महामार्गाच्या गतीने आरोग्य सेवा सुरू असल्याचे
शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे गौरवोद्गार
मुंबई : आरोग्य विभागाच्या आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना, आरोग्यवर्धिनी केंद्र, मिशन मेळघाट उपक्रम, रक्तदाब तपासणी यंत्र, डायलिसिस केंद्र आणि कर्करोग तपासणी अशा विविध लोककल्याणकारी उपक्रमांचा शुभारंभ राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात काम करणारे अधिकारी, संस्था, माध्यम, आदिवासी भागात काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना या वर्षीपासून आदरणीय बाळासाहेब ठाकरे‘आरोग्यरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.
यावेळी आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेच्या बोधचिन्हाचे अनावरण, आरोग्यवर्धिनी केंद्रांचे लोकार्पण, मिशन मेळघाट पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तपासला आपला रक्तदाब
स्वयंचलित रक्तदाब तपासणी यंत्राचे देखील यावेळी लोकार्पण करण्यात आले. राज्याचे शिक्षणमंत्री श्री. तावडे यांनी या यंत्राद्वारे आपला रक्तदाब यावेळी तपासून घेतला.
आरोग्य सेवा द्रुतगतीने - शिक्षणमंत्री विनोद तावडे
यावेळी शिक्षणमंत्री म्हणाले, मंत्री श्री. शिंदे यांच्याकडे रस्ते विकासाचे खाते आहे त्यांच्याकडे आरोग्य खात्याचा कार्यभार आल्यानंतर आरोग्यसेवा द्रुतगतीने दिली जात आहे. आरोग्य, शिक्षण कुठलाही विभाग असो, राज्य शासनाने त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत सामान्यांना अधिक गतिमान आणि दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामान्यांना अपेक्षित सेवा देण्यासाठी राज्य शासन सज्ज असल्याचे श्री. तावडे यांनी सांगितले.
टेलिमेडिसीन तंत्रज्ञानावर भर द्यावा- शिवसेना पक्षप्रमुख
शिवसेना पक्षप्रमुख श्री. ठाकरे म्हणाले, सामान्य नागरिकांना जे वचन दिले होते ते आरोग्याच्या विविध योजना सुरू झाल्यामुळे पूर्ण झाल्याचं समाधान आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. त्या नावातच आपलेपणा आहे. दुर्गम भागातील नागरिकांना शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळावा यासाठी रिअल टाईम टेलिमेडिसीन तंत्रज्ञानावर भर द्यावा, असे आवाहन करतानाच या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुर्गम भागातील रुग्णांना दिलासा देण्याचे काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
आदरणीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्काराची आरोग्यमंत्र्यांकडून घोषणा
आरोग्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आज आपला दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले. राज्यात 60 ठिकाणी हे दवाखाने सुरू करण्यात येणार आहे. मेळघाट भागाचा दोन दिवस दौरा केल्याचे सांगत या भागात विविध उपाययोजनांची सप्तपदी राबविण्यात येत असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. आरोग्य क्षेत्रात काम करणारे अधिकारी, संस्था, माध्यम, आदिवासी भागात काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना या वर्षीपासून आदरणीय बाळासाहेब ठाकरे‘आरोग्यरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.
यावेळी उस्मानाबाद आणि गडचिरोली येथील आरोग्यवर्धिनी केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मान्यवरांनी संवाद साधला. यावेळी माजी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.
राज्यात 60 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करणार
आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 10 महापालिका क्षेत्रात 60 ठिकाणी सुरु करण्यात येणार आहे. ठाणे-10, कल्याण-डोंबिवली-10, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, नागपूर, पुणे, अमरावती, औरंगाबाद, परभणी आणि नांदेड येथे प्रत्येकी 5 क्लिनिक सुरु करण्यात येत आहे.
मिशन मेळघाट अंतर्गत सप्तपदी उपक्रम
मिशन मेळघाट उपक्रमांतर्गत या भागातील बालमृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य व अन्य विभागांच्या सहाय्याने सप्तपदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. गंभीर माता व बालरुग्णांना संदर्भ सेवा त्वरित मिळण्याकरिता उपाययोजना करणे,आरोग्य यंत्रणेची क्षमता वाढविणे, एमबीएस तसेच विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध करुन देणे, आरोग्य यंत्रणेच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे, माता व बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा करणे, आरोग्य सेवा घेण्यात या भागातील नागरिकांचा सहभाग वाढविणे आणि स्थलांतराचे प्रमाण कमी होण्याकरिता उपाययोजना राबविणे असा सप्तपदी कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
जागतिक महिला दिनापासून महिलांसाठी कर्करोग तपासणी मोहीम
राज्यात उद्यापासून दोन दिवस जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्करोगाची मोहीम सुरु करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्त्रियांमध्ये आढळून येणाऱ्या स्तनाचा कर्करोग, गर्भाशयमुख कर्करोग, मौखिक कर्करोग याची तपासणी केली जाणार आहे. आरोग्य विभाग व टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून ही तपासणी केली जाणार आहे.
स्वयंचलित रक्तदाब तपासणी यंत्र रेल्वे स्थानकांवर बसविणार
राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाबाचे नियंत्रण करण्याकरिता स्वयंचलित रक्तदाब तपासणी यंत्र राज्यात सातारा, सिंधुदुर्ग, वर्धा आणि भंडारा या 4 जिल्ह्यांमध्ये तसेच काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर बसविले जाणार आहेत. त्याद्वारे कुठलीही व्यक्ती मशिनमध्ये आपला हात ठेवून रक्तदाबाची तपासणी करु शकतो.
आरोग्यवर्धिनी केंद्रांचा शुभारंभ
राज्यात आयुष्यमान भारत योजने अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु करण्यात आले आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने 10 हजार 668 उपकेंद्रांचे, 1828 ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आणि 605 नागरी आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. सध्या 343 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रुपांतर करण्यात आले आहे.
डायलिसिस सेंटरची सुविधा
रुग्णांना डायलिसिसची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी 31 ठिकाणी डायलिसिस केंद्र सुरु करण्यात आली आहेत. सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासामार्फत 112 डायलिसिस यंत्राचा पुरवठा करण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या 31 पैकी 26 डायलिसिस सेंटरचे श्रेणीवर्धन करुन त्यांना अतिरिक्त डायलिसिस यंत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त 20 सेंटर नव्याने स्थापन करण्यात आली आहेत. त्याचबरोबर अतिरिक्त 40 डायलिसिस यंत्र खरेदी केली जाणार आहे. या यंत्रांच्या वापरासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होण्याकरिता सीएसआरच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे.
यावेळी अभियान संचालक डॉ.सतीश पवार, अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील, सहसंचालक डॉ.साधना तायडे, सहसंचालक डॉ.विजय कंदेवाड यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमास आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वांद्रे येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यास उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार अनिल परब, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास आदी यावेळी उपस्थित होते.
आपला दवाखानासह आरोग्य विभागाच्या सहा लोकोपयोगी योजनांचे लोकार्पण
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 08, 2019
Rating:
No comments: