नवी दिल्ली : मोझांबिकच्या किनाऱ्याला 15 मार्च 2019 रोजी ‘आयडीएआय’ चक्रीवादळाने तडाखा दिल्यानंतर स्थानिकांना मानवतावादी सहाय्य आणि दुर्घटनेनंतर परत देण्यासाठी भारतीय नौदलाच्या पहिल्या ट्रेनिंग स्क्वाड्रनमधली (सुजाता, सारथी आणि शार्दुल) जहाजं बैरा बंदराकडे वळवण्यात आली. ही जहाजे दक्षिण हिंद महासागरात तैनात होती आणि मोझंबिक सरकारच्या विनंतीवरुन ती बैरा बंदराकडे वळवण्यात आली. 18 आणि 19 तारखेला बैरा बंदरात दाखल झाल्यानंतर या जहाजांनी स्थानिक प्रशासनासोबत तात्काळ कार्य सुरू केले.
15 मार्च 2019 रोजी ‘आयडीएआय’चक्रीवादळाचा तडाखा बैरा बंदराला बसला. या वादळामुळे मोठी जिवित आणि वित्तहानी झाली. तसेच पायाभूत सुविधांनाही फटका बसला. बैरा बंदराजवळ अडकलेल्या 1500 जणांच्या सुखरुप सुटकेसाठी भारतीय नौदलाची जहाजे आणि स्थानिक प्रशासन परस्पर सहकार्याने कार्य करत आहेत. मोझांबिकच्या लष्करी प्रशासनाकडे अन्न, औषधे आणि कपडे सुपूर्द करण्याचे काम पूर्ण झाले आहे. पिण्यायोग्य पाणी पोहचवण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे.
मोझांबिकच्या संरक्षण मंत्र्यांनी भारतीय नौदलाच्या जहाजांना भेट देऊन मदतकार्याची पाहणी केली. नौदलाच्या स्क्वाड्रनचे वरिष्ठ अधिकारी कॅप्टन वरुण सिंग यांनी मदत पुरवण्यात भारतीय नौदल कोणतीही कसूर सोडणार नाही असे स्पष्ट केले.
भारतीय नौदलाची जहाजे आरोग्य शिबिरं उभारण्याची तसेच अन्न, पाणी, ब्लँकेट आणि इतर आवश्यक वस्तू स्थानिक प्रशासनाला पुरवण्याची शक्यता आहे.