"2014 साली राज्यात स्थिर सरकार यावं, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या सरकारला मदत केली होती. एका निवडणुकीनंतर तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा नव्या निवडणुकीला सामोरं जावं लागू नये, यासाठी राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिला. त्यामागे केवळ राज्याचं हित, हाच हेतू होता.
"पण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेच राज्यातील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचं काम केलं आहे. या 16 मंत्र्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचं पाप मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. भाजपला आणि मुख्यमंत्र्यांना मदत करण्याची कधीही भूमिका मी घेतलेली नाही," असं विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बीबीसी मराठीच्या राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
बीबीसी मराठीच्या या निवडणूक विशेष कार्यक्रमात राज्यातील प्रमुख राजकीय नेते आपापली मतं आणि येत्या निवडणुकांमधली स्वतःची, स्वतःच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत.
तेव्हा धनंजय मुंडे यांनी रा. स्व. संघ, भाजपाची भूमिका, बहुजन वंचित आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुतील भूमिका अशा अनेक विषयांवर बीबीसी मराठीच्या अभिजित करंडे यांच्याशी बातचीत केली.
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व हालचाली आणि भूमिका भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची आहे, असं दिसत आहे. "राज्यामध्ये आम्ही गेल्या चार वर्षांमध्ये 20 वेळा चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रवास करून लोकांची मतं जाणून घेतली आहेत. निर्धार परिवर्तन यात्रेतही तीच भूमिका आहे. त्यामुळं लोकांचं मत आम्हाला माहिती आहे. प्रकाश आंबेडकर यांना आम्ही चार जागा सोडण्यासाठी तयार होतो मात्र त्यांनी चर्चाच करायची, अशी भूमिका घेतली.
"वंचित बहुजन आघाडीला 2 ते 3 टक्क्यांशिवाय जास्त मतदान होणार नाही, हे भाजपलाही माहिती आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा भाजप आणि रा. स्व. संघालाच मदत होणार आहे," असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं.
रणजित सिंह मोहिते पाटील भाजपात जातील का, असा प्रश्न विचारताच ते म्हणाले, "मोहिते पाटील घराणं भाजपमध्ये जाईल, हे मी पण बातम्यांमधूनच बघतोय. मी आता पर्यंत तरी रणजित दादांशी बोललो नाहीये, पण आता नक्की बोलेन."
16 मंत्र्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचं पाप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 19, 2019
Rating:
No comments: