वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेचा शानदार पदवीदान समारंभ
येथील वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेचा पदवीदान कार्यक्रम उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल, केंद्रीय कृषी विभागाच्या अतिरिक्त सचिव वसुधा मिश्रा, वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेचे संचालक के. के. त्रिपाठी उपस्थित होते.
श्री. नायडू म्हणाले, अनियमित मान्सून, बाजार भावांची अनिश्चितता, नैसर्गिक आपत्ती यांचा कृषी क्षेत्रावर थेट परिणाम होत असून यातून शेतकऱ्यांची सोडवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कृषी क्षेत्राला शाश्वत आणि किफायतशीर बनविण्यासाठी कृषीमाल उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांची सुयोग्य सांगड घालण्याची आवश्यकता आहे. शेती व्यवहार्य, फायदेशीर आणि शाश्वत बनविण्यासाठी बहुस्तरीय धोरण विकसित करण्याची गरज आहे.
कृषी उत्पादनात आपण मोठी प्रगती केली असून अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झालो आहे. मात्र यापुढे आपल्याला रासायनिक खते व औषधांच्या वापरावर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे.तरच आपण शाश्वत शेतीकडे जावू शकतो. शेतीमधून शाश्वत उत्पादन मिळत नसल्याने अनेक जण शेतीपासून तुटत आहेत. विविध उपाययोजनांचा अवलंब करून आपल्याला शेतीला शाश्वत केले पाहिजे. तरुणांना शेती व्यवसायाकडे वळविण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकताआहे. कृषी क्षेत्रासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
शेतीतील उत्पादन वाढीबरोबरच आपल्याला अन्नधान्याच्या कार्यक्षम वितरणाची गरज आहे. शेतकऱ्यांना पीक पध्दती, कापणी नंतरची प्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानाविषयी सल्ला देण्यासाठी कृषि विज्ञान केंद्रांनी, संशोधकांनी, कृषी अधिकाऱ्यांनी अधिक लोकाभिमूखपणे काम करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला शेती क्षेत्र सुधारण्यासाठी काही अर्थपूर्ण आणि व्यावहारिक उपाय शोधून सध्याच्या धोरण व कार्यक्रमांचे सुसूत्रीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी हा सर्वांचा अन्नदाता असून त्याचा सन्मान होण्याची आवश्यकता आहे. अन्न सुरक्षा हीच राष्ट्र सुरक्षेची चावी असून कृषी क्षेत्राला शाश्वत आणि किफायतशीर बनविण्याचे कायम स्वरूपी धोरण स्वीकारण्याची आवश्यकता असल्याचे उपराष्ट्रपती नायडू यांनी सांगितले.
यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक विजेती मंजू नाथ, रौप्यपदक विजेता संतूर आरट, कास्यपदक विजेता सुकुमार एस., यांच्यासह विशेष प्राविण्य मिळविलेल्या समिक्षा दीक्षित, जॉबल रॉय या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
शेतीच्या शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची गरज- व्यंकय्या नायडू
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 26, 2019
Rating:
No comments: