Seo Services
Seo Services

महत्वाच्या बातम्या

केंद्राकडून ३.७९ लाख नवीन रोजगारनिर्मिती :

देशात बेरोजगारी वाढली असल्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारच्या खात्यात ३.७९ लाख नवीन रोजगार २०१७-२०१९ दरम्यान निर्माण झाल्याचा दावा सरकारने केला आहे. सरकारने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात हा दावा केला असून केंद्र सरकारच्या आस्थापनात २०१७ ते २०१८ या काळात २५१२७९ रोजगार निर्माण झाल्याचे म्हटले असून ही रोजगार संख्या १ मार्च २०१९ पर्यंत ३७९५४४ ने वाढून ३६१५७७० होण्याची शक्यता आहे. हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी १ फेब्रुवारीला मांडलेल्या अर्थसंकल्पात ही माहिती देण्यात आली आहे.

काँग्रेस व विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदी यांना बेरोजगारीच्या प्रश्नावर घेरले असताना ही आकडेवारी महत्त्वाची असून सरकारने बेरोजगारी वाढल्याचे किंवा अपेक्षित रोजगार निर्मिती न केल्याचे आरोप फेटाळले आहेत. राष्ट्रपतींच्या भाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय पेन्शन योजना, प्राप्तिकर विवरणपत्रे, वाहनांची विक्री यातील माहितीनुसार संघटित व असंघटित क्षेत्रात तसेच वाहतूक, हॉटेल व पायाभूत सुविधा क्षेत्रात रोजगार वाढल्याचा दावा केला आहे.

रेल्वे, पोलिस दल, कर खाते या विभागात कर्मचारी भरती करण्यात आली असून केंद्र सरकारच्या अनेक आस्थापनात रोजगार निर्मिती झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. रेल्वेत ९८९९९ , पोलिस खात्यात ७९३५३, प्रत्यक्ष कर विभागात ८०१४३, अप्रत्यक्ष कर विभागात ५३३९४, हवाई वाहतूक क्षेत्रात २३६३, टपाल खात्यात ४२१०६८ , परराष्ट्र खात्यात ११८७७ रोजगार १ मार्च २०१९ अखेर निर्माण होतील असा दावा सरकारने केला आहे.

जन धन ठेवी ९० हजार कोटींच्या टप्प्यात; सर्वाधिक खाती महिलांची 

नवी दिल्ली : जन धन या महत्त्वाच्या आर्थिक कार्यक्रमात अधिकाधिक लोकांना सामावून घेण्यासाठी सरकारने अपघात विम्याचे संरक्षण (कव्हर) दुपट्ट म्हणजे दोन लाख रुपये केल्यामुळे जन धन खात्यांतील एकूण ठेव ९० हजार कोटी रुपयांच्या पुढे जाण्याच्या पायरीवर आहे.

अर्थमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जन धन खात्यांतील जमा रक्कम मार्च, २०१७ पासून स्थिरपणे वाढत असून, आता ती रक्कम ३० जानेवारी रोजी ८९,२५७.५७ कोटी झाली आहे. २३ जानेवारी रोजी ही जमा रक्कम ८८,५६६.९२ कोटी रुपये झाली आहे. प्रत्येक घराचे बँकेत खाते असावे, या हेतूने प्रधानमंत्री जन धन योजना (पीएमजेडीवाय) २८ आॅगस्ट, २०१४ रोजी सुरू करण्यात आली. या योजनेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर सरकारने २८ आॅगस्ट, २०१८ नंतर जी नवी खाती सुरू केली त्यांच्यासाठी अपघात विम्याचे संरक्षण एक लाखांऐवजी दोन लाख रुपये केले आहे. या खात्यातील ओव्हरड्रॉफ्टची मर्यादाही दुप्पट करून १० हजार रुपये केली गेली आहे.

प्रत्येक घराचे बँक खाते या धोरणाऐवजी सरकारने आता बँकेत खाते नसलेल्या प्रत्येक प्रौढला खाते यावर लक्ष केंद्रित केले आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, पीएमजेडीवायअंतर्गत ३४१.४ दशलक्ष खातेधारक आहेत. या खात्यात सरासरी रक्कम २५ मार्च, २०१५ रोजी १,०६५ रुपये होती ती आता २,६१५ रुपये झाली आहे.

जन धन खात्यांपैकी ५३ टक्के खाती ही महिलांची असून, ५९ टक्के खाती ही ग्रामीण आणि निम-शहरी भागांतील आहेत. उपलब्ध माहितीनुसार, २७२.६ दशलक्ष खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड्स अपघात विम्याच्या संरक्षणासह दिली गेली आहेत.

रिझर्व्ह बँकेकडे सरकारने मागितले २७,३८० कोटी :

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने गेल्या काही वर्षांत गंगाजळी आणि जोखीम म्हणून ठेवून घेतलेले २७,३८० कोटी रूपये अर्थ मंत्रालयाने मागितले आहेत, असे सूत्रांकडून समजते.

रिझर्व्ह बँकेने २०१६-२०१७ वर्षात १३,१९० कोटी रूपये गंगाजळी व जोखीम म्हणून ठेवून घेतले होते. ती रक्कम २०१७-२०१८ वर्षात १४,१९० कोटी रूपये झाली. चालू आर्थिक वर्षासाठी मागील आर्थिक वर्षाप्रमाणे अंतरिम अतिरिक्त रक्कम उपलब्ध करून द्यावी आणि २०१६-२०१७ आणि २०१७-२०१८ च्या वर्षाप्रमाणे राखून ठेवलेली अतिरिक्त रक्कम हस्तांतरीत करावी अशी विनंती अर्थ मंत्रालयाने केली.

बँकेने चालू आर्थिक वर्षात ४० हजार कोटी रूपये आधीच हस्तांतरीत केलेले आहेत. सरकारची विनंती रिझर्व्ह बँकेने मान्य करून २८ हजार कोटी त्याला दिले तर आर्थिक वर्ष २०१८-२०१९ मध्ये एकूण अतिरिक्त रक्कम ६८ हजार कोटी होईल. पुढील आर्थिक वर्षात ६९ हजार कोटींचान लाभांश अपेक्षित आहे. रिझर्व्ह बँक, राष्ट्रीकृत बँका व आर्थिक संस्थांकडून सरकारने पुढील वर्षात ८२,९११ कोटी मिळावेत, असे ठरवले आहे.

अटीतटीच्या लढतीत भारताचा ४ धावांनी पराभव, न्यूझीलंडचा मालिका विजय :

हॅमिल्टन : हॅमिल्टनच्या तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टीत अटीतटीच्या झालेल्या लढतीत न्यूझीलंडनं टीम इंडियावर 4 धावांनी विजय साजरा केला. या विजयासह न्यूझीलंडनं तीन T20 सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली. या सामन्यात न्यूझीलंडनं भारतासमोर 213 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं.

या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सहा बाद 145 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि कृणाल पंड्यानं सातव्या विकेटसाठी 63 धावांची अभेद्य भागीदारी रचली. पण तरीही टीम इंडियाची विजयाची संधी अवघ्या चार धावांनी हुकली.

भारताची सुरुवातच निराशाजनक झाली. सलामीवीर शिखर धवन अवघ्या 5 धावांवर तंबूत परतला. यानंतर रोहित शर्मा आणि विजय शंकरने डाव सावरला. फार्मात खेळणारा विजय शंकर फटकेबाजीच्या नादात 43 धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या रिषभ पंतने आक्रमक खेळी करत धावसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला.

पंत 28 धावांवर बाद झाल्यानंतर रोहित शर्माही 38 धावा करून बाद झाला. यानंतर आलेल्या हार्दिक पंड्याने चांगली फलंदाजी केली मात्र तो जास्त काळ तग धरू शकला नाही. शेवटी दिनेश कार्तिक आणि कृणाल पंड्याने फटकेबाजी करत सामन्यात रोमांच आणला. मात्र भारताला परभवापासून ते वाचवू शकले नाहीत.

अडवाणीचे ३२वे राष्ट्रीय जेतेपद :

भारताचा आघाडीचा स्नूकरपटू पंकज अडवाणी याने युवा खेळाडू लक्ष्मण रावत याचा एकतर्फी लढतीत धुव्वा उडवत रविवारी आणखी एका राष्ट्रीय विजेतेपदाची कमाई केली. राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद पटकावतानाच अडवाणीने ३२व्यांदा राष्ट्रीय सुवर्णपदकावर कब्जा केला.

अडवाणीच्या खात्यात आता ११ कनिष्ठ स्पर्धेची विजेतेपदे, नऊ वेळा बिलियर्ड्सचा राष्ट्रीय विजेता, तीन वेळा ‘सिक्स-रेड’ स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद आणि नऊ वेळा स्नूकरचा विजेता अशी ३२ राष्ट्रीय विजेतेपदे जमा आहेत. त्याचबरोबर अडवाणीने २१ वेळा जागतिक स्पर्धाची विजेतेपदे पटकावली आहेत. रविवारी झालेल्या अंतिम फेरीवर पूर्णपणे अडवाणीचे वर्चस्व पाहायला मिळाले. अडवाणीने रावतवर ६-० अशी मात केली.

महिलांच्या अंतिम फेरीत, बेंगळुरूचा वर्षां संजीव हिने महाराष्ट्राचा अरांसा सांचीझ हिला ४-२ अशी धूळ चारत राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली. वर्षांने उपांत्यपूर्व फेरीत अमी कमानी हिला तर उपांत्य फेरीत विद्या पिल्ले हिचा पराभव करत या स्पर्धेवर वर्चस्व गाजवले.

मतदानाच्या दोन दिवसआधी प्रिंट, सोशल मीडियावर प्रचारास बंदी :

नवी दिल्ली : सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियावर प्रचारास बंदी घालण्यत यावी, अशी सूचना निवडणूक आयोगाने विधी मंत्रालयाला केली असल्याची माहिती मिळाली आहे. निवडणुकीत मतदानाच्या 48 तासाआधी उमेदवारांना प्रचारास बंदी असते. त्याचप्रकारे या माध्यमांवरही बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या काळात सेक्शन 126 नुसार, 48 तासांपूर्वी जाहीर सभा, रॅलीच्या माध्यमाने प्रचार करण्यास मनाई असते. मात्र उमेदवाराकडून प्रिंट मीडिया, सोशल मीडियावर जाहिराती देऊन प्रचार केला जातो. त्यामुळे निवडणूक आयोगाने विधी मंत्रालयाला याबाबत पत्र पाठवले आहे. शिवाय लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असंही पत्रात म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाच्या पत्रावर विधी मंत्रालयाने अजुन तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याचं कळतंय. लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. आगामी दोन महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. अशात निवडणूक आयोगाच्या सल्ल्यावर तात्काळ अंमलबजावणी शक्य नसल्याची बोललं जात आहे.

पुढील आठवड्यात संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सूचनेची दखल घेणं अद्यापतरी शक्य नाही.

अँमेझोनकडूनही यूपीआय सुविधा सुरु :

मुंबई : पेटीएम आणि फोनपेला टक्कर देण्यासाठी अँमेझोन या ई-कॉमर्स कंपनीने भारतात स्वत:ची यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) सुविधा सुरु केली आहे. अँक्सिस बँकेशी संलग्न असलेली ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. ही सुविधा अँमेझोन अँप्लिकेशनवर मिळणार आहे.

ही सुविधा सुरु करण्यासाठी यूजर्सना त्यांच्या बँक खात्याला यूपीआय अँपशी लिंक करावं लागणार आहे. यानंतर पेटीएम, फोनपे या अँप्सप्रमाणे पैसे पाठवू आणि प्राप्त करु शकतात. यूपीआय सर्व्हिसमध्ये बँक खाते क्रमांक आणि बँक आयएफएससी कोडची गरज लागत नाही. फक्त व्हर्च्यूअल पेमेंट अँड्रेसच्या साहाय्याने कुठेही पैसे पाठवता येतात.

बँकेत पैसे पाठवण्यासाठी किंवा काढण्यासाठी रांग लावावी लागत होती, सोबत अधिक वेळही खर्च व्हायचा. मात्र अशाप्रकारच्या अँप्लिकेशन्समुळे बँकेतील रांगा कमी होण्यास मदत होत आहे. सोबत वेळही वाचत आहे. त्यामुळे सध्या या अँप्लिकेशनचा वापर पैसे पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी मोठ्याप्रमाणात होत आहे.

सरकारकडून डिजीटल इंडिया करण्यासाठी भीम अँप्लिकेशन सुरु करण्यात आलं होतं. ज्यामुळे अनेकांना त्याचा फायदा झाला होता. शिवाय गुगलपेसारखे अँप्लिकेशन सुद्धा मोठ्याप्रमाणात वापरले जात आहे. अशात आता अँमोझोन या ई-कॉमर्स कंपनीनेही ही सुविधा सुरु केली आहे. शिवाय व्हॉट्सअँप पण यूपीआय सुविधा सुरु करणार असल्याची माहिती आहे.

पेटीएम, फोने पे, अँमेझोन पे, मोबीक्विक, फ्रिचार्ज या मोबाईल व्हॉलेट अँप्लीकेशनवर यूपीआय सुविधा उपलब्ध आहे.
महत्वाच्या बातम्या महत्वाच्या बातम्या Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 11, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.