टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावीत - जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : जिल्हयातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, पुणे वन विभागाच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल,रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम यांनी प्रारंभी तालुकानिहाय टंचाई आढावा घेतला. जिल्हयात निर्माण होणा-या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती कशी आहे, चारा उपलब्धतेचे प्रमाण, आतापर्यंत केलेल्या कामाची सद्यस्थिती, उपलब्धता याचीही विस्तृत माहिती घेतली. टंचाई निवारणासाठी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी क्षेत्रिय स्तरावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन जनतेच्या समस्या, मागण्या समजावून घ्याव्यात, आवश्यकतेनुसार पाण्याचे टँकर वाढवावेत. जिल्हाधिकारी स्तरावर टँकरचे प्रस्ताव तात्काळ मंजूर केले जातील, असेही ते म्हणाले. पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यकतेनुसार टँकर भरण्याकरीता पर्यायी मार्गाचाही शोध घेण्यात यावा. जिल्हयात चारा छावण्यांबाबत मागणी असल्यास त्याबाबत प्रस्ताव मंजुरीसाठी तातडीने पाठवावेत. पिण्याचे पाणी, चारा टंचाईबाबतीत तातडीने उपाययोजना कराव्यात. अधिका-यांनी अधिकाराचा वापर केला पाहिजे. महत्त्वाची विकास कामे करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे.
यावेळी लघुसिंचन, लघुपाटबंधारे, यांत् रिकी, भूजलसर्व्हेक्षण विकास यंत्रणा,जिल्हा परिषद, वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी, या विभागाकडून करण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण या बाबत यंत्रणानिहाय कामांच्या सद्यस्थितीचा व खरीप हंगामात केली जाणारी खरीप/ रब्बी पीक कर्ज वाटप, खतांचे वाटप इ. कामे यांचा आढावाही घेण्यात आला. सर्वांनी चांगला समन्वय ठेवून कामे करावीत असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले.
यावेळी जिल्हयातील उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावीत - जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 06, 2019
Rating:
No comments: