नवी दिल्ली : भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीला अखेर मुहूर्त सापडला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा यामध्ये करण्यात आली असून 14 विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.
भाजपने केवळ अहमदनगर आणि लातूरच्या उमेदवारांमध्ये बदल केले आहेत. लातूरमध्ये सुधाकर राव शृंगारे, तर अहमदनगरमधून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाकीच्या 14 जागांवर विद्यमान खासदारांनाच पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे.
भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार
नंदुरबार - हीना गावित
धुळे - सुभाष भामरे
रावेर- रक्षा खडसे
अकोला - संजय धोत्रे
वर्धा - रामदास तडस
नागपूर - नितीन गडकरी
गडचिरोली-चिमुरी - अशोक नेते
चंद्रपूर- हंसराज अहिर
जालना - रावसाहेब दानवे
भिवंडी - कपिल पाटील
मुंबई उत्तर - गोपाळ शेट्टी
मुंबई उत्तर मध्य - पूनम महाजन
अहमदनगर - सुजय विखे पाटील
बीड - डॉ. प्रीतम मुंडे
लातूर - सुधाकरराव शृंगारे
सांगली - संजयकाका पाटील
भाजप मुंबईतील सहापैकी तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र किरीट सोमय्या खासदार असलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघ वगळता इतर जागांवरील उमेदवारांची घोषणा झाली. शिवसेनेकडून सोमय्यांच्या नावाला विरोध असल्यामुळे सोमय्यांबाबत काय निर्णय होणार, हे स्पष्ट झालेलं नाही.
भाजपने केवळ अहमदनगर आणि लातूरच्या उमेदवारांमध्ये बदल केले आहेत. सुजय विखे यांच्या भाजपप्रवेशानंतर नगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट होणं निश्चित मानलं जात होतं. तर लातूरचे उमेदवार सुधाकर शृंगारे हे वडवळ-नागनाथ गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. पालकमंत्री संभाजी पाटील - निलंगेकर यांच्या ते जवळचे मानले जातात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यासारख्या भाजपच्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी हे वाराणसीतून, गृहमंत्री राजनाथ सिंह लखनौमधून तर भाजपाध्यक्ष अमित शाह गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. गांधीनगर हा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे अडवाणींच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
सुषमा स्वराज, उमा भारती यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा आधीच केली होती.
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा!!
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 21, 2019
Rating:
No comments: