Seo Services
Seo Services

राज्यात दुसऱ्या टप्प्यात १० मतदारसंघात पाचपर्यंत ५७.२२ टक्के मतदान - अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज झालेल्या मतदानात राज्यातील १० मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७.२२ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ नंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होते, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली. काही ठिकाणी किरकोळ घटना वगळता आज सर्वत्र शांततेत मतदान पार पडले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्रालयात आज रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड उपस्थित होते.

दुसऱ्या टप्प्यातील दहा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे मतदान झाले. बुलडाणा ५७.०९ टक्के, अकोला ५४.४५ टक्के, अमरावती ५५.४३ टक्के, हिंगोली ६०.६९ टक्के, नांदेड ६०.८८ टक्के, परभणी ५८.५० टक्के, बीड ५८.४४ टक्के, उस्मानाबाद ५७.०४ टक्के, लातूर ५७.९४ टक्के आणि सोलापूर ‎५१.९८ टक्के.

दुसऱ्या टप्प्यात राज्यात २० हजार ७१६ मतदान केंद्रे होती. मतदान प्रक्रियेदरम्यान ईव्हीएम बंद पडल्याच्या अत्यल्प घटना घडल्या असून त्या ठिकाणी तात्काळ मतदान यंत्रे बदलून मतदान प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली. सुमारे ०.४ टक्के मतदान यंत्रे (बॅलेट युनिट तसेच कंट्रोल युनिट) तर ०.९ टक्के व्हीव्हीपॅट बंद पडल्या होत्या त्या तात्काळ बदलण्यात आल्या. त्यामुळे यंत्रातील बिघाडामुळे मतदान प्रक्रियेत कोठेही खंड पडला नाही, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.

या टप्प्यासाठी १ लाख ८ हजार ५९० कर्मचारी प्रत्यक्ष निवडणूक कामकाजासाठी नेमण्यात आले होते. त्याशिवाय सुमारे २५ हजार पोलीस व अन्य सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले होते. सर्व मतदारसंघांमध्ये मतदारांसाठी आवश्यक मुलभूत सुविधा पुरविण्यात आल्या. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रँप आदी सुविधा पुरविण्यात आल्या. याशिवाय २ हजार १२९ इतक्या मतदान केंद्रावरील कामकाजाचे लाईव्ह वेबकास्टींग तर १ हजार ६४१ मतदान केंद्रावरील संपूर्ण कामकाजाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. सर्व कर्मचारी महिला असलेली ८७ सखी मतदान केंद्रे होतीअशी माहितीही श्री.शिंदे यांनी दिली.

राज्यात विविध कारवायांमध्ये आतापर्यंत ११९ कोटी ४३ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. यामध्ये सुमारे ४४.९९ कोटी रुपये रोकड, सुमारे २२ कोटी ५० लाख रुपये इतक्या किंमतीची दारु, सुमारे ६ कोटी ३८ लाख रुपयांचे अंमली पदार्थ तर ४५ कोटी ४७ लाख रुपये किंमतीचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेतसी-व्हिजिल ॲपवर नागरिकांकडून ३ हजार ३३८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी तथ्य असल्याचे  आढळून आलेल्या १ हजार ९११ तक्रारींमध्ये योग्य  ती कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
राज्यात दुसऱ्या टप्प्यात १० मतदारसंघात पाचपर्यंत ५७.२२ टक्के मतदान - अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती राज्यात दुसऱ्या टप्प्यात १० मतदारसंघात पाचपर्यंत ५७.२२ टक्के मतदान - अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 19, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.