मंत्री पंकजा मुंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद; ग्रामसेवक संघटनेकडून 2 लाखाचा तर लिपिक संघटनेकडून 11 हजार रुपयांचा धनादेश
मुंबई : काश्मिरमधील पुलवामा येथील शहिदांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला - बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील विविध कर्मचारी संघटनांनी आज मंत्रालयात मदतीचे धनादेश मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सुपुर्द केले.
भारताच्या शूर वीरांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी स्वेच्छेने आर्थिक योगदान देण्याचे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी समाज माध्यमांद्वारे केले होते. त्यास प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी मंत्रालयातील ग्रामविकास, महिला बालविकास विभागासह मंत्री कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक लाख रुपयांपेक्षा जास्त मदतीचे धनादेश जमा केले. आज राज्यातील विविध कर्मचारी संघटनांनी मंत्री पंकजा मुंडे यांची मंत्रालयात भेट घेऊन मदतीचे धनादेश त्यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, उपसचिव गिरीष भालेराव उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या वतीने 2 लाख रुपयांच्या रक्कमेचा धनादेश संघटनेच्या प्रतिनिधींनी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सुपुर्द केला. तसेच या संघटनेसह जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गाच्या संघटनांची भेट घेऊन सर्व कर्मचाऱ्यांकडून किमान 100 रुपयांचे योगदान स्वेच्छेने देणार असल्याचे संघटनेच्या माध्यमातून सांगितले. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक संघटनेच्या प्रतिनिधींनी यावेळी 11 हजार रुपयांच्या मदतीचे योगदान दिले. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषीवर्गीय राजपत्रित संघटनेच्या प्रतिनिधींनी सर्व अधिकारी किमान 100 रुपयांचे योगदान स्वेच्छेने देणार असल्याचे संघटनेच्या माध्यमातून सांगितले.
मंत्री कार्यालयातील कर्मचारी अजय डहाके यांच्या पत्नी अंजली डहाके यांनीही आज १ हजार १ रुपये रकमेचा धनादेश दिला.
खाली दिलेल्या बँक अकाउंटमध्ये Bharat Ke Veer या नावाने बँक ट्रान्सफर किंवा धनादेश किंवा रोख रक्कम भरुन ह्या सत्कार्यामध्ये हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Account Name – Bharat Ke Veer
State Bank of India – New Delhi Main Branch (0691)
Account Number – 36724508925
IFSC Code – SBIN0000691
पुलवामा शहिदांच्या कुटुंबियांसाठी विविध कर्मचारी संघटनांकडून मदत
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
February 21, 2019
Rating:
No comments: