Seo Services
Seo Services

उमेदवारांनी कुटुंबाची आणि विदेशातील मालमत्ताही जाहीर करावी


Image result for उमेदवारांनी


पुणे : लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आता स्वत:च्या मालमत्तेची माहिती देण्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावावरील मालमत्तेची माहिती प्रतिज्ञापत्रावर निवडणूक आयोगाला सादर करावी लागणार आहे. मागील पाच वर्षांची ही माहिती असणार असून, कुटुंबाच्या नावावर असलेली विदेशातील मालमत्ताही दाखवावी लागणार आहे. त्यामुळे कागदोपत्री 'गरीब' दाखविले जाणारे अनेक उमेदवार आता श्रीमंतांच्या रांगेत जाऊन बसणार आहेत. त्याचबरोबर स्वत:च्या नावे कोणतीही मालमत्ता नसल्याचे दाखवून गरिबीचे सोंग घेणाऱ्या उमेदवारांचा खरा चेहरा मतदारांच्या समोर येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा उमेदवारी अर्जामध्ये बदल केला आहे. त्यानुसार आता उमेदवारांना स्वत:ची माहिती देण्याबरोबरच कुटुंबातील सदस्यांच्या नावावरील मालमत्तेची माहिती प्रतिज्ञापत्रावर देण्याची सक्ती करण्यात आली आहे. उमेदवारी अर्जामध्ये उमेदवाराला वैयक्तिक माहिती भरून द्यावी लागते. त्यामध्ये उमेदवाराच्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत, ही माहिती असते. त्या प्रत्येक सदस्याच्या नावावर असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती देणे आवश्यक आहे. त्याबरोबर कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असलेली विदेशातील गुंतवणूक आणि बँकांकडे असलेली थकबाकी याचाही तपशील सादर करावा लागणार आहे. मागील पाच वर्षांची ही माहिती असणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यांवरही नजर ठेवली जाणार आहे. कुटुंबातील सदस्याच्या खात्यांतून मोठी रक्कम काढण्यात आली किंवा भरण्यात आली, तर त्याचा तपशील बँकांना आयोगाकडे द्यावा लागणार आहे. त्यावरची लक्ष ठेवण्यात येणार आहे.

आतापर्यंत निवडणूक आयोगाकडून केवळ उमेदवाराच्या नावावरील मालमत्तेचा तपशील घेण्यात येत होता. प्रतिज्ञापत्रावर ही माहिती उमेदवारांना द्यावी लागत होती. ती माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर देण्यात येत असल्याने मतदारांना आपला उमेदवार हा गरीब आहे की श्रीमंत, हेही समजू शकते. त्याचबरोबर गेल्या निवडणुकीत उमेदवाराकडे असलेली मालमत्ता आणि पाच वर्षांनंतर त्याने मिळविलेली 'माया' याचाही तपशील मतदारांपर्यंत पोहोचतो. मात्र, अनेकदा उमेदवार हे स्वत:च्या नावावर मालमत्ता दाखविण्याऐवजी कुटुंबातील सदस्यांच्या नावावर मालमत्तांच्या नोंदी करतात. त्यामुळे उमेदवाराची खरी आर्थिक स्थिती मतदारांपर्यंत पोहोचत नाही. ही बाब विचारात घेऊन निवडणूक आयोगाने उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरील मालमत्तेची माहिती प्रतिज्ञापत्रावर देण्याची अट घातली आहे. या निर्णयामुळे कुटुंबातील सदस्यांच्या नावावर मालमत्ता करून स्वत: मात्र गरीब असल्याचे भासविणाऱ्या उमेदवारांना चाप बसणार आहे.

दरम्यान, आपला उमेदवार कसा आहे, हे मतदारांना कळण्यासाठी मतदार केंद्रांबाहेर उमेदवारांविरूद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचे फलक लावण्याचे आदेश यापूर्वीच निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे उमेदवाराचे 'प्रताप' मतदारांना समजू लागले आहेत. आता कुटुंबातील सदस्यांचीही मालमत्ता जाहीर करावी लागणार असल्याने उमेदवाराची संपत्ती उघड होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारांना स्वत:च्या मालमत्तेबरोबरच कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करावी लागणार आहे. कुटुंबातील सदस्य कोण आहेत, ही माहिती उमेदवारांकडून देण्यात येईल. त्यांच्या मालमत्तांची माहिती प्रतिज्ञापत्रावर देण्यात आल्यावर ती प्रतिज्ञापत्रे वेबसाइटवर अपलोड केली जातील. अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी दिली.
उमेदवारांनी कुटुंबाची आणि विदेशातील मालमत्ताही जाहीर करावी उमेदवारांनी कुटुंबाची आणि विदेशातील मालमत्ताही जाहीर करावी Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 17, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.