मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 च्या आदर्श आचार संहिता काळात मुद्रणालयांनी प्रचार साहित्य तसेच इतर छपाईबाबत विशेष काळजी घेऊन आचारसंहितेचे पालन करावे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या प्रिंटर्सना कायद्यानुसार सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते. याबाबत सर्व संबंधितांनी कायदेशीर तरतुदीचे पालन करुन निवडणूक कामाला सहकार्य करावे असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 कलम 127 अ द्वारे निवडणूक पत्रकांच्या छपाईवर आणि प्रसिद्धीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याकडे सर्व राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार आणि मुद्रणालयांच्या चालक व मालकांचे लक्ष वेधण्यात आले आहे. वरील कलमाच्या कोणत्याही उपबंधाचे उल्लंघन करणाऱ्यांना सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा दोन हजार रुपयांपर्यंत दंडाची अथवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. यांची संबंधितांनी नोंद घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
उपरोक्त कलमान्वये प्रथम असे विहित करण्यात आले आहे की, हाताने नक्कल काढण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रक्रियेने छापण्यात किंवा अनेक प्रती काढण्यात आलेले निवडणुकीसंबंधीचे प्रत्येक पत्र , हस्तपत्रक, घोषणाफलक किंवा भित्तीपत्रक यांच्या दर्शनी भागावर मुद्रकांचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. असे कोणतेही पत्रक मुद्रकाने इच्छुक प्रकाशकाकडून त्यांनी ते स्वत: स्वाक्षरीत केलेले आहे, त्या व्यक्तीला व्यक्तिश: ओळखतील अशा दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेल्या त्या प्रकाशकांची ओळख पटवणारे प्रतिज्ञापत्र (दोन प्रतीमध्ये) घेणे अत्यावश्यक आहे.
दस्तऐवज छापण्यात आल्यावर मुद्रकाने प्रतिज्ञापत्राची एक प्रत व पत्रक इत्यादींच्या चार प्रती जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे 3 दिवसांच्या आत सादर कराव्यात. त्यासोबत छपाई केलेल्या पत्रकासाठी किती मोबदला घेतला याबाबत ठराविक प्रपत्रात माहिती देण्यात यावी. असे आवाहन जिल्हा निवडणूक विभाग मुंबई शहर यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
निवडणूक काळात मुद्रणालयांनी छपाईबाबत विशेष काळजी घेऊन आचारसंहितेचे पालन करावे
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 22, 2019
Rating:
No comments: