Seo Services
Seo Services

भारताचे पहिले जागतिक महाविज्ञान प्रदर्शन ‘विज्ञान समागम’ चे मुंबईत उद्‌घाटन


मुंबई : जगातले विज्ञान विषयक महाप्रकल्प एकत्र पाहण्याची संधी देणाऱ्या भारतातल्या पहिल्या जागतिक महाविज्ञान प्रदर्शन ‘ विज्ञान समागम’ चे आज मुंबईतल्या नेहरु विज्ञान केंद्रात उद्‌घाटन झाले. संरक्षण क्षेत्रातले ख्यातनाम वैज्ञानिक आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. विजयकुमार सारस्वत यांनी या प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले.
मुंबईपासून सुरु झालेले हे प्रदर्शन अकरा महिने सुरु राहणार असून या कालावधीत मुंबईसह, बेंगलुरु, कोलकाता आणि नवी दिल्ली या महानगरांनाही भेट देणार आहे. नॅशनल कौन्सील ऑफ सायन्स म्युझियमच्या भागीदारीने साकारण्यात आलेल्या या प्रदर्शनाला अणू ऊर्जा विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे आर्थिक पाठबळ मिळाले आहे.
हे केवळ प्रदर्शन नव्हे तर चर्चासत्र, लोकप्रिय सायन्स टॉक, प्रश्नमंजुषा यांचा मिलाफ आहे. विज्ञानविषयक सात महाप्रकल्प या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. युरोपीयन ऑर्गनायझेशन फॉर न्युक्लीअर रिसर्च, फॅसिलीटी फॉर ॲन्टीप्रोटॉन ॲण्ड इऑन रिसर्च, इंडिया बेस न्युट्रिनो ऑर्ब्झवेटरी, इंटरनॅशनल थर्मो न्युक्लीअर एक्सपिरीमेंटल रिॲक्टर, लेसर इंटरफर्मोमिटर ग्रॅव्हिएशनल व्हेव, स्क्वेअर किलोमीटर ॲरे, थर्टी मीटर टेलिस्कोप या प्रकल्पांचा या प्रदर्शनात समावेश आहे. हे महाप्रकल्प समाजाला जवळून पाहण्याची संधी देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून केला जात आहे असे अणु ऊर्जा विभागाच्या न्युक्लिअर कंट्रोल ॲण्ड प्लॅनिंग विभागाचे प्रमुख रणजीत कुमार यांनी सांगितले.
हे प्रदर्शन विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे व्यावसायिक पेशा म्हणून पाहण्यासाठी उद्युक्त करेल असे एईसीचे सचिव अरुण श्रीवास्तव म्हणाले.
मूलभूत संशोधनाचे महत्व आणि प्रभाव समाजापुढे ठळकपणे मांडण्याचे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट असल्याचे अणु ऊर्जा विभागाचे सचिव के.एन.व्यास यांनी प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी सांगितले.  
विज्ञान केंद्र आणि संग्रहालयं ही विज्ञान आणि समाजातला महत्वाचा दुवा आहेत. नॅशनल कॉन्सिल ऑफ सायन्स म्युझियम 25 विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून समाजातल्या विविध घटकांमध्ये विज्ञान विषयक जिज्ञासा जोपासण्यात महत्वाची भूमिका बजावत असल्याचे एनसीएसएमचे महासंचालक ए.डी.चौधरी यांनी सांगितले.
भारत आणि सीईआरएन यांच्यात 1960 पासून सहयोग आहे असे स्वित्झर्लंडचे भारतातले राजदूत Andreas Baum म्हणाले. युरोपबाहेर प्रथमच हे प्रदर्शन जात असून एका देशातल्या विविध शहरांमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. यावरुनच भारताचे महत्व सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले.
मूलभूत संशोधनात भारताने मोठी प्रगती केली असून ऊर्जा निर्मितीबरोबरच कर्करोग संशोधनातही त्याचा वापर केला जात आहे असे नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.सारस्वत यांनी उद्‌घाटनपर भाषणात सांगितले. अणुऊर्जेबरोबरच अंतराळ क्षेत्रातही भारताने मोठे योगदान दिले असून मंगळयान, चांद्रयान या मोहिमातून हे स्पष्ट होत आहे. नुकत्याच घेण्यात आलेल्या उपग्रहभेदी चाचणीने हे सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले.
विज्ञान एजन्सीमध्ये महिलांना नेतृत्वाची भूमिका दिल्यामुळे अनेक प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल असे सांगून विजय राघवन यांनी स्त्री शक्तीचा गौरव केला. अणु ऊर्जा विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि नॅशनल कॉन्सिल ऑफ सायन्स म्युझियम यांनी हे प्रदर्शन आयोजित केले असून अनेक जागतिक महाविज्ञान प्रकल्प प्रथमच एकाच छताखाली पाहण्याची संधी यातून मिळत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक गोडी आणि जागृती निर्माण व्हायला मदत होणार आहे. मुंबईनंतर हे ‘विज्ञान समागम’ प्रदर्शन 29 जुलैपासून बेंगलुरु येथे भरणार आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबरला ते कोलकात्यामध्ये तर शेवटच्या टप्प्यात म्हणजे 21 जानेवारी 2020 मध्ये ते नवी दिल्लीला पोहोचेल. 20 मार्च 2020 पर्यंत दिल्लीकरांना हे प्रदर्शन पाहता येईल.
विश्व उत्पत्तीच्या गंभीर प्रश्नावर तसेच विविध टप्प्यांच्या उत्क्रांतीवर या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. अणु ऊर्जा विभाग केवळ अणुतंत्रज्ञानासाठीच कार्य करते असे नव्हे तर मुलभूत विज्ञान आणि संशोधनातले कार्यही या प्रदर्शनातून समोर येणार आहे. न्युट्रॉन स्टार्स आणि ब्लॅक होल्सच्या एकत्रिकरणापासून गुरुत्वाकर्षण लाटांच्या हिग्ज कणांचा शोध असे प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. जागतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान नाविन्यता, अंतराळ विज्ञान क्षेत्रातले संशोधन, अणु तंत्रज्ञान या क्षेत्रातले भारताचे योगदानही या प्रदर्शनातून ठळकपणे मांडण्यात आले आहे.
शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी हे ‘विज्ञान समागम’ चे मुख्य उद्दिष्ट आहे. चारही महानगरात शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. प्रश्नमंजुषा, निबंध लेखन, चित्रकला स्पर्धा, विज्ञान जागृती, सायक्लोथॉन यासारख्या उपक्रमांचा यात समावेश आहे. हे प्रदर्शन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांनी यात सहभागी व्हावे यासाठी www.vigyansamagam.in हे संकेतस्थळ निर्माण करण्यात आले असून यावर अधिक माहिती मिळणार आहे. ‘विज्ञान समागम’ मोबाईल ॲपही लवकरच सुरु करण्यात येणार आहे. टॉक शो, व्याख्यान यांचे थेट प्रसारण फेसबुक, ट्विटर, यु ट्यूब यासारख्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन पाहता येणार आहे. 
हे प्रदर्शन शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत सुरु राहील.  

भारताचे पहिले जागतिक महाविज्ञान प्रदर्शन ‘विज्ञान समागम’ चे मुंबईत उद्‌घाटन भारताचे पहिले जागतिक महाविज्ञान प्रदर्शन ‘विज्ञान समागम’ चे मुंबईत उद्‌घाटन Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 09, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.