नवी दिल्ली : समाज विज्ञान संशोधकांनी जगासमोर असणाऱ्या गरिबीचे उच्चाटन ते शाश्वत विकासासारख्या विविध प्रश्नांबाबत नाविन्यपूर्ण उपाय शोधून काढावेत असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले.
भारतीय समाज विज्ञान संशोधन परिषद अर्थात आयसीएसएसआरच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष कार्यक्रमात ते आज बोलत होते. लोकांची आयुष्य सुधारणे हे प्रत्येक संशोधनाचे उदिृष्ट असले पाहिजे असे ते म्हणाले. गरिबांचा उद्‌धार हे समाज विज्ञान संशोधनाचे लक्ष्य असले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना उपराष्ट्रपतींनी सर्वंकष विकासावर भर दिला. शाश्वत विकास, विकासविषयक लक्ष्य, लोकांच्या आरोग्याची काळजी, गरिबीचे उच्चाटन, शेतीपुढील समस्या आदींच्या निराकरणासाठी व्यावहारिक दृष्टीकोन असण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
आजचे संशोधन स्वत:ला विशिष्ट विभागात अडकवून घेऊ शकत नाहीत, त्यांना इतर विभागांशी निगडित समस्यांचीही किमान माहिती असायलाच हवी असे नायडू यांनी स्पष्ट केले.
बायो तंत्रज्ञान, जनुकीय अभियांत्रिकी, मायक्रोमशीन्स यासारख्या नव्या विभागांचाही त्यांनी उल्लेख केला. समाज विज्ञान संशोधनाच्या माध्यमातून धोरणकर्त्यांच्या माहितीचे संकलन मजबूत करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणामुळे अनेक नव्या संधी तसेच नवी आव्हाने निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
आयसीएसएसआरचे अध्यक्ष डॉ. बी. बी. कुमार, सदस्य सचिव प्रा. व्ही. के. मल्होत्रा आदी यावेळी उपस्थित होते.