निवडणुकीपूर्वी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यासाठी उमेदवार व त्यांच्या प्रतिवादींना ते ठरवतील त्या मशीनवर एक हजार वेळा आणि मतदानाच्या दिवशी मतदान सुरू होण्याच्या दीड तासापूर्वी ५० वेळा ‘मतदान चाचणी मतदान करण्याची परवानगी देण्यात येईल’, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली. त्यानंतर न्यायालयाने याचिका निकाली काढली.
नागूपर लोकसभा निवडणुकीसाठी शहरातील सहा ठिकाणी स्ट्राँग रुम तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी बचत भवन परिसरात दक्षिण आणि मध्य नागपूर मतदारसंघातील मतदान केंद्रांवरील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन ठेवण्यात आल्या. पण पहिल्या स्तराची तपासणी करताना सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते व त्या ठिकाणच्या टीव्हीवर काहीच दृश्य दाखवण्यात येत नव्हते, असा आक्षेप घेत शहर काँग्रेस व काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. त्यावर सुट्टीच्या दिवशी शनिवारी व रविवारी उच्च न्यायालयात न्या. रवि देशपांडे आणि न्या. श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
मतदानाच्या प्रत्यक्ष दिवशी दीड तासापूर्वी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन तपासण्यात येतात. त्या वेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींना वेगवेगळ्या मशीनवर ५० वेळा चाचणी करण्याची अनुमती दिली जाते. त्या दिवशी ५० पेक्षा अधिक वेळा मतदान करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. पण निवडणूक आयोगाकडून पुरवण्यात आलेले साहित्य आणि यंत्रणांनुसार ५० पेक्षा अधिकवेळा परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
न्यायालयाने ही विनंती मान्य केली. सतीश उके यांनी मध्यस्थी अर्ज दाखल करून स्ट्राँग रुम परिसरात मोबाइल जामर बसवण्यात यावे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चलचित्र दाखवण्यासाठी किमान दोन एलसीडी स्क्रीन बसवण्यात यावे, अशी विनंती केली. त्या वेळी ईव्हीएमची इंटरनेटशी जोडणी नसल्याने त्या हॅक होण्याची भीती नाही. त्यामुळे मोबाइल जामर बसवण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.
No comments: