मुंबई : मुंबईतल्या इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च अभिमत विद्यापीठाच्या 16 व्या दीक्षांत समारंभात आज उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी 8 जणांना पीएचडी, सहा जणांना एम फिल आणि 29 विद्यार्थ्यांना एम.एससी पदवी प्रदान केली.
ज्ञान हेच भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन राहणार असून, लोकांचे राहणीमान सुधारण्यात ज्ञानच महत्वाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी यावेळी केले. भारताने या संधीचा फायदा घेऊन, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ठरेल, अशा प्रकारे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे पुनरुत्थान केले पाहिजे, असे ते म्हणाले.
“वसाहतवादी मनोवृत्तीतून शिक्षण व्यवस्थेने बाहेर पडले पाहिजे. व्यवस्थेने इतिहास वास्तवदर्शी पद्धतीने शिकवला पाहिजे. शिक्षण केवळ रोजगारासाठी नाही. शिक्षण व्यवस्थेने व्यक्तीला ज्ञानाने सक्षम केले पाहिजे आणि नीरक्षीरविवेकबुद्धीने तो संपन्न व्हायला हवा. सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि सर्व स्तरावर सर्वसमावेशक विकास व्हावा व कुठलाही भेदभाव होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. जागतिक ज्ञानाचे केंद्र म्हणून भारताचे पुनरुत्थान होण्याची वेळ आता आली आहे. हे घडण्यासाठी अध्यापन केंद्रांनी विशेषत: विद्यापीठांनी बौद्धिक आदानप्रदानाची सर्वोत्तम केंद्रे म्हणून स्वत:ला नव्याने घडवले पाहिजे”, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
विकासातल्या आव्हानांवर ज्ञानाद्वारेच मात करता येऊ शकेल, असे सांगून संशोधनाची गुणवत्ता सुधारण्याची आणि नाविन्यपूर्ण शोधांना चालना देण्याची गरज नायडू यांनी व्यक्त केली.
वर्ष 2030 मध्ये भारत 10 ट्रिलिअन अमेरिकी डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्यासाठी वर्षाला किमान 7 टक्के विकासदर राखणे आवश्यक आहे. “जर आपण हे साध्य करु शकलो तर जागतिक बँकेच्या कनिष्ठ उत्पन्न गटातून उच्च-मध्यमवर्गीय उत्पन्न गटात दाखल होऊ शकतो. यासाठी अपुऱ्या सार्वजनिक सेवा, प्रदूषण, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातल्या समस्या, जमीन, मजूर व वित्तीय बाजारपेठांमधल्या त्रुटी यासारख्या अनेक अडथळ्यांवर मात करणे आवश्यक आहे. आपल्या मार्गावर अनेक अडथळे आहेत. या विकास मार्गावर चालण्यासाठी संशोधन, नावीन्यपूर्ण शोध, प्रामाणिक अंमलबजावणी आणि सातत्यपूर्ण देखरेख आवश्यक आहे”, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
मुंबईत आयजीआयडीआरच्या (अभिमत विद्यापीठ) विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पदवी प्रदान
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 27, 2019
Rating:

No comments: