जिल्हा क्रीडा संकुलात सोमवारी भव्य कार्यक्रम
अमरावती : मतदान जागृतीसाठीची स्वीप मोहिम शाळा व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अधिक व्यापक झाली असून, ही मोहिम आता लोकशाही शिक्षणाची कार्यशाळाच बनली आहे. याच अनुषंगाने येथील जिल्हा क्रीडा संकुलात सोमवारी दुपारी ४ वाजता ‘गुढी मतदानाची’ हा भव्य कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.
स्वीप मोहिमेने चांगलाच वेग घेतला असून, जिल्हा परिषदेसह विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी यात संपूर्णपणे सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या निर्देशानुसार नोडल अधिकारी मनीषा खत्री यांनी परिपूर्ण नियोजन करून प्रत्येक गावात मोहिमेला गती दिली आहे. मतदाराचे हक्क, कर्तव्य व जाणीवजागृतीचे कार्य या मोहिमेतून होत आहे. या मोहिमेत आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामसेवक, ग्राम रोजगारसेवक यांच्यासह सर्व यंत्रणाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत.
‘गुढी मतदानाची सक्षम बनवू लोकशाही भारताची’ हा कार्यक्रम आज प्रत्येक गावात व जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत स्वीप कार्यक्रमात राबविण्यात आला. भानखेडा, नया अकोला, पार्डी, राजना, सातेफळ, कळमजापूर, बग्गी, बासलापूर, दानापूरसारखी शेकडो खेडोपाडी तेथील शाळांच्या मोहिमेतून निवडणुकीच्या या राष्ट्रीय महोत्सवात सहभागी झाली आहेत.
असा असेल कार्यक्रम
‘संकल्प मतदानाचा, गुढी मतदानाची, सक्षम बनवू लोकशाही भारताची’ अशी संकल्पना घेऊन एक विशेष उपक्रम सोमवारी होणार आहे. मुख्य निरीक्षक दिनेशकुमार, प्रशासनातील सर्व अधिकारी यांच्यासह दोन हजारहून अधिक नागरिकांची उपस्थिती या कार्यक्रमाला राहणार आहे. स्काऊटगाईडची मानवी साखळी, रांगोळी स्पर्धा, सेल्फी बुथ, ईव्हीएम- व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक, राष्ट्रीय सेवा योजना, समाजकार्य महाविद्यालय व स्वयंसेवी संस्थांकडून पथनाट्य सादरीकरण आदींचे आयोजन येथे करण्यात आले आहे.
स्वीप मोहिम बनली लोकशाही शिक्षणाची कार्यशाळा
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 07, 2019
Rating:

No comments: