पणजी : देशाच्या उच्च आर्थिक विकासाठी सागरी संपत्ती आणि साधनांचा शाश्वत मार्गाने पुरेपूर वापर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती श्री एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. श्री नायडू यांनी आज दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधला, त्याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे संचालक प्रो. सुनील कुमार सिंग यांची याप्रसंगी मंचावर उपस्थिती होती.
सागरी आर्थिक कृतींच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी, समावेशी वाढ आणि शाश्वत विकास साधणे शक्य असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. सागरी स्रोतांचे शाश्वत मार्गाने जतन करण्यासाठी योग्य कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत, असे ते म्हणाले. सध्या आपण तेल आणि नैसर्गिक वायूसाठी आयातीवर अवलंबून आहोत. त्यामुळे संशोधक, शास्त्रज्ञांनी समुद्री ऊर्जा निर्मितीवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाच्या बाबतीत आघाडीचे केंद्र ठरु शकते. सागरी उत्खनन, पाण्याखालील रोबो यांच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जागतिक हवामानबदलाच्या समस्येला सामोरं जाण्यासाठी सागरी स्रोतांची घट आणि प्रदूषण वेळीच रोखले पाहिजे, असे श्री नायडू म्हणाले. मानवी जीवनावर सागराचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळेच संयुक्त राष्ट्रसंघाने 2021-30 हे दशक ‘शाश्वत विकासासाठी सागरी शास्त्र’ म्हणून घोषीत केले आहे.
राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेने आतापर्यंत 1300 पेक्षाही जास्त प्रकल्पांवर काम केले आहे. संस्थेने निर्माण केलेल्या ‘सिंधू संकल्प’ आणि ‘सिंधू साधना’ या संशोधन जहाजांच्या कामगिरीचे उपराष्ट्रपतींनी कौतुक केले.
सागरी संपत्ती आणि पारिस्थितीकीचे संरक्षण करा- उपराष्ट्रपती
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 25, 2019
Rating:
No comments: