मुंबईतील जल वाहतुकीसह सार्वजनिक वाहतूक सुविधेचे एकत्रीकरण करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे पसविण्यात येत आहे. त्याचबरोबर आता लवकरच जलवाहतूक सुविधा सुरू करणार असून मेट्रो, मोनो,उपनगरीय रेल्वे, बस यांच्याबरोबर जलवाहतुकीचेही एकत्रिकरण (इंटिग्रेशन) करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मोनोरेलच्या वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा ११.२८ किमीच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. फडणवीस व केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते संत गाडगे महाराज चौक स्थानक येथे आज झाले. त्यानंतर वडाळा आगार येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
संत गाडगे महाराज चौक येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते मोनोरेलच्या कोनशिलेचे अनावरण झाले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस, रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी मोनोरेलला हिरवा झेंडा दाखवून दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ केला. याच मोनोरेलमधून प्रवास करून मुख्यमंत्री व रेल्वे मंत्री यांच्यासह महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अरविंद सावंत आदी मान्यवर वडाळा मोनोरेल आगार येथील कार्यक्रमस्थळापर्यंत दाखल झाले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात होत आहे, हा क्षण मुंबईसाठी खूपच आनंदाचा आहे. आता संपूर्ण १९ किमी धावणारी मोनोरेल ही खऱ्या अर्थाने लोकोपयोगी झाली आहे. या मोनोतून दर महिन्याला सुमारे ३० लाख नागरिक प्रवास करतील. यामुळे एक चांगली व्यवस्था निर्माण झाली आहे. कुठल्याही शहरामध्ये नागरीकरण होत असताना चांगली वाहतूक सुविधा दिली तर वाहतूक समस्या सुटतील. अशी व्यवस्था केली तरच ही शहरे शाश्वत होतील. मुंबई सारख्या शहरात उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने मोनोरेल, मेट्रो सारखे प्रकल्प सुरू केले आहेत. त्याचबरोबर केंद्र शासनाने मंजुरी दिलेल्या एमयूटीपी तीनमुळेही येथील चित्र बदलणार आहे.
गेल्या चार वर्षात मुंबईचा कायापालट करणारे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे २५० किमीचे जाळे पसरविण्याचे काम सुरू आहे. यामुळे एका तासात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे सुलभ होणार आहे. मेट्रोमुळे जलद व शाश्वत असे साधन मुंबईकरांना मिळाले आहे, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईतील उपनगरीय रेल्वेवरील भार कमी करण्यासाठी मोनोरेल, मेट्रो, उपनगरीय रेल्वे, बस या सार्वजनिक वाहतूक सुविधांचे एकत्रिकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी एकात्मिक तिकिट प्रणाली तयार करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईत एकाच तिकिटावर सार्वजनिक वाहतूक सुविधेद्वारे प्रवास करता येईल. यामध्ये नव्याने सुरू करणाऱ्या जल वाहतुकीचाही समावेश करण्यात येणार आहे. मेट्रो, मोनो व जल वाहतूक सुविधेमुळे एकात्मिक सार्वजनिक वाहतूक सुविधा असलेले देशातील पहिले शहर ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुंबईतील प्रदूषण व वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महानगरपालिकेने इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करावा. मोनोरेलमध्ये सुद्धा ३० टक्के वीज ही स्टेशनवर बसविलेल्या सोलर पॅनेलमधून मिळणार आहे. त्यामुळे वीज बचत होणार असल्याचेही, मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
रेल्वे मंत्री श्री. गोयल म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वामुळे आज मोनोरेलचा हा भारतातील पहिला प्रयोग सुरू झाला आहे. मोनोरेल व मेट्रोमुळे मुंबईकरांना प्रवासासाठी नवीन वाहतूक साधने मिळाली आहेत. यामुळे रस्ते व बस वाहतुकीवरील ताण कमी होऊन नागरिकांना सुलभ प्रवासाची सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. मोनोरेलच्या सर्व स्थानकांबरोबर उपनगरीय रेल्वे स्थानके जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी एमएमआरडीएने आराखडा तयार करावा. रेल्वे मंत्रालय त्याला तातडीने मंजुरी देईल. याचबरोबर वडाळा परिसराचा विकासही करण्यात येणार आहे.
यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, आमदार राहुल नार्वेकर, किरण पावसकर, ॲड. मनीषा कायंदे, कॅप्टन तमिळ सेल्वन, सुनील शिंदे, प्रसाद लाड, माजी महापौर जाधव,एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, सोनिया सेठी आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात एमएमआरडीएच्या कर्मचारी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री श्री. फडणवीस व रेल्वे मंत्री श्री. गोयल यांना मोनोरेलची प्रतिकृती भेट देण्यात आली.
भारतातील पहिल्या मोनोरेलचे वैशिष्ट्ये -
- दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर ही मोनोरेल एकूण १९.५४ किमीचा संपूर्ण पल्ला गाठणार
- जपानच्या ओसाका मोनोरेल (२३.८किमी) नंतर मुंबई मोनोरेल ही जगातील दुसरी सर्वात लांब मोनोरेल
- चेंबूर ते वडाळा ८.२६ किमी चा पहिला टप्पा कार्यरत
- वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा ११.२८ किमीचा दुसरा टप्पा पूर्ण
- सी.सी.टी.व्ही. कॅमेरा, प्रवासी चालक संपर्क यंत्रणा
- रि-जनरेटिव्ह ब्रेकिंग यंत्रणामुळे २५ टक्के विजेची बचत
- दुसऱ्या टप्प्यात जीटीबी नगर, अन्टॅाप हिल, आचार्य अत्रे नगर, वडाळा ब्रिज,दादर (पूर्व), नायगाव, आंबेडकर नगर, मिंट कॉलनी, लोअर परळ, संत गाडगे महाराज चौक पर्यंतची सुविधा.
मोनोरेलच्या वडाळा ते संत गाडगे महाराज चौक दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 04, 2019
Rating:
No comments: