.jpg)
बुलडाणा : गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी कुरखेडा तालुक्यात जांभूरखेडा गावानजीक लेंढारी नाल्याजवळ नक्षलवाद्यांनी भुसूरुंग स्फोट घडवून आणला. यामध्ये गडचिरोली पोलीसमधील 15 जवान शहीद झाले. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात दे.राजा तालुक्यातील आळंद येथील सर्जेराव ऊर्फ संदीप एकनाथ खार्डे (वय 30) आणि मेहकर येथील राजू नारायण गायकवाड (वय 32) यांना हौतात्म्य आले. या दोन्ही वीर जवानांवर आज 3 मे 2019 रोजी त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी साश्रूनयनांनी शहिदांना अखेरचा निरोप दिला. अंत्यदर्शनासाठी दोन्ही ठिकाणी असंख्य जनसागर लोटला होता. लोकप्रतिनिधींसह प्रशासनातील विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.
सर्जेराव खार्डे मूळचे आळंद ता.दे.राजा येथील असून त्यांना नयना नावाची तीन वर्षांची मुलगी आहे. ते पत्नी स्वाती समवेत कुरखेडा येथे राहत होते. सर्जेराव खार्डे 2 मार्च 2011 रोजी गडचिरोली पोलीस दलात रूजू झाले होते. त्यांच्या पश्चात आई –वडील, एक भाऊ आहे. गावाशेजारी असलेल्या त्यांच्या शेतामध्येच शहीद सर्जेराव खार्डे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी गावातून सजविलेल्या रथातून शहीद सर्जेराव यांच्या पार्थिवर शेतामध्ये आणण्यात आले. पोलीस जवानांनी बंदूकीच्या तीन फैरी झाडून शहीद सर्जेराव खार्डे यांना मानवंदना दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, उपविभागीय अधिकारी विवेक काळे, प्र. तहसिलदार संतोष कणसे, कल्याणी शिंगणे, नितीन शिंगणे, गंगाधर जाधव आदींसह लोकप्रतिनिधी, प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, बुलडाणा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राजू नारायण गायकवाड हे मूळचे प्रभाग क्र. 7, अण्णाभाऊ साठे नगर मेहकर येथील आहेत. त्यांना 3 वर्षांची मुलगी गायत्री व 9 महिन्यांचा मुलगा समर्थ आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्नी भारतीसमवेत गडचिरोली येथे राहत होते. राजू गायकवाड 1 फेब्रुवारी 2011 रोजी गडचिरोली पोलीस दलात रूजू झाले होते. त्यांच्या पश्चात आई – वडील, काका व आप्तेष्ट आहेत. राजू गायकवाड यांचे पार्थिव सजविलेल्या रथात त्यांच्या निवासस्थानापासून मेहकर शहरातून जानेफळ रस्त्यावरील स्मशानभूमीत आणण्यात आले. या ठिकाणी पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहीद राजू गायकवाड यांना मानवंदना दिली. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ संजय रायमूलकर, माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील- भुजबळ, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसिलदार संजय गरकल, नगराध्यक्ष कासम गवळी, उपनगराध्यक्ष जयचंद बाठीया, लोणारचे नगराध्यक्ष साहेबराव पाटोडे, मुख्याधिकारी श्री. वायकोस, श्याम उमाळकर, लक्ष्मण घुमरे, खामगांवचे अपर पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत आदींसह लोकप्रतिनिधी, प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, बुलडाणा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शहीद पोलीस जवान सर्जेराव खार्डे व राजू गायकवाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 03, 2019
Rating:
No comments: