पुणे : उष्णतेच्या लाटेमुळे वाढलेल्या तापमानाने राज्याला सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी हैराण केले. महत्वाची बाब म्हणजे स्कायमेटच्या वृत्तानुसार, पुण्यात शनिवारी तब्बल ४२.९ अंश सेल्सिअस तापमानाची करण्यात आली. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान ठरले. यातही विशेष म्हणजे गेल्या ३६ वर्षांतील हे पुण्याचे सर्वाधिक तापमान ठरले. या आधी ३० एप्रिल १९८७ साली पुण्यात ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
याशिवाय, शनिवारी राज्यातील सर्वाधिक तापमान अकोल्यामध्ये नोंदविण्यात आले. अकोल्यात ४६.७ अंश सेल्सिअस तापमान होते. कोकण, महाबळेश्वर वगळल्यास सर्वत्र कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याचे आढळून आले. सर्वाधिक किमान तापमानाची नोंद कोल्हापूरमध्ये करण्यात आली. कोल्हापुरात २५.९ अंश सेल्सिअस तापमान होते.
विदर्भातही शनिवारी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम होता. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान नगर जिल्ह्यामध्ये (४५.१ अंश सेल्सिअस) नोंदविण्यात आले. वातावरणातील बदलांमुळे शुक्रवारपासून विदर्भातील बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट आहे. कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत प्रचंड वाढ झाल्याने नागरिकांना उन्हाळा असह्य होऊ लागल्याचे दिसून येत आहे.
पुण्यात ३६ वर्षांतील सर्वाधिक तापमान
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 30, 2019
Rating:

No comments: