मागील १० वर्षात महाराष्ट्रातील १०१ जवान शहीद, मोदी सरकारच्या कार्यकाळात ५५ जवानांना वीरमरण :
मुंबई : मागील दहा वर्षात देशाचं रक्षण करताना महाराष्ट्रातील एकूण 101 जवान शहीद झाले असल्याचं माहिती अधिकारात स्पष्ट झालं आहे. शिवाय काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्रातील 44 जवान शहीद झाले आहेत. त्यापैकी 33 जवान नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेत आल्यापासून शहीद झाले आहेत. 51 जवान 20 टक्के ते 70 टक्क्यांपर्यंत अपंग झाले आहेत.
जम्मू काश्मीर विषयक मोदी सरकारचे धोरण आक्रमक आहे. त्यामुळे जवानांची अधिक हानी झाली, असा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाच्या टीमने माहिती अधिकाराचा वापर केला. गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातील किती जवान शहीद झाले याची माहिती मिळावी, यासाठी राज्य सैनिक कल्याण विभागाकडे माहिती अधिकारामार्फत मागणी करण्यात आली होती. दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर ही माहिती मिळाली आहे. 1 जून 2009 ते 31 मे 2018 पर्यंतची ही आकडेवारी आहे.
दहशतवादी प्रशिक्षण थांबवण्यासाठी मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केले. पॅलेट गन्सचा झालेला वापर चांगलाच वादग्रस्त ठरला होता. याच वाढत्या तणावामुळे 2017 या वर्षामध्ये महाराष्ट्राचे सर्वाधिक सतरा जवान जम्मू काश्मीरमध्ये शहीद झाले आहेत.
दहा वर्षात सातारा जिल्ह्यातील 17, कोल्हापूरचे 14 , सांगलीचे 8 जवान शहीद झाले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते नितिन चनशेट्टी यांनी या जवांनापैकी किती जवानांच्या कुटुंबांचं पुर्नवर्सन झालं आहे?
विंग कमांडर अभिनंदन यांची शौर्यकथा आता पाठ्यपुस्तकात :
भारतीय हवाईदलाचा धाडसी पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे आजवर अनेकांनी कौतुक केले आणि अजूनही करीतच आहेत. दरम्यान, त्यांची शौर्यकथा आता शाळांमधील पाठ्यपुस्तकातही समाविष्ट होणार आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शौर्याचे धडे गिरवता येणार आहेत. राजस्थान सरकारने हा निर्णय घेतला आहे.
राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंदसिंह दोतसरा यांनी सोमवारी ट्विट करुन याची माहिती दिली. अभिनंदन यांचा सन्मान करण्यासाठी राजस्थान सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याची माहिती त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारेही दिली आहे. यासाठी त्यांनी अभिनंदनदिवस असा हॅशटॅगही वापरला आहे.
भारतीय हवाई हद्दीत बेकायदा घुसलेल्या पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांना पळवून लावताना विंग कमांडर यांचे मिग २१ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडले. त्यानंतर त्यांनी तब्बल ६० तास पाकिस्तानातच्या ताब्यात घालवले. त्यानंतर ते तीन दिवसांपूर्वी भारतात होते.
दोतसरा यांनी ही घोषणा केली असली तरी हा धडा नेमका कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे, याचे स्पष्टीकरण त्यांनी दिलेले नाही. त्याचबरोबर पुलवामातील शहीदांची कथाही या धड्यामध्ये समाविष्ट केली जाणार आहे.
भारतीय उत्पादनांवर अमेरिकेचे निर्बंध :
भारताचा व्यापार अग्रक्रमाचा दर्जा काढून घेण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ठोस पावले उचलली आहेत. यामुळे भारताकडून अमेरिकेला होणारी ५.६अब्ज डॉलर्सची निर्यात आता करमुक्त राहाणार नाही. भारतीय उत्पादनांवरील या र्निबधाचा मोठा फटका देशातील लघु आणि मध्यम उद्योगांना बसण्याची भीती असली, तरी या निर्णयाची आम्हाला मोठी झळ बसणार नाही, असा निश्चिंत पवित्रा भारताने घेतला आहे.
अमेरिकी उत्पादनांना आपली बाजारपेठ पूर्णपणे खुली करून द्यायला भारत तयार नसल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. अमेरिकेला भारताच्या बाजारपेठेत समान आणि व्यवहार्य संधी मिळायला हवी, यासाठी अमेरिका करीत असलेल्या प्रयत्नांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने भारताचा व्यापार अग्रक्रम दर्जा देणारी ‘जनरलाइजड् सिस्टिम ऑफ प्रेफरन्सेस’ (जीएसपी) ही सवलत रद्द करण्याची पावले उचलली जात आहेत. तसे पत्र ट्रम्प यांनी अमेरिकन प्रतिनिधी गृहाला पाठवले आहे.
अर्थात त्याचे अध्यक्षीय आदेशात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असून त्यामुळे या निर्णयाचा प्रत्यक्ष परिणाम भारतावर होण्यास अवधी आहे. भारतातील सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतला जाणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी धक्कादायक असले, तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम निवडणुकीपर्यंत दिसणार नसल्याने उद्योग विभागाने या कारवाईला फारसे महत्त्व दिल्याचे भासवलेले नाही. भारताप्रमाणेच तुर्कस्थानवरही अमेरिकेने हीच कारवाई केली आहे.
जीएसपी व्यवस्थेनुसार भारतातील वाहनांचे सुटे भाग, कापड उद्योग यासारख्या दोन हजार उत्पादनांना अमेरिकेत करमुक्त प्रवेश मिळतो. जर अमेरिकी काँग्रेसने दिलेले निकष एखादा विकसनशील देश पूर्ण करीत असेल तर ही सवलत व्यापारात दिली जाते. २०१७ मध्ये अमेरिकेत ५.७ अब्ज डॉलर्सच्या भारतीय मालाची करमुक्त आयात केली गेली.
अमेरिकी काँग्रेसच्या प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांना पाठवलेल्या पत्रात ट्रम्प यांनी म्हटले आहे, की ‘‘भारताने अमेरिकी वस्तूंना खुली आणि समान संधी देण्याचे कुठलेही आश्वासन दिलेले नाही, त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्याचा विचार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात या संदर्भात अनेकदा चर्चा होऊनही त्याचा काही उपयोग झालेला नाही त्यामुळे भारतीय उत्पादनांना करसवलतींतून वगळण्यात यावे.’’
कर्तारपूर कॉरिडॉरद्वारे होणार तणाव दूर?; पाकचे अधिकारी भारत भेटीवर :
सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कर्तारपूर कॉरिडॉर हा एक भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव दूर करण्याचा मार्ग ठरु शकतो. कारण याप्रकरणी चर्चेसाठी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचे एक पथक लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे.
शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव हे आपल्या जीवनाच्या शेवटच्या काळात सध्या पाकिस्तानात असलेल्या कर्तारपूर गुरुद्वार दरबार साहिबपर्यंत भारतीयांना दर्शनासाठी जाता यावे यासाठी भारतातील भाविकांना व्हिसाशिवाय पाकिस्तानात जाता येणार आहे. यासंबंधी दोन्ही देशांमध्ये करारावर १४ मार्च रोजी सह्या होणार आहेत. त्यासाठी पाकिस्तानचे एक पथक दिल्लीला येणार आहे. पाकिस्तानकडून अधिकृतरित्या ही माहिती देण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते महंम्मद फैझल यांनी भारताचे उच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांनी माहिती दिली. त्याचबरोबर भारतालाही या कॉरिडॉर संबंधी चर्चेसाठी पाकिस्तानात येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
१५२२ मध्ये गुरुनानक यांनी कर्तापूर येथे पहिले गुरुद्वारा स्थापन केले तसेच इथेच त्यांनी आपला शेवटचा श्वासही घेतला. त्यामुळे शीख समुदायासाठी हे ठिकाण खूपच महत्व आहे. सध्या हे स्थान भारतीय सीमेपासून ४ किमी लांब पाकिस्तानात स्थित आहे.
दिनविशेष :
राष्ट्रीय दंतचिकित्सक दिन
महत्वाच्या घटना
१८४०: बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.
१९४०: रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली.
१९५३: जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
१९५७: घाना देशाचा स्वातंत्र्य दिन.
१९७१: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.
१९९२: मायकेल अँजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरवात झाली.
१९९७: स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.
१९९८: गझल गायक जगजितसिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.
१९९९: राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.
२०००: शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्कम करपात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब केला.
२००५: देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला.
जन्म
१८९९: चरित्रकार आणि संपादक शि. ल. करंदीकर यांचा जन्म.
१९१५: बोहरी धर्मगुरू सैयदना मोहम्मद बर्हानुद्दिन यांचा जन्म.
१९३७: पहिली महिला रशियन अंतराळातयात्री व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा यांचा जन्म.
मृत्यू
१९६७: कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे यांचे निधन.
१९६८: साहित्यिक नारायण गोविंद चापेकर उर्फ ना. गो. चापेकर यांचे निधन.
१९७३: नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका पर्ल एस. बक यांचे निधन. (जन्म: २६ जून १८९२)
१९८१: रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे पहिले भारतीय प्राचार्य गो. रा. परांजपे यांचे निधन.
१९८२: जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या अॅन रँड यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९०५)
१९९२: सुप्रसिद्ध मराठी लेखक रणजीत देसाई यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९२८)
चालू घडामोडी व दिनविशेष - ६ मार्च २०१९
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 06, 2019
Rating:
No comments: