स्टीफन हॉकिंग यांच्या असमान्य व्हिलचेअरचे फिचर्स वाचून तुम्ही थक्क व्हाल :
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांची आज पहिली पुण्यतिथी. भौतिकशास्त्र आणि कॉस्मोलॉजीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या शास्त्रज्ञाच्या जीवनप्रवासाने अनेकांनाच प्रेरणा मिळाली.
शारीरिक व्याधींवर मात करत एक असामान्य आयुष्य जगलेल्या आणि तितकीच अद्वितीय कामगिरी केलेल्या हॉकिंग यांनी मांडलेले सिद्धांत संशोधनाची परिभाषा बदलण्यास कारणीभूत ठरले. बिग बॅंग थिअरी असो किंवा मग देव अस्तित्वातच नाही, असं म्हणणारे हॉकिंग असो. वेळोवेळी त्यांच्या प्रत्येक सिद्धांताने अनेकांनाच खडबडून जागं केलं. हॉकिंग यांच्या सिद्धांताप्रमाणेच त्यांच्या आयुष्यातील एक अविभाज्य भागही नेहमीच चर्चेचा विषय ठरला. तो भाग म्हणजे त्यांची व्हिलचेअर.
हॉकिंग यांना ‘मोटार न्यूरॉन डिसीज’ने ग्रासले होते. गेली अनेक वर्ष त्या आजाराशी झगडत होते. या साऱ्या प्रवासात ते एका व्हिलचेअरवर जास्तीत जास्त वेळ व्यतीत करायचे. त्यामुळेच ही अनोखी खुर्ची त्यांच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग होती.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत बनवण्यात आलेल्या या व्हिलचेअरच्याच सहाय्याने हॉकिंग यांचे विचार साऱ्या जगापर्यंत पोहोचले. त्यांना बोलता येत नसलं तरीही याच व्हिलचेअरच्या सहाय्याने त्यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत बऱ्याचदा उपस्थितांना आपल्या विचारांनी प्रेरित केल्याचं पाहायला मिळालं. अशा या आगळ्यावेगळ्या व्हिलचेअरविषयी सर्वांनाच आकर्षण लागून राहिलेलं होतं. उत्तम आणि आधुनिक तंत्राची जोड देत तयार करण्यात आलेल्या व्हिलचेअरमध्ये नक्की कोणकोणते विशेष गुण आहेत हे खुद्द हॉकिंग यांनीच त्यांच्या ब्लॉगमधून सर्वांसमोर उघड केले होते.
भारतीय महासागरातील चीनचे वाढते अस्तित्व भारतासाठी आव्हान :
भारतीय सागरात उत्तरेकडे चीनचे वाढते अस्तित्व हे भारतासाठी आव्हान आहे, परंतु या क्षेत्रात तैनात करण्यात आलेल्या चीनच्या नौका आणि पाणबुडय़ांवर भारताचे बारकाईने लक्ष आहे, असे नौदलप्रमुख सुनील लान्बा यांनी येथे स्पष्ट केले.
अॅडमिरल लान्बा हे चार दिवसांच्या ब्रिटन भेटीवर आले आहेत. जहाजबांधणी क्षेत्रात चीनने जेवढी गुंतवणूक केली आहे तेवढी गुंतवणूक कोणत्याही देशाने केलेली नाही, असेही ते म्हणाले. भारतीय महासागरामध्ये चीनच्या नौदलाचे वाढते अस्तित्व ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. चीनचा जपानसमवेत पूर्व चीन सागरावरून वाद आहे, दक्षिण चीन सागरावर ९० टक्के दावा चीनने केला असून तेथे व्हिएतनाम, फिलिपाइन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवाननेही प्रतिदावे केले आहेत.
चीनने जहाजबांधणी क्षेत्रात जेवढी गुंतवणूक केली आहे तेवढी कोणत्याही देशाने केलेली नाही, हे आव्हान आहे, त्यांचे अस्तित्व आणि तैनात करण्यात आलेल्या नौका आणि पाणबुडय़ा यावर भारताचे बारकाईने लक्ष आहे, असेही नौदलप्रमुख म्हणाले.
कर्तारपूर यात्रेकरूंना व्हिसामुक्त प्रवेश देण्याची भारताची मागणी :
कर्तारपूरमधील ऐतिहासिक शीख प्रार्थनास्थळाला भेट देण्यासाठी पाकिस्तानने दररोज भारतातील पाच हजार यात्रेकरूंना व्हिसामुक्त प्रवेश द्यावा, अशी मागणी भारताने गुरुवारी केली.
पंजाबच्या गुरदासपूरमधून सीमेपलीकडे असलेल्या कर्तारपूर साहिबला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी मार्गिका खुली करण्याबाबत पाकिस्तानच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात आली, तेव्हा भारताने वरील मागणी केली. सुरुवातीला किमान पाच हजार भारतीय यात्रेकरूंना दररोज शीख प्रार्थनास्थळाला भेट देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आपल्या बाजूने करण्यात आल्याचे गृहविभागाचे सहसचिव एससीएल दास यांनी सांगितले.
पुलवामात करण्यात आलेला दहशतवादी हल्ला आणि भारताने त्याला दिलेले चोख प्रत्युत्तर यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या शिष्टमंडळांमध्ये ही पहिलीच बैठक झाली.
भारतीय आणि भारतीय वंशाच्या लोकांना पाकिस्तानातील शीख प्रार्थनास्थळाला भेट देण्याची परवानगी देण्यात यावी अशी भारताची मागणी आहे. आठवडाभर एकही सुटी न घेता म्हणजेच दररोज यात्रेकरूंना प्रार्थनास्थळाला भेट देण्याची अनुमती द्यावी, अशी आग्रही मागणी भारताने केली आहे, असे दास यांनी बैठकीनंतर सांगितले.
महाराष्ट्राच्या संघाला 'संविधान कप' राष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद :
नागपूर : महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट संघाने 'संविधान कप' राष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. नागपूरमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने उत्तराखंड संघाचा 8 विकेट्सने पराभव केला.
20 षटकांच्या सामन्यात उत्तराखंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र संघाने अचूक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण करुन उत्तराखंडचा डाव 18.1. षटकात 91 धावांमध्ये गुंडाळला. त्यामुळे महाराष्ट्रासमोर विजयासाठी 92 धावांचं आव्हान होतं. मैदानात उतरलेल्या महाराष्ट्र संघाने हे लक्ष्य 2 विकेटच्या मोबदल्यात अवघ्या 8.3 षटकात पार करुन विजेतेपद पटकावलं. या सामन्यात परशुराम देसलेने महाराष्ट्र संघासाठी नाबाद 59 धावा केल्या.
व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि डिसेबल्ड स्पोर्टिंग आयोजित 'संविधान कप' राष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धा नागपूरच्या बुद्ध पार्कमध्ये 8 ते 10 मार्च 2019 या कालावधीत भरवण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि उत्तराखंड या राज्याच्या व्हीलचेअर क्रिकेट संघांचा समावेश होता. या स्पर्धेत सहभागी खेळाडूंचं अपंगत्व 60 ते 90 टक्के होते. खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही व्हीलचेअरवर बसून केलं. ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी संकल्प असोसिएशन, दिव्यांग स्पेशल अॅबिलिटी फाऊंडेशन, पाऊल दिव्यांग वेलफेयर फाऊंडेशन यांचा सहभाग होता.
विजेतेपदाच्या लढाईआधी साखळी सामन्यात महाराष्ट्राने आधी उत्तराखंडला 48 धावा, गुजरातला 8 विकेट्स आणि दिल्लीला 9 विकेट्सनी पराभूत करुन अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
या स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार परशुराम देसले, उत्कृष्ट फलंदाज परशुराम देसले, उत्कृष्ट गोलंदाज विश्वनाथ गुरव, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण साहिल सय्यद यांना देण्यात आला. तर दिल्ली संघाला शिस्तबद्ध संघाच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
'मंगल'मय बातमी! मंगळावर जाणारा पहिला मानव महिला असू शकेल; ‘नासा’ने पुरविली माहिती :
वॉशिंग्टन : मंगळ ग्रहावर होणारा मानवाचा पहिला पदस्पर्श कदाचित एका महिलेचा असू शकेल, असे अमेरिकेच्या ‘नासा’ अंतराळ संशोधन संस्थेचे प्रशासक जिम ब्रायडेनस्टीन यांनी म्हटले आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयीच्या ‘सायन्स फ्रायडे’ या रेडिओ टॉक शोसाठी दिलेल्या एका मुलाखतीत ‘नासा’ एखाद्या महिलेला प्रथमच चंद्रावर पाठविणार आहे का, असे विचारता ब्रायडेनस्टीन यांनी ‘नक्कीच’ असे उत्तर देताना सांगितले की, ‘नासा’च्या आगामी अंतराळ मोहिमांमध्ये महिला आघाडीवर असतील. त्यामुळे यानंतर चंद्रावर पाठविला जाणारा पहिला माणूस महिला असू शकते.
एवढेच नव्हे तर मंगळावर पडणारे मानवाचे पहिले पाऊलही कदाचित एखाद्या महिलेचे असू शकेल. मात्र चंद्र किंवा मंगळ मोहिमेसाठी त्यांनी कोणत्याही महिला अंतराळवीराचा नावाने उल्लेख केला नाही.
महिला मासाचे निमित्त ब्राईनस्टीन यांनी असेही सांगितले की, अमेरिकेत सध्या राष्ट्रीय महिला मास सुरू आहे. त्याचे औचित्य साधून मार्चच्या अखेरीस अॅने मॅक््लीन व ख्रिस्तिना कोच या दोन महिला अंतराळवीरांना ‘स्पेस वॉक’ करण्यासाठी अंतराळात पाठविले जाईल. फक्त महिलांनी अंतराळात मारलेला तो पहिला फेरफटका असेल.
देशाच्या मतदार याद्यांतून २ कोटी १० लाख महिलांची नावे गायब :
नवी दिल्ली : निवडणुका जाहीर झाल्या असतानाच, मतदार याद्यांतून २ कोटी १० लाख महिलांची नावे गायब असल्याची माहिती उजेडात आली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थानमधील निम्म्या महिला मतदारांची नावे अदृश्य झाली आहेत.
प्रख्यात पत्रकार प्रणव रॉय तसेच दोराब सोपारीवाला यांच्या ‘द व्हर्डिक्ट : डिकोडिंग इंडियाज इलेक्शन्स’ पुस्तकात ही माहिती आहे.
मतदार याद्यांतून महिलांची नावे गायब होण्याचे प्रमाण आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्ये कमी आहे. प्रत्येक मतदारसंघातील सरासरी ३८ हजार महिलांची नावे यादीत नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये हे प्रमाण प्रत्येक मतदारसंघात ८० हजारांपर्यंत जाते.
आयपीएलमध्ये किती सामने खेळायचे हा निर्णय सर्वस्वी खेळाडूंचा - विराट कोहली :
नवी दिल्ली : भारताच्या विश्वचषक संघातल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये किती सामने खेळायचे हा निर्णय सर्वस्वी खेळाडूंचा असल्याचं वक्तव्य टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं केलं आहे. भारताच्या विश्वचषक संघातल्या खेळाडूंना आयपीएलच्या काळात आपल्यावर येणारा ताण हुशारीनं हाताळावा लागेल. आगामी विश्वचषकासाठी ताजंतवानं आणि तंदुरुस्त राहण्याची त्यांची वैयक्तिक जबाबदारी असल्याचं प्रतिपादन टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं केलं आहे.
आम्हाला असा वेळ सांगावा ज्या वेळी खेळाडू आराम करु शकतो, आम्हाला मिळालेल्या संधीचा आम्ही नक्कीच उपयोग करु. विश्वचषक हा दर चार वर्षांनी एकदा येतो आणि आयपीएल चे दरवर्षी होतं पण याचा अर्थ आम्ही विश्वचषकासाठी उत्साही नाही असं नाही असं वक्तव्य कोहलीने पत्रकारांशी बोलताना केलं. तसेच प्रत्येक खेळाडूला आरामाची गरज असल्यास त्यांनी आपापल्या संघमालकांशी चर्चा करावी अशा सुचना खेळाडुंना देण्यात आल्या आहेत.
यंदा आयपीएलला 23 मार्चपासून सुरुवात होत असून, या लीगचा अंतिम सामना मे महिन्यात खेळवण्यात येणार आहे. तर इंग्लंडमधल्या विश्वचषकाला 30 मेपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळेच भारताच्या विश्वचषक संघातल्या खेळाडूंना आयपीएलच्या काळात येणारा ताण कौशल्यानं हाताळण्याच कस लागणार आहे.
आयपीएलचा सलामीचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे.
दिनविशेष :
जागतिक ग्राहक हक्क दिन
महत्वाच्या घटना
१४९३: भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.
१६८०: शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह.
१८२७: टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली.
१८३१: मुंबई येथे गणपत कृष्णाजी यांनी मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीला सुरु झाले.
१९१९: हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन झाले.
१९६१: ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.
१९८५: symbolics.com या इंटरनेट वरील पहिल्या डोमेन नावाची नोंद झाली.
जन्म
१७६७: अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांचा जन्म. (मृत्यू: ८ जून १८४५)
१८६०: प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लसीचा शोध लावणारे रशियन सूक्ष्मजीवशास्त्र डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९३०)
१९०१: पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक विजयपाल लालाराम उर्फ गुरु हनुमान यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे१९९९)
मृत्यू
२०००: विचारवंत आणि कलासमीक्षक लेडी राणी मुखर्जी यांचे निधन.
२००२: इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक दामुभाई जव्हेरी यांचे निधन.
२०१३: डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे स्थापक डॉ. काल्लाम अंजी रेड्डी यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९३९)
२०१५: भारतीय लेखक नारायण देसाई यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १९२४)
चालू घडामोडी व दिनविशेष - १५ मार्च २०१९
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 15, 2019
Rating:
No comments: