Seo Services
Seo Services

चालू घडामोडी व दिनविशेष - १८ मार्च २०१९




माजी न्यायमूर्ती पी सी घोष देशाचे पहिले लोकपाल :

केंद्र सरकारने माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची देशाच्या पहिल्या लोकपालपदी नियुक्ती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यामूर्ती घोष हे मानवाधिकार प्रकरणातील विशेष तज्ज्ञ आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे.

माजी न्या. घोष यांची लोकपालपदी नियुक्ती करण्याबरोबरच न्यायिक सदस्यांच्या नावांनाही मंजुरी देण्यात आली आहे. न्या. दिलीप बी भोसले, न्या. प्रदीपकुमार मोहंती, न्या. अभिलाषा कुमारी, न्या. अजयकुमार त्रिपाठी हे न्यायिक सदस्य असतील. न्यायिक सदस्यांबरोबर दिनेशकुमार जैन, अर्चना रामसुंदरम, महेंद्रसिंह आणि डॉ. इंद्रजितप्रसाद गौतम हे इतर चार सदस्यही असतील.

देशाचे पहिले लोकपाल नियुक्त करण्यात आलेले न्या. पी. सी. घोष हे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश होते. तसेच आंध्र प्रदेश हायकोर्टाचे ते मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्यही आहेत. न्या. घोष आपल्या निर्णयांमध्ये मानवाधिकारांचे संरक्षणाबाबत वारंवार भाष्य करत असत. न्या. घोष यांना मानवाधिकार कायद्याचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जाते.

लोकपाल नियुक्तीच्या निवड समितीने ही नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य न्यायाधीश किंवा त्यांच्याद्वारे नियुक्त न्यायाधीश, विरोधी नेता, लोकसभा अध्यक्ष आणि एक निवड सदस्य असतो. सुप्रीम कोर्टात विरोधी नेता नसल्याने अशा स्थितीत विरोधी पक्षाच्या नेत्यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात येणार होते.

गोवा विधानसभेत आज शक्तिपरीक्षा :

गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांचा सोमवारी मध्यरात्री शपथविधी झाल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजपला विधानसभेत शक्तिपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी बहुमताचा दावा केल्यानंतर राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी बुधवारी विधानसभेचे विशेष सत्र बोलावले आहे.

विधानसभेत सकाळी ११.३० वाजता ही शक्तिपरीक्षा होणार आहे. गोव्यात भाजपचे संख्याबळ १२ असून, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या प्रत्येकी तीन आमदारांबरोबरच तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा भाजपचा दावा आहे.

जेट एअरवेज संकटात :

देशातली दुसऱ्या क्रमांकाची विमान कंपनी असलेली ‘जेट एअरवेज’ ही विमान कंपनी आर्थिक संकटात सापडली असून तिच्या वैमानिकांनी थकलेल्या पगारांच्या निषेधात एक एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकारनेही धाव घेत, या कंपनीला कर्जबाजारी न होऊ देण्यासाठी बँकांना आदेश दिला आहे.

थकलेल्या पगाराच्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी कंपनीने ३१ मार्चपर्यंत ठोस योजना न मांडल्यास एक एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा कंपनीच्या कर्मचारी आणि वैमानिकांनी दिला आहे. ‘हा प्रश्न केवळ पगारापुरता नाही, तर आम्ही तग तरी धरणार की नाही, हा आहे,’ असे एका वैमानिकाने माध्यमांना सांगितले.

या विमान कंपनीच्या ताफ्यातील केवळ ४१ विमानांचेच उड्डाण सुरू आहे. कंपनीवर एक अब्ज डॉलरहून अधिक कर्ज आहे. अन्य कंपन्यांची स्पर्धा, रुपयाचे अवमूल्यन आणि इंधनाचे चढे भाव यामुळे कंपनीला अनेक उड्डाणे रद्द करावी लागत आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील गुंतवणुकीचे चित्र निराशाजनक असल्याचा संदेश जाऊ नये आणि बेरोजगारीत वाढ होऊन सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर जनतेत असंतोष पसरू नये, यासाठी सरकारने वेगाने पावले उचलली आहेत. सरकारने तातडीची बैठक घेतली आणि त्यात बँकांना जेटची पाठराखण करण्याबाबत उहापोह झाला.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए), आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि महिनाअखेरीस आवश्यक ती पावले उचलली जातील, असे जाहीर केले आहे. कंपनीची १२०पैकी केवळ ४१ विमाने सेवेत असली तरी उरलेल्या विमानांची देखभाल काटेकोरपणे केली जावी, असेही ‘डीजीसीए’ने सांगितले आहे.

इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाचा उदय :

महाराष्ट्रात ४५ जागा होत्या. त्यापैकी ४२ जागा काँग्रेसने जिंकून बालेकिल्ला पुन्हा सांभाळला. नागपुरातून फॉरवर्ड ब्लॉकचे जांबुवंतराव धोटे, राजापुरात प्रा. मधू दंडवते विजयी झाले होते. पंढरपूरमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे निवृत्ती कांबळे विजयी झाले. त्यांची काँग्रेसशी आघाडीच होती. महाराष्ट्राशिवाय उत्तर प्रदेश ८५ पैकी ७३, कर्नाटक २७ पैकी सर्व जागा, आंध्र, बिहार, राजस्थान, आदी राज्यांत काँग्रेसने प्रचंड यश मिळविले.

लोकसभेची पाचवी निवडणूक मार्च, १९७१ मध्ये झाली. लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर काँग्रेसच्या नेतृत्वासाठी आणि पंतप्रधानपदासाठी संघर्ष सुरू झाला होता. नेता निवडीच्यावेळी इंदिरा गांधी विरुद्ध मोरारजी देसाई अशी लढत झाली. त्यात इंदिरा गांधी विजयी झाल्या. मात्र, अंतर्गत धुसफूस काही संपली नाही. अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशन १९६९मध्ये बंगलोरमध्ये घेण्यात येणार होते. त्याच्या अध्यक्षपदी कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री एस. निजलिंगाप्पा होते. या अधिवेशनावर इंदिरा गांधी यांना मानणाऱ्या गटाने बहिष्कारच घातला. पंतप्रधानपदी असणाऱ्या इंदिरा गांधी यांनाच काँग्रेसमधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस पक्षात मोठीच फूट पडली.

काँग्रेस कार्यकारिणीच्या ७०७ सदस्यांपैकी ४१८ सदस्यांनी इंदिरा गांधी यांचे नेतृत्व स्वीकारले. लोकसभा व राज्यसभेच्या केवळ ३१ खासदारांनी मूळ काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. उर्वरित सर्वच खासदारांनी इंदिरा गांधी यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याने पक्षातून काढून टाकले असले तरी त्यांचे पंतप्रधानपद कायम राहिले. मोरारजी देसाई व एस. निजलिंगप्पा यांना तामिळनाडूचे ज्येष्ठ नेते के. कामराजही मिळाले होते.

इंदिरा गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेसची नव्याने स्थापना केली. या दोन्ही गटांना सिंडीकेट काँग्रेस व इंडिकेट काँग्रेस असे म्हटले जाऊ लागले. सिंडीकेट काँग्रेस ऊर्फ संघटना काँग्रेसने पाचव्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसविरोधात महागठबंधन केले. त्यात जनसंघ, प्रजा समाजवादी पक्ष, संयुक्त समाजवादी पक्ष व स्वतंत्र पक्ष सामील झाला होता.

तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुप्पटीने वाढ, गौरी सावंत निवडणुकीच्या सदिच्छा दूत :

मुंबई :  लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मान्यवरांची मदत घेतली आहे. या मान्यवरांमध्ये तृतीयपंथी गौरी सावंत यांची सुध्दा निवडणूक सदिच्छा दूत (ॲम्बेसेंडर) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आयोगाने पहिल्यांदाच तृतीयपंथी वर्गातील व्यक्तीची निवडणूक सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे.

2004, 2009 च्या लोकसभा निवडणुकीत तृतीयपंथी अशी नोंद नव्हती. सन 2014 च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती.  2014 मध्ये या तिसऱ्या वर्गवारीमध्ये 918 मतदारांची नोंद करण्यात आली. पाच वर्षांनी करण्यात आलेल्या नोंदीमध्ये हा आकडा दुप्पटीने वाढला असून आता ही संख्या 2,086 इतकी झाली आहे. भिवंडी, कल्याण, मुंबई उत्तर आणि मुंबई पूर्व या चार मतदारसंघात अनुक्रमे 113, 184, 324 आणि 123 तृतीयपंथाची नोंद झाली आहे. मुंबई उत्तर या मतदारसंघातून 324 सर्वाधिक तृतीयपंथीची नोंद झाली आहे.

गौरी सावंत यांच्या नेमणुकीमुळे अधिकाधिक तृतीयपंथीची शेवटच्या टप्प्यातील नावनोंदणी करण्यास मदत होईल.येत्या काही दिवसांत गौरी सावंत या तृतीयपंथी यांच्या घरी जाऊन मतदानाची आवश्यकता, मतदानाचा हक्क या बाबत सांगणार आहेत. महाराष्ट्रात राहणाऱ्या नवमतदारासह अधिकाधिक मतदारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगामार्फत नामवंत खेळाडू, चित्रपट कलावंत, साहित्यिक आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना निवडणूक सदिच्छा दूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2014 साली तृतीयपंथी मतदारांना प्रथम मतदानाचा अधिकार मिळाला. आणि तेव्हापासूनच तृतीयपंथी अशा स्वतंत्र वर्गवारीत या समूहाची नोंद करण्यात येऊ लागली. 2019 मध्ये करण्यात आलेल्या नोंदणीत तर तृतीयपंथी वर्गवारीमध्ये मतदारांची संख्या दुप्पटीने वाढली असल्याचे दिसून आले आहे. याचाच अर्थ आज तृतीयपंथी सुध्दा आपल्या मतदानाच्या हक्काबाबत सजग असून मतदान नावनोंदणीसाठी पुढे येत आहे.

माझा उत्तराधिकारी भारतातून असेल, दलाई लामांना विश्वास, चीनचा जळफळाट :

शिमला : माझा उत्तराधिकारी भारतातून असेल, असा विश्वास तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी व्यक्त केला आहे. धर्मशाला येथील एका कार्यक्रमात दलाई लामा बोलत होते. दलाई लामा म्हणाले की, "माझा उत्तराधिकारी जर चीनने जाहीर केला असेल तर त्याचा कधीही सन्मान केला जाणार नाही." परंतु दलाई लामा यांच्या या विधानाचा चीनने विरोध केला आहे.

दलाई लामा यांनी 1959 साली तिबेट सोडले, या घटनेच्या 60 व्या वर्षपूर्तीनिमत्त आज धर्मशाला येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दलाई लामा बोलत होते.

दलाई लामा म्हणाले की, "चीनसाठी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे दलाई लामांचा पुनर्जन्म होणे हा आहे. त्यामुळे मला भविष्यातल्या दलाई लामाबद्दल चिंता आहे, तुम्ही जर भविष्यात दोन दलाई लामा पाहीले तर त्यापैकी एक भारतातून आणि दुसरा चीन जाहीर करेल. परंतु चीनमधून आलेल्या धर्मगुरुला कधीही सन्मान दिला जाणार नाही."

गेल्या आठवड्याभरापासून चीनमधील काही नेत्यांकडून दलाई लामा यांचा उत्तराधिकारी कोण असेल? याबाबत चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर दलाई लामा यांनी माझा उत्तराधिकारी भारतातून असेल चीनमधून नाही, हे स्पष्ट केले आहे.


दिनविशेष :
जागतिक चिमणी दिन / आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन / आंतरराष्ट्रीय आनंदाचा दिन / जागतिक कथाकथन दिन

महत्वाच्या घटना 

१६०२: डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.

१८५४: रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली.

१७३९: नादीरशहा यांनी दिल्लीतील मयुरासन आणि नवरत्ने लुटून इराणला पाठवली.

१९१६: अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला.

१९१७: महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला.

१९५६: ट्युनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

२०१५: सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ, आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व एकाच दिवशी झाले.

जन्म 

१८२८: नॉर्वेजीयन नाटककार आणि कवी हेनरिक इब्सेन यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९०६)

१९०८: ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १९८५)

१९२०: नाटककार वसंत कानेटकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २०००)

१९६६: पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांचा जन्म.

मृत्यू 

१७२६: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ,गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ सर आयझॅक न्युटन यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १६४२)

१९२५: ब्रिटीश मुत्सदी आणि भारताचे व्हॉइसराय लॉर्ड कर्झन यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८५९)

१९५६: मराठी नावकाव्याचे प्रणेते बा. सी. मर्ढेकर यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९०९)

२०१४: भारतीय पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंग यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९१५)
चालू घडामोडी व दिनविशेष - १८ मार्च २०१९ चालू घडामोडी व दिनविशेष - १८ मार्च २०१९ Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 20, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.