जम्मू-काश्मीर मुद्दा हा भारताचा अंतर्गत प्रश्न, परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण :
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, तो विषय पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनने (ओआयसी) जम्मू आणि काश्मीरवर केलेल्या ठरावावर रवीश कुमार शनिवारी बोलत होते.
जम्मू आणि काश्मीरसंदर्भातील ठरावांबद्दल बोलायचे तर आमची भूमिका सुसंगत व चांगली परिचित आहे. ५७ देश सदस्य असलेल्या ओआयसीने काश्मीरवर संमत केलेल्या ठरावात भारतावर कठोरपणे टीका करण्यात आल्यावर परराष्ट्र मंत्रालयाने वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
तत्पूर्वी, ओआयसीने जम्मू आणि काश्मीरमध्ये जुलै २०१६ पासून अत्याचार वाढल्याचे, अंतर्गत दहशतवाद वाढल्याचे, बेकायदेशीरपणे स्थानबद्ध करून ठेवण्याचे प्रमाण वाढल्याची जोरदार टीका केली होती.
भारतावर ओआयसीने काश्मीरवरून टीका करून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भारताच्या हवाई दलाचा विमान पायलट अभिनंदन वर्धमान यांना परत पाठविल्याबद्दल प्रशंसा केली होती. ओआयसीने काश्मीरवर केलेल्या ठरावावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रविवारी टीका केली.
भारतीय वस्तूंवर २५ टक्के आयात कर लावण्याचा ट्रम्प यांचा इशारा :
भारत हा सर्वाधिक आयात कर लादणारा देश आहे, अशी टीका अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली असून अमेरिकेत येणाऱ्या भारतीय वस्तूंवरही तसाच जास्तीचा आयात कर लागू करण्याचा विचार करीत आहोत असा इशारा दिला आहे. भारतीय वस्तूंवर आम्ही जशास तसे न्यायाने १०० टक्के कर लादणार नाही, पण निदान २५ टक्के कर लागू करू असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या प्रस्तावाला सिनेटमध्ये विरोध आहे, त्यामुळे त्यांनी समर्थकांना पाठिंब्यासाठी आवाहन केले.
मेरीलँड या वॉशिंग्टनच्या उपनगरात आयोजित कॉन्झर्वेटिव्ह पॉलिटिकल अॅक्शन कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितले, की भारत हा जास्त आयात कर लादणारा देश आहे. ते आमच्या वस्तूंवर खूप कर लावतात. ट्रम्प यांचे आयात करावरून चीनशीही व्यापार युद्ध सुरू असून त्यांनी तूर्त समेटाची भूमिका घेतली आहे, पण वाटाघाटी फिसकटल्या तर चिनी वस्तूंवरही अमेरिका जास्त आयात कर आकारणार आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठय़ा दोन तासांच्या भाषणात त्यांच्या राजकीय विरोधकांवर सडकून टीका केली. जागतिक प्रश्न, द्विपक्षीय संबंध, देशांतर्गत मुद्दे या सर्व बाबींना त्यांनी स्पर्श केला. हार्ले डेव्हिडसन मोटरसायकलचे उदाहरण देऊन त्यांनी सांगितले, की आमच्या या मोटारसायकली भारतात पाठवल्या जातात तेव्हा त्यावर शंभर टक्के कर लादला जातो. भारत जेव्हा त्यांच्या मोटारसायकली आमच्या देशात पाठवतो तेव्हा आम्ही त्यावर काहीच कर लावत नाही. त्यामुळे भारताच्या वस्तूंवर किमान काही तरी कर लादणार आहोत.
यापूर्वी त्यांनी व्हाइट हाऊसमधील एका कार्यक्रमात २४ जानेवारीला असे सांगितले होते,की भारताने हार्ले डेव्हिडसन मोटरसायकलींवरील कर १०० टक्क्य़ांवरून ५० टक्के केला आहे, त्यामुळे आपण समाधानी आहोत. आमच्या मोटरसायकलवरचा कर पन्नास टक्के कमी करण्यात यश आले आहे. पण तरी अमेरिकी मोटरसायकलवर ५० टक्के कर व भारतीय मोटरसायकलवर २.४ टक्के कर अशी परिस्थिती अजून कायम आहे. खरेतर भारतीय वस्तूंवर शंभर टक्के कर लादायला हवा, २५टक्के कर लावतो म्हटले तर लोक मूर्खात काढतील, पण तरी भारतीय वस्तूंवर २५ टक्के कर लावण्याचा विचार आहे. त्यासाठी राजकीय पाठिंबा मिळावा, असे ट्रम्प म्हणाले.
हवाई दल व नौदल प्रमुखांना झेड प्लस सुरक्षा देणार :
भारतीय नौदल व हवाई दलाच्या प्रमुखांना आता झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. सुरक्षा संस्थांच्या माहितीनुसार त्यांना धोका असल्याचे दिसून आले आहे. हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ व नौदल प्रमुख सुनील लांबा यांना झेड प्लस सुरक्षा दिली जाणार असून, लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना आधीच ती देण्यात आली आहे.
संबंधित दलांमधील कमांडोच त्यांच्या नजीकच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत, सुरक्षेच्या पुढच्या कडीत केंद्रीय व राज्य सुरक्षा संस्थांचे जवान असतील. भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान मारले गेल्यानंतर वाढला होता.
त्यानंतर भारताने पाकिस्तानात शिरून बालाकोट या खैबर पख्तुनवा प्रांतातील जैशच्या छावणीवर हवाई हल्ले केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही काश्मीरमध्ये लष्करी आस्थापनांना लक्ष्य करीत हवाई हल्ले केले होते. पाकिस्तानने दिलेल्या प्रत्युत्तरात एफ १६ विमानासह एकूण २४ लढाऊ जेट विमाने सामील होती.
भारताचा सर्वात मोठा शत्रू मसूद अजहरचा मृत्यू - सूत्र :
नवी दिल्ली : भारताचा सर्वात मोठा शत्रू जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मौलाना मसूद अजहरचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशभरातल्या सर्व वृत्तसंस्था, वृत्तवाहिन्यांनी या बातमीची शक्यता वर्तवली आहे. मात्र अजूनही या वृत्ताला पाकिस्तानने दुजोरा दिलेला नाही.
पाकिस्तानच्या स्थानिक मीडियामध्ये मसूद अजहरच्या मृत्यूची चर्चा सुरु आहे. अजहरचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही. अद्याप मसूदच्या मृत्यूबाबत पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मसूद अजहर किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच मसूदची प्रकृती एवढी खालावली आहे की तो घराबाहेरही पडू शकत नसल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची म्हटलं होतं.
मात्र मसूद अजहर हा भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये मारला गेल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. तर नाचक्की होईल या भीतीने पाकिस्तानने अद्याप याबाबत माहिती दिली नसून तो आजारी असल्याचा कांगावा करत असल्याच्याही चर्चा सुरु आहे.
संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी घेतली विंग कमांडर अभिनंदन यांची भेट :
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या तावडीतून सुखरुप परतलेले विंग कमांडर अभिनंदन वर्थमन यांची आज संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी भेट घेतली. त्यावेळी भामरे यांच्यासोबत हवाई दलाचे अधिकारी उपस्थित होते.
काल संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनीही अभिनंदन यांची भेट घेतली. त्यावेळी सीतारमण यांच्यासोबत हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ उपस्थित होते.
भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मंगळवारी पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकने बुधवारी सकाळी भारतात घुसखोरी केली होती. पाकिस्तानी विमानांचा पाठलाग करताना भारताचं मिग-21 विमान पाकिस्तानच्या हद्दीत शिरलं होतं.
पाकिस्तानच्या विमानाला जमिनदोस्त केल्यानंतर भारताचं विमानही जमिनीवर कोसळलं. मात्र अभिनंदन यांनी पॅराशूटद्वारे जमिनीवर उडी मारली. त्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराने त्यांना ताब्यात घेतलं होतं. मात्र भारताने पाकिस्तानवर दबाव टाकत अभिनंदन यांच्या सुटकेची मागणी पाकिस्तानकडे केली.
एअर स्ट्राइकमध्ये २५० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा - अमित शाह :
भारताने पाकिस्तानातील बालकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले त्याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये २५० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा केला आहे. रविवारी गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले.
उरी हल्ल्यानंतर लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केला. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान सर्तक असल्याने सर्जिकल स्ट्राइक होणार नाही असे लोक म्हणत होते. पण नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयाने तेराव्या दिवशीच एअर स्ट्राईक झाला. यामध्ये २५० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला असे शाह म्हणाले.
विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या हाती लागल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारचा प्रभाव इतका होता की, ४८ तासांच्या आत त्यांची सुटका करावी लागली. इतक्या कमी वेळात सुटका होण्याची जगातील ही पहिली घटना होती असे अमित शाह म्हणाले. अमेरिका आणि इस्त्रायल नंतर सैन्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेणारा भारत हा जगातील तिसरा देश आहे असे ते म्हणाले.
एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन विरोधी पक्ष पाकिस्तानला संधी देत आहेत. ममता बॅनर्जींनी एअर स्ट्राइकचे पुरावे मागितले. विरोधी पक्षातील नेत्यांच्या विधानामुळे पाकिस्तानच्या चेहऱ्यावर हास्य फुलत आहे. तुम्ही मोदी सरकार आणि सैन्याच्या पाठिमागे उभे राहू शकत नसाल तर कमीत कमी शांत राहा असे अमित शाह सूरत येथील एका कार्यक्रमात म्हणाले.
चांगल्या वर्तणुकीमुळे दोषीची फाशी रद्द करून जन्मठेप :
त्याला सुधारायचे आहे. आपल्याकडून चूक घडल्याचा पश्चात्ताप होत असल्याचे त्याने तुरुंगात लिहिलेल्या कवितांमधूनही दिसते, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने रविवारी एका दोषीची फाशी रद्द करून त्याला जन्मठेप ठोठावली. न्या. ए. के. सिक्री यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल दिला.
ज्ञानेश्वर बोरकर याने अल्पवयीन मुलाच्या खुनाचा गुन्हा केला तेव्हा तो २२ वर्षांचा होता. तो गेली १८ वर्षे तुरुंगात आहे. त्याने तुरुंगात ‘सुसंस्कृत माणूस’ बनण्याचा प्रयत्न केला. तो सुधारू शकतो आणि त्याचे पुनर्वसनही करता येऊ शकते, हे त्याच्या तुरुंगातील वर्तणुकीवरून निदर्शनास आले, असे मत खंडपीठाने नोंदवले. खंडपीठात न्या. एस. अब्दुल नझीर आणि एम. आर. शहा यांचाही समावेश होता.
या प्रकरणाची वस्तुस्थिती आणि परिस्थिती विचारात घेतल्यानंतर फाशीच्या शिक्षेचे समर्थन करता येत नाही. गुन्ह्य़ाचे गांभीर्य आणि दोषीची तुरुंगातील चांगली वर्तणूक यामुळे निर्माण झालेली परिस्थिती याचा विचार करता आमचे मत आरोपीच्या चांगल्या वर्तणुकीच्या बाजूने झुकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
दोषीविषयी सहानुभूती निर्माण करणारे अनेक घटक आहेत. तुरुंगात लिहिलेल्या कवितांमधून तरुणपणी केलेल्या चुकीबद्दल पश्चात्ताप व्यक्त करणे हाही त्यातला एक घटक आहे. त्याची ही वर्तणूक तो सुधारण्यास तयार असल्याचे दर्शवते, असेही मत खंडपीठाने नोंदवले. बोरकर याची तुरुंगातील वर्तणूक चांगली होती. त्याने तुरुंगात आपले शिक्षणही पूर्ण केले. त्याने एक सर्वसामान्य नागरिक होण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्याकडून चूक घडली, हे त्याने लिहिलेल्या कवितांमधूनही जाणवते, असा युक्तिवाद त्याच्या वकिलाने केला.
राष्ट्रीय गदा युद्ध स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद :
औरंगाबाद : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय गदायुद्ध स्पर्धेत महाराष्ट्राने १६ सुवर्ण, १० रौप्य आणि ४ कास्यांसह एकूण ३० पदकांची लूट करताना महाराष्ट्राने विजेतेपद पटकावले. चंदीगडने दुसरे व झारखंड संघने तिसरे स्थान पटकावले.
महाराष्ट्राचे पदकविजेते खेळाडू : सुवर्ण : समीक्षा राठोड, आकाश दारकड, अभय इखारे, कुणाल काटकर, आशिष म्हस्के, आदर्श बोर्डे, यश चव्हाण, ओम सोनवणे, रेणुका यादव, सायली शिंदे, यश राजपूत, ओंकार गरड, ऋषिकेश केकाण, अन्वर पठाण, रामेश्वर पुंड, शार्दुल उबाळे. रौप्य : गौरव तेलभाते, क्षितिज दाभाडे, सौरभ झारे, पार्थ सोनवणे, संस्कृती झारे, तेजस पाठोडे, पार्थ दिवठाणकर, प्रदीप देवकाते, श्री भंडारे. कास्यपदक : रोहित राठोड, श्रावणी मगर, श्रेयस कुरले, कुणाल शिंदे. विजेतेपद पटकावणाऱ्या महाराष्ट्र संघाला राज्य संघटनेचे सचिव मच्छिंद्र राठोड, प्रशिक्षक संदीप राठोड, चारुलता सूर्यवंशी, चंद्रशेखर सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल गदा स्पोटस् असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष मिलिंद पाटील, केदार रहाणे, पंकज भारसाखळे, विकास ठोकळ, सुधाकर गायकवाड, उदय डोंगरे, दिनेश वंजारे, संदीप जगताप, प्रदीप खांड्रे, महेश उबाळे, प्रभारी क्रीडा उपसंचालक अशोक गिरी, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, माणिक राठोड, गणेश कड, विष्णू दिवठाणकर, ज्ञानेश्वर सोनवणे, राजाराम राठोड आदींनी अभिनंदन केले आहे.
दिनविशेष :
महत्वाच्या घटना
१८३७: शिकागो शहराची स्थापना झाली.
१८६१: अमेरिकेच्या १६ व्या राष्ट्राध्यक्षपदी अब्राहम लिंकन यांची निवड झाली.
१८८२: ब्रिटन मधील पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडन मध्ये सुरु.
१९५१: नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.
१९८०: प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.
१९९६: चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर.
२००१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले.
जन्म
१८९३: पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९८५)
१९२६: अँमवे चे सहसंस्थापक रिचर्ड डेवोस यांचा जन्म.
१९७३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.
१९८६: इंस्ताग्राम चे सहसंस्थापक माईक क्रीगेर यांचा जन्म.
मृत्यू
१९२५: रवीन्द्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: ४ मे १८४९ – कोलकाता, पश्चिम बंगाल)
१९५२: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटीश जैवरसायन शास्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८५७ – आयलिंग्टन, लंडन, इंग्लंड)
१९८५: साहित्यिक डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे निधन.
१९९२: सकाळ च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. च्या संचालिका शांताबाई परुळेकर यांचे निधन.
१९९९: भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, एअर इंडियाचे पहिले कर्मचारी विठ्ठल गोविंद गाडगीळ यांचे निधन.
२०००: स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य गीता मुखर्जी (जन्म: ८ जानेवारी १९२४)
२००७: भारतीय संसद सदस्य सुनील कुमार महातो यांचे निधन.
२०११: केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल अर्जुनसिंग यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९३०)
चालू घडामोडी व दिनविशेष - ४ मार्च २०१९
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 04, 2019
Rating:
No comments: