Seo Services
Seo Services

दिव्‍यांग मतदारांना मतदान केंद्रावर आवश्‍यक त्‍या मुलभूत सुविधा पुरवाव्‍यात


पुणे : दिव्‍यांग मतदारांना (पीपल विथ डिसअँबिलीटी- पीडब्ल्‍यूडी) मतदान केंद्रावर आवश्‍यक त्‍या मुलभूत सुविधा उपलब्‍ध राहतील, याची खात्री करण्‍याच्‍या सूचना विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्‍या पूर्वतयारीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपायुक्‍त संजयसिंह चव्‍हाण, निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह उपस्थित होत्‍या.

विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर जिल्‍हानिहाय निवडणूक तयारीचा आढावा घेतला. बैठकीत निवडणुकीशी संबंधित सर्व विषयांची माहिती, जिल्‍हा प्रशासनाची तयारी त्‍यांनी जाणून घेतली. ‘एकही मतदार सुटता कामा नये’, हे यंदाच्‍या निवडणुकीचे ब्रीदवाक्‍य असून सर्व पात्र मतदारांबाबत विशेषत: दिव्‍यांग मतदारांबाबत अधिक जागृत राहण्‍याचे निर्देश त्‍यांनी दिले. मतदान केंद्रांवर पिण्‍याचे पाणी, स्‍वच्‍छतागृह, रॅम्‍प, वीजेची सोय, दिव्‍यांग मतदारांना मतदान कक्षात जातांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी आवश्‍यक ती सुविधा उपलब्‍ध राहावी, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

निवडणूक काळात दारुचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, याकडे लक्ष वेधून डॉ. म्‍हैसेकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांनी जागरुक राहून कारवाई करावी, असे सांगितले. भरारी पथकासह इतर पथकांमध्‍ये समन्‍वय ठेवण्‍यावरही त्‍यांनी भर दिला. मतदान यंत्रआणि व्‍हीव्‍हीपॅटबाबत पोलीस विभागासह सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्‍ये प्रात्‍यक्षिके दाखवून जनजागृती करावी, शंकानिरसन करावे, अशा सूचना त्‍यांनी दिल्‍या. सी-व्‍हीजील अँपवर येणा-या तक्रारींबाबत ताबडतोब कार्यवाही करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी आदेश मिळाल्‍यावर कार्यवाही करण्‍यापेक्षा सक्रिय राहून कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या सर्वच विभागांना आचार संहितेचे पालन करणे बंधनकारक असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. आदर्श आचार संहिता देशभर लागू असून रेल्‍वे, डाक विभाग, कृषी, बँका यांच्‍यासह शासकीय- निमशासकीय संस्‍थांनी आचार संहितेचे पालन करणे आवश्‍यक आहे. आचार संहितेचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार कार्यवाही होईल, असेही त्‍यांनी सांगितले.

दिव्‍यांग मतदारांना मतदान केंद्रावर आवश्‍यक त्‍या मुलभूत सुविधा पुरवाव्‍यात दिव्‍यांग मतदारांना मतदान केंद्रावर आवश्‍यक त्‍या मुलभूत सुविधा पुरवाव्‍यात Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 21, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.