आक्टोबर १९६७)

१८९८ : नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका (मृत्यू: २४ डिसेंबर १९७७)

मृत्यू 

१९३१ सरदार भगतसिंग, सुखदेव, शिवराम राजगुरु या तिघांना लाहोर तुरुंगामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता फ़ाशी देण्यात आली. हे क्रांतीकारक देशासाठी हसतहसत फ़ासावर चढले. हुतात्म्यांचं पुण्यस्मरण.

२०११ : एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री (जन्म: २७ फेब्रुवारी १९३२)

२००८ : गणपत पाटील – मराठी चित्रपट कलाकार (जन्म: १९१८?)

१९३१ : भगत सिंग – क्रांतिकारक (जन्म: २८ सप्टेंबर १९०७)

१९३१ : ’सुखदेव’ थापर – क्रांतिकारक (जन्म: १५ मे १९०७)

१९३१ : शिवराम हरी ’राजगुरू’ – क्रांतिकारक (जन्म: २४ ऑगस्ट १९०८)
चालू घडामोडी व दिनविशेष - २३ मार्च २०१९ चालू घडामोडी व दिनविशेष - २३ मार्च २०१९ Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 23, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.